You are currently viewing निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या नुकसानाची जलद पुनर्प्राप्ती

निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या नुकसानाची जलद पुनर्प्राप्ती

*सेन्सेक्स २३०३ अंकांनी वधारला, तर निफ्टीने २२६०० चा टप्पा पार केला*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

निवडणूक निकालाच्या दिवशी घसरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (बुधवारी) शेअर बाजाराने जोरदार रिकव्हरी केली. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स २३०० अंकांनी मजबूत झाला, तर दुसरीकडे निफ्टीनेही एकाच दिवसात २२५०० ची पातळी ओलांडली. अशाप्रकारे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या एकूण नुकसानापैकी निम्मी रक्कम बाजाराने एकाच दिवसात वसूल केली आहे. बुधवारी सेन्सेक्स २३०३.१९ (३.१९%) अंकांनी वाढून ७४३८२.२४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ७३५.८५ (३.३६%) अंकांनी झेप घेऊन २२६२०.३५ वर बंद झाला. मुख्य बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात ३% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. रिलायन्स आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी निवडणूक निकालाच्या दिवशी घसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिकव्हरी दाखवली.

 

बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात हेवीवेट बँकिंग शेअर्स ४.५% वाढले. दुसरीकडे, वित्तीय सेवांशी संबंधित समभाग ४.२% टक्क्यांनी वाढले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी बँकिंग शेअर्समध्ये ८% पर्यंत घसरण झाली होती. बुधवारी, ग्रामीण भागातील मागणी वाढल्यामुळे निफ्टी एफएमसीजी ४.३% वाढला तर निफ्टी ऑटो ४.७% वाढला. आयटी इंडेक्स शेअर्स २.४% वाढले. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप बुधवारी १३ लाख कोटी रुपयांनी वाढून ४०७.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. निफ्टी बँकेने बुधवारी गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय वाढ नोंदवली.

 

मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स ४३८९.७३ अंकांनी किंवा ५.७४ टक्क्यांनी घसरून ७२०७९.०५ या दोन महिन्यांहून अधिक नीचांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ६२३४.३५ अंकांनी किंवा ८.१५ टक्क्यांनी घसरून ७०२३४.४३ या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १९८२.४५ अंकांनी किंवा ८.५२ टक्क्यांनी घसरून २१२८१.४५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी तो १३७९.४० अंकांनी किंवा ५.९३ टक्क्यांनी घसरून २१८८४.५० अंकांवर बंद झाला. मात्र, भाजपला बहुमत मिळाले नसतानाही मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने, येत्या काही दिवसांत बाजार पुन्हा रिकव्हर होईल, असा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला होता. बुधवारी बाजार उघडल्यानंतर ही वसुली दिसू लागली.

 

खरेदी वाढल्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात ९४८.८३ अंकांनी झेप घेऊन ७३०२७.८८ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७.१० अंकांच्या वाढीसह २२,१३१.६० अंकांवर पोहोचला.

 

५४३ सदस्यांच्या लोकसभेत एनडीए बहुमताच्या २७२ च्या वर आहे तर भाजप २०१४ नंतर प्रथमच जादूई बहुमतापासून दूर आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांवर गंभीरपणे अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सर्व ५४३ जागांचे निकाल जाहीर केले आहेत, ज्यामध्ये भाजपने २४० जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत.

 

आशियाई बाजारांमध्ये, सोल आणि हाँगकाँग वाढीसह व्यवहार करताना दिसून आले तर टोकियो आणि शांघाय तोट्यासह व्यवहार करत आहेत. मंगळवारी अमेरिकी बाजार वाढीसह बंद झाले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.०४ टक्क्यांनी घसरून $७७.४९ प्रति बॅरलवर आले. तात्पुरत्या शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी देशांतर्गत बाजारातून १२४३६.२२ कोटी रुपये काढून घेतले. २०१४ नंतर प्रथमच भाजप २७२ च्या जादुई आकड्यापासून दूर राहिल्यामुळे मंगळवारी बाजाराचा चार वर्षांतील सर्वात वाईट दिवस होता.

 

देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंज एनएसईने (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) बुधवारी जागतिक विक्रम केला. एका दिवसात सर्वाधिक व्यवहार झाल्याचा हा विक्रम आहे. एनएसईवर बुधवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, १९७१ कोटी ऑर्डर देण्यात आल्या, हा एक जागतिक विक्रम आहे. दररोज सरासरी २८.५५ कोटी ऑर्डर दिल्या जातात. एनएसईचे सीईओ आशिष चौहान यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा