You are currently viewing “निथळतेस तूं .. !!”

“निथळतेस तूं .. !!”

*जागतिक साहित्य कला व्यक्ती व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते यांच्या कवितेचे विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*

 

*”निथळतेस तूं .. !!”*

✒️कवी वि. ग. सातपुते

 

दरवर्षी ऋतू येतात जातात. निसर्ग ऋतूंप्रमाणे आपली कूस बदलतो. आपलं अनोखे लावण्य आपल्या समोर उभं करतो. अगदी आपल्याला न सांगता ही. हा निसर्गाचा अविष्कार याची देही याची डोळा बघायचा असतो. त्याचा गंध जो आपल्याला मोहून टाकतो तो गंध आपण आपल्या हृदयातील गंधकोषात साठवून रोमरोमांत भिनवायचा असतो आणि असा रोमारोमांत भिनलेला गंध कधीच उडून जात नाही. असा हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेला गंध म्हणजे “निथळतेस तूं .. !!” ही प्रसिद्ध भावकवी विगसा (श्री.विलास सातपुते) सरांची कविता. बरेच दिवस सरांच्या कवितांवर मलाही काहीतरी लिहावयाचे होते परंतु ते लिहिणे शक्य झाले नाही. आज अनायासे सौ ऐश्वर्या डगांवकर मॅडम यांनी सरांच्या “निथळतेस तूं .. !!” या कवितेचे केलेले रसग्रहण वाचनात आले आणि अगदी मनापासून ते आवडले आणि मलाही लिहिण्याचा हुरूप आला.

 

जीवनात आवश्यक असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला निसर्गापासून मिळतात. निसर्ग मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करत असतो. ऋतुमानाप्रमाणे त्याच्यात अवर्णनीय बदल होतात. त्या बदलांची नवलाई विलक्षण असते. प्रत्येक ऋतूच्या आगमनाची चाहूल वेगळी आहे. त्याचं सौंदर्य वेगळं आहे आणि हेच सौन्दर्य सरांनी आपल्या रचनेत छान रेखाटलं आहे.

 

वैशाखाचे रणरणते ऊन नुकतेच संपून नुकताच जेष्ठ सुरु होतो आहे. जेष्ठ, आषाढ, श्रावण हे महिने म्हणजे कवी हृदयासाठी जणू सुखाची, आनंदाची पर्वणीच असते. पर्यटन विभागाने या महिन्यांना “हिरवा ऋतू” असे संबोधले आहे. मग भावकवी विगसा कसे बरे मागे राहतील. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त (प्रतिभावंत ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके) त्यांना लाभला आहे. त्यामुळे कदाचित भावकवी विगसांच्या रचनेतला प्रत्येक शब्द हा तोलून मापून आलेला आपल्याला पाहिला मिळतो आणि हेच सरांच्या कवितेच्या यशाचं गमक आहे. सरांची कविता वरवर पाहता निसर्ग कविता, प्रेम कविता जरी वाटली तरी त्यांच्या कवितेतून कुठेतरी अध्यात्म विषयक जगण्याचे तत्वज्ञान प्रकट होते. विरहाने व्याकुळ झालेल्या मनाला जगण्याची ओढ, सख्यभक्ती, अलवार प्रेम याची परिभाषा शिकविणारी ही कविता आहे. त्यामुळे त्यांची कविता वाचताना ब्रह्मानंदाचा वर्षाव होतो.

 

धुंदबेधुंद अधीर पाऊस

तुझ्या रूपात कोसळतो

चिंबचिंब तूं निथळताना

थेंब थेंब तो, मी प्रशितो…

 

नखशिखांत तूं अप्सरा

भावप्रितीला बहर येतो

तनमनांतर ओले ओले

ब्रह्मानंदाचा वर्षाव होतो…

 

