You are currently viewing NEET “नीट” झाली का ❓

NEET “नीट” झाली का ❓

NEET “नीट” झाली का ❓
….. अॅड नकुल पार्सेकर..
सरकार कुणाचेही असो, आपल्या देशात शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजारात आपल्या भवितव्याची सुंदर ni स्वप्न पहाणारे विद्यार्थी आणि हाल अपेष्टा काढणारे पालक हे या बाजारात फसणारे ग्राहक आहेत. अनेक राज्यात नोकर भरतीसाठी ढगफुटी सारखी होणारी पेपरफुटी यामुळे रोजगारासाठी वणवण करणाऱ्या देशातील लाखो युवकांना निराशेच्या गर्देत लोटलेले आहे. याबाबतीत उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
आपण डॉक्टर होणार.. हे स्वप्न घेऊन राञीचा दिवस करून कठोर परिश्रम करणाऱ्या या देशातील लाखो विद्यार्थ्यांनी नीटची परिक्षा दिली. याचा कालच ” निकाल” लागला… खरं तर या विद्यार्थ्यांचा कायमचाचं निकाल लागला.
या निकालात तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यापूर्वी जास्तीत जास्त चार ते पाच विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवायचे… संशयाला जागा आहे, या अनुषंगाने अनेक प्रश्र्न उपस्थित होतात. पैकीच्या पैकी गुण मिळालेले विद्यार्थी हे ठराविकचं राज्यातील व केंद्रातील आहेत. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल अकरा विद्यार्थी हे पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय आणि शिक्षण संस्था या बहुतेक धनदांडग्यां राजकारण्यांच्याचं असतात. खाजगी कोचिंग क्लासेस हा सुद्धा एक मोठा व्यवसाय आहे. एरवी आपल्या कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी झळकले याची तातडीने जाहिरात करणारे अजूनही कुणी ढोल बनवायला पुढे का नाही आले? हा निकाल शंभर टक्के संशयाच्या भोवऱ्यात आहे.
कोणताही स्कॅम झाला की चौकशी समिती नेमली जाते. थातूरमातूर चौकशी केली जाते… आणि विषय संपतो. कारण अशा समित्यांमध्ये अप्रत्यक्षरीत्या घोटाळ्यात सहभागी असलेल्याच हितचिंतकांचाच भरणा असतो. राजकीय लागेबांधे हे आणखीन एक महत्त्वाचे कारण.
या निकालामुळे अनेक प्रश्र्न निर्माण होणार आहेत. ज्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या काॅलेजमध्ये प्रवेश घेताना प्राधान्य क्रमाकांचा कोणता निकष लावणार. महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षी कट ऑफ लिस्टही खुल्या गटात सहाशेच्या वर होती यावर्षी ती सहाशे पन्नासच्या वर जाईल त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहाणार.
नेहमीप्रमाणे चौकशीचा फार्स होईल. सरकार तावातावाने जाहीर करेल.. कसून चौकशी करून संबधितावर कठोर कारवाई करण्यात येईल… आणि संबधित हे सरकारशीच वा एखाद्या मंञ्याशीच “संबंधित” असतील तर मग काय❓
एक खरं आहे शिक्षणक्षेत्रात बरबटलेल्या आणि सडलेल्या या व्यवस्थेने मुलांच्या भवितव्याची वाट लावली हे नाकारून चालणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा