You are currently viewing इंग्लंड-स्कॉटलंड सामना पावसामुळे वाहून गेला, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण, मुनसे-जोंसची खेळी व्यर्थ

इंग्लंड-स्कॉटलंड सामना पावसामुळे वाहून गेला, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण, मुनसे-जोंसची खेळी व्यर्थ

*नेदरलँड्सने नेपाळचा सहा गडी राखून केला पराभव, मैक्स ओ’डॉडचे अर्धशतक, प्रिंगल सामनावीर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. स्कॉटलंडचा कर्णधार रिची बैरिंगटनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर लगेचच मुसळधार पाऊस पडला आणि सामना सुमारे एक तास उशिराने सुरू झाला. स्कॉटलंडच्या डावात ६.२ व्या षटकात पुन्हा पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. त्यानंतर सामना सुरू झाला तेव्हा षटके कमी करण्यात आली. सामना १०-१० षटकांचा करण्यात आला.

स्कॉटलंडने १० षटकांत एकही विकेट न गमावता ९० धावा केल्या. जॉर्ज मुनसेने ३१ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या तर माइकल जोंसने ३० चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४५ धावांची नाबाद खेळी केली. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला लक्ष्य मिळाले. या नियमानुसार इंग्लंडला १० षटकांत १०९ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, स्कॉटलंडचा डाव संपताच पावसाने पुन्हा हस्तक्षेप केला आणि सामना थांबवावा लागला. मैदान कव्हर्सने झाकले गेले. यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ब गटात नामिबियाचा संघ दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंड एका गुणासह दुसऱ्या स्थानावर तर स्कॉटलंड एका गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे याशिवाय ओमान चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारतीय वेळेनुसार ६ जून रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

दरम्यान टी२० विश्वचषक २०२४ च्या सातव्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना नेपाळशी होत होता. डलास येथील ग्रैंड प्रेयरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टिम प्रिंगल आणि लोगन वान बीक या फिरकी गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे नेदरलँड्सने नेपाळला १००६ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने मैक्स ओ’डॉडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १८.४ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. प्रिंगलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह नेदरलँडचा संघ ड गटात दक्षिण आफ्रिकेनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन गुण आहेत. त्याचवेळी बांगलादेश संघाने अद्याप मोहिमेला सुरुवात केलेली नाही. नेपाळ चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे.

नेदरलँडने नाणेफेक जिंकून नेपाळला फलंदाजी दिली. चार षटकांतच नेपाळची सलामी जोडी कुशल भुरतेल (७), आसिफ शेख (४) यांना टिम प्रिंगल आणि वॉन बीक यांनी बाद केले. पॉवरप्लेमध्ये नेपाळने दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ २९ धावा केल्या होत्या. अनिल साहने (११) दोन चौकार मारले, पण प्रिंगलने त्यालाही बाद केले. नेपाळने ९.१ षटकात ५० धावा पूर्ण केल्या. कर्णधार रोहित पाउडेल एका बाजू सांभाळून होता. दहाव्या षटकात वान मीकरनने कुशल मल्लालाही (९) बाद केले.

यानंतर दीपेंद्र सिंह एयरीला बास डी लीडेने तंबूमध्ये पाठवले. त्याला नऊ धावा करता आल्या. त्याचवेळी मीकेरनने सोमपाल कामीला (०) तर लीडेने करण केसीला (१७) बाद केले. प्रिंगलने कर्णधार रोहित पौडेलच्या स्वरुपात तिसरा बळी घेतला. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ३७ चेंडूत ३५ धावा काढल्या. त्याचवेळी वान बीकने अभिनाश बोहाराला (०) बाद करून नेपाळचा डाव १९.२ षटकांत १०६ धावांवर आटोपला.

१०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. माइकल लेविट एक धाव काढून बाद झाला. यानंतर मैक्स ओ’डॉड आणि विक्रमजीत सिंह यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. विक्रमजीत २२ धावा करून बाद झाला. सायब्रँड एंजेलब्रेक्ट १४ धावा केल्यानंतर आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स पाच धावा करून बाद झाला. अखेरीस, मैक्स ओ’डॉड आणि बास डी लीडे यांनी नेदरलँड संघाला विजयापर्यंत नेले. मैक्सने ४८ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या तर डी लीडेने १० चेंडूत ११ धावा केल्या. नेपाळकडून सोमपाल कामी, दीपेंद्र सिंह आणि अभिनाश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नेपाळचा संघ प्रथमच टी२० विश्वचषक खेळत आहे. तर, नेदरलँड आयसीसी स्पर्धांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात माहिर आहे. पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी करत नेपाळच्या संघाने या टी२० विश्वचषकात स्थान मिळवले. यानंतर नेपाळमध्ये मोठा उत्सव झाला. त्याच वेळी, नेदरलँड संघाला २०२२ टी२० विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. थेट पात्र ठरलेल्या संघांपैकी हा एक संघ होता. मात्र, सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झाली.

कॅनडाविरुद्धच्या सराव सामन्यात नेपाळची फलंदाजी खराब झाली होती, तर श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात नेदरलँड संघाचा पराभव झाला होता. ड गटात नेपाळ आणि नेदरलँड्सशिवाय श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १२ सामने झाले आहेत. यापैकी नेदरलँडने ७ सामने जिंकले असून नेपाळच्या संघाने ५ सामने जिंकले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा