*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाचे ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित ३ जून जागतिक सायकल दिवसाच्या निमित्ताने लेख…*
*सायकल*
मला लहानपणा पासून सायकलीच खूप वेड होतं .घरातलं एक शेंडेफळ असल्याने काही फायदे /तोटे ही वाट्याला यायचे . घरात सगळ्यात लहान असल्याने सगळेच मोठे , सांगतील ते लहान मोठे काम निमुटपणे ऐकायचे व तत्परतेने करायचे एवढेच माहीत असे .
घरात मोठी भावंडे असायची . त्यामुळे त्यांनी वापरलेली मोडकी तोडकी खेळणी कधी मधी खेळायला मिळायची !माझ्या आठवणीत तेंव्हा खेळणी बहुतेक नसायचीच .आणि असलीच तर , जुन एखाद चाक , जुनी सायकल टायर किंवा दाराशी आलेली एखादी बैलगाडी साठी असलेले धांडे व ते सोलून केलेल्या अनेक विविध वस्तू .
पण शेजारी पाजारी असलेली सायकल मात्र मला फारच आवडायची . हळूच आजूबाजूला कोणी नाही असे पाहून ,हलक्या हाताने त्या सायकलला हात लावायचा , किंवा सायकलचे पॅडल ऊलट सुलट फिरवायचो , कधी कधी सायकल स्टॅंडवर लावून , गरागरा मागचे चाक फिरवण्यात खूपच मजा येत असे !पण आनंदात काही कमी नाही पडायच.
आमच्या शेजारी कुळकर्णी रहायचे . त्यांच्या कडे लहानग्यासाठी एक तिन चाकी सायकल होती . तिच माझी जवळून पाहिलेली पहिली सायकल . एकदा ( बराच मस्का मारल्यावर ) ति चालवायचा चान्स मिळाला , पण त्या सायकल मागे सतत कोणी न् कोणी मोठे असायचे , आणि तशी ती बरीच जुनी पण होती त्यामुळे ती चालवण्यात फार काही मजा येत नव्हती ,(आणि बदल्यात काही तरी काम पण करावे लागे ते वेगळेच )एकदा गंमतच झाली त्या जुन्या सायकलचे हॅंडल माझ्या कडून तुटून पडले , फजिती तर झालीच अन् मग काय सगळी कडून नुसता ओरडाच ओरडा !
मग मी मनाशी ठरवलं आपल्या साठी ती दुचाकी सायकलच बरी !
घरात तर सायकल नव्हतीच ! मग मित्रां सकट आम्ही एक प्लॅन केला . गल्लीत कोणी सायकल स्वार आला की दोघा तिघांनी त्याच्यवर नजर ठेवायची , तो कोणाकडे गेलाय , केंव्हा येऊ शकेल वगैरे . अंदाज पक्का झालाकी चटकन् एकाने राऊंड मारायचा व आळी पाळीने गल्लीत पळवायची . काही धोका वाटला तर शिळ फुकून इशारा द्यायचो , बहुतेकदा ही जवाबदारी माझ्यावरच सोपवलेली असायची ( अर्थात सगळ्यात लहान !)मला वाटतं या सायकल ची चक्कर मारण्याच्या धुसखोरीत पाळत ठेवत असणाऱ्या सवयी मुळेच पुढे संरक्षण खात्यात नोकरी मिळाली असावी ! दुसरी अंदरकी बात मला अजून पाहिजे तशी सायकल जमत ही नव्हती .
पण सायकल तर चालवायची ही जिद्द होती . घरून एक आणा आलेल्या पाहुण्यांकडून मिळवला !( अर्थात त्यांचे काही काम करून )
जवळच एक सायकली भाड्याने मिळणार दुकान होतं . तिथून एका मित्राला मदतीला घेतले ( त्याला आलटून पालटून एक सायकल रपेट मारण्याच्या करारावर !मित्रामुळे हुरूप आला . पण धडपडत सायकल एकदाची शिकलो . त्यात अनेकदा ढोपर फुटले , पडझड झाली व घरात कसा काय पडला म्हणून बोलणी ही खाल्ली ते वेगळेच ! आणि मग काय सायकल वर ईकडे तिकडे विहार करायला लागलो , जणू मला पंखच फुटले होते !!
आमच्या लहानपणी सायकल विकत घेणे फार अवघड होते व तेवढी सांपत्तिक परिस्थीती पण नसायची . त्यामुळे जवळ पास भाड्याची सायकल दुकाने हमखास असायची . साघारणतः एक किंवा दोन आणे तास असायचा . (त्यावेळेस नवे पैसे चलनात आले नव्हते ) . मुले तास अर्धातासा साठी सायकल भाड्याने घेत व सायकल चालवण्याची हौस भागवून घेत असे . भाड्याच्या सायकली तेव्हा बहुतेक लाल रंगाच्या असे . त्या सायकलला घंटी नसायची , मागचे कॅरिअर पण काढलेले जेणे करून No Double seat ,दुकानदार पैसे पहिले घ्यायचा ,नाव रजिष्टर मधे नोंद करायचा अशी पध्दत होती .
भाड्याचे नियम कडक असायचे. जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠
पुर्ण ताकदीने पायडल मारत, कधी हात सोडत बँलेंस करत, कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची.असे काळजीपूर्वक करीत असू .
हे भाड्याने सायकल घेणं, हे तेव्हा आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं…
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे…
घरी जर कोणी सायकलवर आलं तर मनात ऊकळ्या फुटायच्या …
पण माझी एका बाबतीत खूपच तारांबळ होत असे ,जसे तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं
यातचं माझी अर्धी एनर्जी वाया जायची.
आणि वरुन वडिलधाऱ्यांचा धाक…
खबरदार हात लाऊ नको सायकलला, गुडघे फुटुन येशील…
तरी पण न जुमानता आम्ही घरातील लोकांची व आलेल्या पाहुण्यांचा नजर चुकवून ,ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो… 👍🏻
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचो …
असं करत करत आम्ही कैची (हाफींग) शिकलो.
नंतर नळी पार (फुल पायडल) करुन नविन विक्रम घडवला.. 😀
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो…
खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे .
पण आता ते दिवस नाही…
तो आनंद ही नाही….
अशी माझी सायकल सखी सहेली
✒️अनिल देशपांडे