लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज
सिंधुदुर्गनगरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. त्यादिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तसेच देशातील इतर मतदार संघाचा निकाल जाहिर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये व शांतता रहावी याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. व याकरीता जिल्हयातील विविध ठिकाणी, फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पोलीस वाहन पेट्रोलिंग असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तसेच संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मतमोजणी निकालाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातून 1 अपर पोलीस अधीक्षक, 3 पोलीस उपअधीक्षक, 41 इतर पोलीस अधिकारी व 319 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तसेच 4 स्ट्रायकिंग, 2 दंगल नियंत्रण पथके सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 469 इसमांवर विविध कलमांन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून 433 इसमांना क्रि.प्रो.को.कलम 149 प्रमाणे नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अवैध दारू वाहतूकीला आळा घालण्यासाठी चेक पोस्टवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात 13 जून पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे मनाई आदेश लागू आहेत. तसेच आदर्श आचार संहिता देखील लागू आहे. मतमोजणी व निवडणूक निकालाच्या अनुषंगाने जिल्हयात सर्वांनी शांतता राखावी तसेच संयम ठेवावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे.