*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम पुस्तक परीक्षण*
*स्टाईलिंग अॅट द टाॅप*
(शिवराम भंडारी आत्मकथन)
लेखिका जयश्री शेट्टी
अनुवाद :शुचिता नांदापूरकर फडके
या पुस्तकातली प्रस्तावना आणि अभिप्राय वाचून मी फार प्रभावित झाले.
हे पुस्तक म्हणजे शिवराम भंडारी नावाच्या न्हाव्याचे आत्मकथन आहे.
पुस्तक वाचताना माझ्या मनात काही विचार आले. कुठल्याही कामात कला असते. मात्र, शिंपी म्हणण्यापेक्षा
फॅशन डिझायनर, स्वयंपाकी म्हणण्यापेक्षा शेफ आणि न्हावी म्हणण्यापेक्षा हेअर स्टायलिस्ट म्हटले की मग त्या कलेला दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त होते.
हे पुस्तक मला आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे, ते सकारात्मक विचारांचे आहे तसेच आजच्या तरुण पिढीसाठी, जे रोल माॅडेलच्या शोधात असतात, त्यांना शिवाची ही कथा प्रेरणा देणारी आहे.
या पुस्तकाचे ढोबळ मानाने तीन भाग होऊ शकतात.
पहिला भाग अपार कष्टाचा, उपेक्षित अपमानास्पद, कसोटीचा काळ.
दुसरा टप्पा यशाच्या दिशेने आणि तिसरा टप्पा पुन्हा मागे वळून बघण्याचा.
शिवाचा संपूर्ण जीवनपट अवघड वळणवाटांचा आहे.
खरं म्हणजे ही एका बालकाची कथा आहे. दृढ मनोग्रह आणि अविचलित राहण्याची वृत्ती यामुळेच त्याने यश
मिळवले. त्याच्या यशाचा तोच शिल्पकार.
शिवा चार पाच वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले.
दारिद्र्य पाचवीलाच पुजलेले. पैसे नाही, घर नाही, बालवय, त्याचेही बहिणीचेही. आधार आईचा पण तोही असमर्थ, अशक्त. मामाने आसरा दिला पण प्रेम, माया, आपुलकी शून्य. सतत अपमान, आश्रिताची पोरकी भावना.
एवढासा शिवा पण पडेल ते काम करायचा, गाईगुरं वळवायचा, शेणगोटा करायचा, शेतात राबायचं, पहाटे उठून
गुरांना चारा घालायचा. कुणी “जेवायला चल” असेही म्हटलं नाही.
उरलं सुरलं खायचं, ओसरीवर झोपायचं, गोधडी नाही, पांघरूण नाही, कपडे नाही. बहिणीचा भूकबळी ही अतीव दु:खाची घटना.
शाळाही सोडावी लागली.
नुसती वणवण उरली.
काकाने त्याला नेले. आई तिथेच कारीमीनाबाई नावाच्या एका स्त्रीकडे पडेल ते काम करत राहिली.
हजामती हा त्यांचा जातव्यवसाय. काकाने केवळ धंद्यात मदत होईल या स्वार्थी हेतुने त्याला नेलं. बाकी तिथेही शिवाच्या वाटेला प्रचंड छळ आणि उपासमारच आली.
मात्र त्या लहान वयात दोन घटनांनी त्याच्या बालमनावर खूप परिणाम झाला. एका विधवा तरुणीचे केशवपन आणि गावातली इंदिरा गांधींची भेट.
तरुणीची, केशवपनानंतरची झालेली विद्रूप आणि केविलवाणी चर्या पाहून तो थरारला. मात्र इंदिरा गांधी यांच्या विशिष्ट केशरचनेच्या आणि सुंदर चेहर्याच्या प्रेमात पडला.
ज्यांचे आपण केस कापू ते सुंदरच दिसले पाहिजेत असा एक विचार त्याच्या मनात रुजला.
कधीतरी आपण या नरकातून सुटू हा आशावाद बळकट होता. लहान वयापासूनच त्याची स्वत:ची अशी एक
विचारसरणी होती. शिक्षण नसल्यामुळे विकासाला मर्यादा होत्या पण सभोवतालच्या वातावरणातून त्याने जीवनाचे ज्ञान आत्मसात केले अन् ते वापरले.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने कर्नाटकातील एका खेड्यात असलेलं त्याचं घर सोडलं आणि तो मुंबईला आला.विक्रोळी येथे भंडारी जमात आहे. तिथे एका सलूनमधे त्याला काम मिळाले. तिथलंही जीवन गलिच्छ, कष्टप्रद आणि संघर्षमयच होतं पण तिथेही त्यानं त्याचं स्वप्नं जपलं, निसर्गप्रेम जपलं
आणि सदैव तुटलेल्या मनाला त्याचे आतले स्त्रोत उचलत राहिले.
त्याच्या हातात फक्त एकच कला होती. केशकर्तन.त्याचं भांडवल, एक वस्तरा, एक कंगवा, एक आरसा आणि एक लाकडी खुर्ची. सौंदर्यनिर्मिती ही त्याची मूलभूत वृत्ती आणि म्हणून त्याच्या यशाचा आलेख उंचावत गेला.
तो अरब कंट्रीजमधे गेला. लंडनला गेला. तिथल्या प्रशिक्षणाचा त्याने इथे उपयोग केला.
त्याचे पहिले पार्लर ठाण्याला वागळे इस्टेट येथील कामगार वस्तीत सुरु झाले. आज डोंबिवली पासून ,बांद्रा लोखंडवाला काॅम्प्लेक्स पर्यंत “शिवाज सलॉन”ची जवळजवळ वीस पार्लरची चेन पसरली आहे.
त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. आज काॅर्पोरेट बाॉलीवुडमधले अनेक दिग्गज त्याचे ग्राहक आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा हेअर स्टायलिस्ट तोच होता.
सामना मधली त्याची मुलाखत खूप गाजली.
त्याच्या कार्यामुळे अनेक तरुण तरुणींना जाॅब मिळू शकले. मिळालेल्या पैशातून त्यांनी त्याच्या ग्रामविकासालाही हातभार लावला. तो जिथून आला, जसा आला त्या ठिकाणाविषयी तो आजही कृतज्ञता बाळगतो.
याशिवाय या पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयीही खूप सुंदर प्रेरणादायी वाचायला मिळते.
त्याची पहिली बायको गेली तेव्हां आलेली निराशा, त्यानंतरचे त्याचे दुसरे लग्न आणि एक फॅमीली मॅन शिवा—हे सारेच खूप वाचनीय आहे.
जीवनाकडे मागे वळून पाहताना तो म्हणतो,
आज सर्व सुखं माझ्या पायाशी हात जोडून उभी आहेत पण मी मात्र तोच आहे. दक्षिण भारतातल्या एका दुर्गम खेड्यातला साधासुधा माणूस. आजही मी कुठेही झोपू शकतो, काहीही खाऊ शकतो. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर माझी नजर चमचमणार्या आकाशाकडे जाते.
आकाश पहात मी समाधानाने डोळे मिटतो. मला शांत झोप लागते…..
एका बालकाच्या संघर्षाची ही यशोगाथा आहे…
The top of the body is head.
Styling At The Top हे शिवाचे स्वप्न
आणि त्या स्वप्नपूर्तीची ही कहाणी…
प्रेरणादायी, सशक्त मानसिकतेची,
सकारात्मक.
जरुर वाचावी अशीच.
*सौ. राधिका भांडारकर*