असं म्हणतात की विरहाच्या वेदना ज्यालाच डसतात ज्याच्या मनात प्रेम भावना फुलतात. पाऊस आणि वसुंधरा यांचंही नातं अगदी असंच आहे. मनाला लागलेली भेटीची ओढ, त्यांचं नातं उलगडण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आपल्याला पाहिला मिळतो. पाऊस हा एखाद्या प्रियकरा सारखा असतो. तो ज्यावेळी कोसळतो त्यावेळी तो धुंदबेधुंद होऊन कोसळतो. तो हातचं काहीच राखत नाही. वसुंधरा जी स्वतः सौन्दर्याची खाण आहे. जिच्या चराचरांत ईश्वराचं वास्तव्य आहे. जणू ती एखादी लावण्यवती अप्सराच आहे तर तिच्यावर त्याचं प्रेम कसं बरं जडणारं नाही. मग अशावेळी आकाशात काळे ढग भरून येतात आणि धुंदबेधुंद होऊन कोसळणाऱ्या या पावसाकडून आपल्याला समर्पण भक्तीची उदात्त भावना घेता येते. एखाद्यावर प्रेम, भक्ती करायची तर किती आणि कशी करायची तर ती समर्पित भावनेने करायची मग त्यातून मिळणाऱ्या फळावर सुद्धा आपला हक्क सांगायचा नाही. हे जीवन म्हणजे भगवंतांने चालविलेला एक खेळ आहे. पण त्यात समर्पण भावनेतून मिळणारा आनंद हा विलक्षण आहे हा आनंद जणू बह्मानंदाचा आनंद आहे असे कवीला सांगायचे आहे. वास्तविक पाहता हा पाऊस धो धो कोसळतो आहे एखाद्या वेड्या प्रियकरासारखा, परंतु तोच पाऊस ज्यावेळी वृक्ष-वल्ली यांना चिंब भिजवूंन त्यांच्यावरून खाली निथळतो तो तर कसा “थेंब थेंब” आणि हा अलगद होणारा प्रेमाचा वर्षाव ही धरा पण तेवढ्याच तन्मयतेने आणि त्याच प्रेमाच्या उत्कंठतेने अलगद टिपते. पुन्हा नव्याने प्रफुल्लित होण्यासाठी.

 

तूं ओलेती सज्जल ललना

जणु ऋतू हिरवा पाझरतो

प्रीतीचे , हे चैतन्य फुलारू

साक्षात्कार , कृतार्थी होतो….

 

स्वर्गसुख , ते दुसरे कुठले

तुझ्या मिठीत मी मोहरतो

विलोभनीयता या सृष्टीची

पाहता तुज मी कवेत घेतो…

 

बदल हा सृष्टीचा नियम आहे. मानवी जीवनही त्याला अपवाद नाही. नुकत्याच बरसलेल्या प्रेमाच्या वर्षावाने जळी-स्थळी सर्वत्र तिला त्याच्याच अस्तित्वाचा दरवळ तिच्या मनांत दरवळत राहतो आहे. त्या बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाने ती चिंब भिजलेली,ओली झालेली, संपूर्ण निथळून पाण्याचा निचरा झालेली सज्जल अशी धरा जणू कृतार्थ झाली आहे. मग तीही स्वतःच असं हातचं काहीच राखत नाही. ती हिरवाईने नटलेली धरा भरभरून सुख समृद्धी प्रदान करते तेही दुसऱ्याला देण्यासाठी. हेच चैतन्य आहे जे साऱ्या विश्वात भरून उरलेलं आहे. हीच अनुभूती असते प्रेमाची, भक्तीची जी आपण याची देही याची डोळा अनुभवाची असते. स्वर्गसुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं साधं भक्तीने, प्रेमाने मोहरुन जाणं असतं. हाच असतो खरा परीस स्पर्श. स्वतःच्या अंतरंगात असणाऱ्या आत्मारामाला कवेत घेण्याचा. मग जे घडतं ते अतिशय विलोभनीय असत.

 

निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगून जाते. ती म्हणजे दुसऱ्याकरता कसं जगावं. आपलं प्रेम, आपली भावना कशी समर्पित करायची आणि जीवनाकडे कसे पाहायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता. आदर, जिव्हाळा, एकमेकांच्या नात्याविषयी असलेली ओढ, नात्यांमधला गोडवा, त्यात असलेला विरह याच यथोचित दर्शन घडविणारी ही कविता आहे. येणारा पुढचा ‘उद्या’ आनंदात जावा म्हणून ही समर्पणाची भावना. हे सुखी वैवाहिक जीवनाचे गुपित ही कविता आपल्याला सांगून जाते.

 

विनय पारखी

प्रतिक्रिया व्यक्त करा