You are currently viewing समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रणधीर शिंदे…

समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रणधीर शिंदे…

समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रणधीर शिंदे…

२३ ला संमेलन; प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दत्ता घोलप यांना निमंत्रण…

कणकवली

बॅरिस्टर नाथ पै. सेवांगण मालवण व समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दत्ता घोलप यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर व साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली. तसेच संत साहित्याचे आणि साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर व प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची देखील उपस्थिती असणार आहे.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिंदे हे मराठीतील आजचे महत्वाचे समीक्षक असून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागात प्राध्यापक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाङ्मय, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता, कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळ, अण्णाभाऊ साठे साहित्य आणि समीक्षा, ढव्ह आणि लख्ख उन आदी ग्रंथ लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. विविध वाङ्मयीन नियतकालिकातून समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध असून मराठीतील साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. तर डॉ. दत्ता घोलप हे भाषा साहित्याचे तरुण संशोधक असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे मराठीचे अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचे आविष्कारविशेष या विषयावर पीएच. डी. मराठी कादंबरी आशय आणि आविष्कार हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे. विविध नियतकालिकातून वाङ्मयविषय विषयी लेखन त्यांचे सातत्याने प्रसिद्ध होत असते.

दरम्यान कवी डॉ.अनिल धाकू कांबळी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी काही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीला अधिक चालना देणारे ग्रंथ संपादित केल्याबद्दल प्रा.जीजा शिंदे आणि प्रा. संजीवनी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड.देवदत्त परुळेकर यांचे ‘साने गुरुजी समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. नामवंत कवयित्री आणि पुण्याच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉ.दर्शना कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. नव्या लेखक कवींना प्रेरणा मिळावी या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिरोडकर आणि श्री मातोंडकर यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा