You are currently viewing ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त ‘स्वराज्यगड’चा खास प्रयोग

३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त ‘स्वराज्यगड’चा खास प्रयोग

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

६ जून १६७४ रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांनी उद्या गुरुवारी ता. ६ रोजी संध्याकाळी ६:३० वा. दादरमधील छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाचे संचालक विभीषण चवरे, ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यनिर्माते भरत जाधव, ज्येष्ठ दिग्दर्शक ‘पद्मश्री’ प्रा. वामन केंद्रे उपस्थित राहणार आहेत.

 

आद्य मराठी नाटककार छत्रपती शहाजीराजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या तसबिरीचे विद्यमान प्रिन्स शिवाजीराजे भोसले (तंजावूर) यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. तसेच, या विषयाचे संशोधक प्रेमानंद गज्वी (ज्येष्ठ नाटककार आणि ९९ व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष) यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मंडळाचे सभासद, हितचिंतक आणि नाट्य रसिकांनी या ऐतिहासिक समारंभास आणि त्यानंतर विभीषण चवरे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आदित्य थिएटर’ निर्मित शिवस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांचे शाहिरी नाट्य ‘स्वराज्यगड’ या शाहिरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, सरचिटणीस चंद्रकांत तथा अण्णा सावंत, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, उपाध्यक्ष भालचंद्र चव्हाण, सचिव संतोष शिंदे, विश्वस्त ॲड. धैर्यशील नलवडे, ॲड. सुहास घाग, ज्ञानेश महाराव, नियामक मंडळ सदस्य राजेश नरे आणि डॉ. मिलिंद तोरसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा