You are currently viewing “मुक्ताई…मुक्तरुप मुक्तीची चित्कला” ..

“मुक्ताई…मुक्तरुप मुक्तीची चित्कला” ..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*“मुक्ताई…मुक्तरुप मुक्तीची चित्कला” ……….*

 

 

महाराष्ट्राला संतसाहित्याची परंपरा लाभलीय.एकापेक्षा एक संतांनी आपली ही भूमी पावन केलीय.यामध्ये संत निवृत्ती नाथ,संत ज्ञानेश्वर,संत सोपानदेव,संत मुक्ताबाई,संत एकनाथ ,संत तुकाराम,संत नामदेव,संत गोराकुंभार….इ. अनेक संत होऊन गेले. त्यांच्या सुंदर रचना आज आपल्यापाशी ठेव स्वरूपात असल्याने आज ही आपण त्यांना त्याद्वारे स्मरण करून वंदन करतो.

आज आपण संत साहित्यातील सर्वात लहान परंतु अतिशय विद्वान अशा महाराष्ट्रातील पहिल्या कवयित्री असलेल्या संत मुक्ताबाईंच्या विषयी बोलणार आहोत.

माता पित्यांनी देहत्याग केला त्यावेळी मुक्ताई अवघी चार वर्षांची होती…मुक्ता नावा प्रमाणे मुक्त होती. वयाने सर्वात धाकटी असली तरी आपल्या तेजस्वी ज्ञानाच्या अधिकारावर मोठमोठयांचा नक्षा क्षणात उतरविणारी एक तेजस्वी मूर्ती होती.

अश्विन शुद्ध प्रतिपदा,शके 1201 साली म्हणजेच सन 1199 साली(1279 ही म्हणतात,पण जन्मा बाबत विवाद असू शकतात) ती आदिशक्तीच्या रुपेने या ज्ञानी भावंडांकडे विद्युलतेच्या रूपाने जन्माला आली. ज्ञानाच्या लखलखीत तेजाने जणू आकाशातील वीजच चांदण्यांचा शीतल साज लेवून धरतीवरील या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठीच भूतलावर अवतरली असावी असे वाटते.

तीन ज्ञानी भावंडांच्या पाठीवर जन्मलेली ही मुक्ताई आईवडिलांच्या मृत्यूपश्चात् अचानक एकदम प्रौढ न बनली तर नवलच ! आई वडिलांच्या माघारी ही पोरकी झालेली भावंडे एकत्र राहत असताना त्यांना मायेची पाखर घालण्याचे महान कार्य या लहानश्या मुक्ताईने केले. प्रसंगी वात्सल्याने त्यांना सावरले ही, आणि प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले ही.त्यामुळे बालपण फारसे अनुभवायला न मिळता ती अचानक पोक्त बनली..भौतिक दृष्ट्या पोक्त बनली तरी सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी तिला नाथसंप्रदायाची दीक्षा दिल्याने ती आता आध्यात्मिक दृष्टया देखील प्रौढ बनली.

“आसनाचिया पाउटी।

प्रौढ व्हावे सद्गुरूच्या पोटी।

तेथे आत्मगृह्याचिया गोष्टी।

संपादाव्या।”……….हा स्वतः मुक्ताबाईंचा अनुभव होता.

स्वतः वडील बंधूंनी दीक्षा दिल्याने आता निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांचे लौकिक बहीण भाऊ हे नाते राहिले नव्हते ,तर ते आता गुरुबंधुभगिनी हे नवे नाते उदयास आले होते.

ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्या मध्ये एक समजदार गुंफण होती. मुक्ताईला आलेल्या शँका ती ज्ञानदेवांना विचारी आणि ते सहजतेने त्याचे निराकरण करून तिला मार्ग दाखवित असत.

“मूळद्वारी दादा स्थापिला गणपती।

माया ही उत्पत्ती कैशी झाली।…अशा प्रकारचे गूढ, घन,आणि गँभीर प्रश्न ती सतत ज्ञानदेवांना विचारत असे..तिची ही लहान वयातील जिज्ञासा पाहून ते ही तिला भरभरून ज्ञान बोध देत असत. अशा प्रकारे मुक्ताई देखील आपले समाधान करून आपली स्वतःची उन्नती करुन घेत असत.

असेच एकदा ती ज्ञानेश्वरास म्हणाली,

“सहज समाधि लागली निर्गुणी।

खुंटलीसे वाणी न चले पुढे।”

 

पुढे म्हणतात..

 

“गळाली इंद्रिये राहिलेसे मन।

झाले महाशून्य एकाएकी।”…….

 

असे ऐकल्या बरोबर ज्ञानदेव समजून चुकले. तिला प्राप्त झालेल्या या उच्च दशेची त्यांना जाणीव झाली. ही उच्च अशी समाधी अवस्था मुक्ताईला सहजतेने प्राप्त झाली…ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.आणि अत्यंत समाधानाने बोलले,

 

“आठवे समाधिचे अंग आले तुज।

आता नाही काज आणिकांसी।”

 

मुक्ताई ला देखील ज्यांच्यामुळे ही उच्च दशा आपल्याला प्राप्त झाली त्यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.

 

“वरी निवृत्तीकृपा ।पुढे ज्ञाननंदादीपा।

सोय जाली मूल सरिता।लंघावया।”…

 

हा सद्गुरू विषयी कृतज्ञतेचा श्लोक तिच्या मुखातून सहजतेने प्रस्तुत झाला…

एकदा जगावर रुसून बसलेल्या ज्ञानदादाला तिने अधिकार वाणीने सुनावले होते…तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले.

विद्वज्जनांच्या क्षेत्रातच शब्दज्ञानाची,पोकळ पांडित्याची शुद्धज्ञानावर होणारी कुरघोडी बघून ज्ञानदेव अस्वस्थ झाले. स्वतःला आत्मक्लेश करून स्वतः चिंतामग्न होऊन , स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेत असलेले ज्ञानदादा तिला दिसले…आणि यातून आपल्या ज्ञानदादाला बाहेर काढण्यासाठी ती त्याला समजावते व त्या कठीण परिस्थितीतुन ज्ञानदेवाला बाहेर काढले….ते प्रसिद्ध 42 अभंग ताटीचे अभंग म्हणून उदयास आले..

जगावर रुसून बसलेल्या आपल्या लाडक्या ज्ञानराजाला तिने आपल्या अधिकारवाणीने समजावले. संत कुणाला म्हणावे,संतांची वागणूक कशी असावी, जन निंदेकडे कोणत्या दृष्टीने बघावे, प्रसंगी शांत राहून आपली साधना कशी चालू ठेवावी हे तिने त्यांना आपल्या गोड वाणीतून अचानक प्रसवलेल्या अभंगातून समजावले….हेच ते जगप्रसिध्द ताटीचे अभंग…..

 

“संत जेणें व्हावे

जग बोलणे साहावें।

तरीच अंगी थोरपण

ज्या नाही अभिमान।

थोरपण जेथे वसें

तेथे भूतदया असें

रागें भरावे कवणाशीं

आपण ब्राह्म सर्वदेशी

ऐसी समदृष्टी करा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा।……”

 

मुक्ताबाईच्या विनवणीचा अचूक परिणाम होऊन ज्ञानदेवांनी आपले आत्ममग्नतेचे परिघ ओलांडून, “ब्राह्मविद्येचा सुकाळ”करण्याच्या हेतूने परत कार्यमग्न झालेले दिसतात..

 

या अशा ताटी च्या 42 अभंगातून मुक्ताईची प्रसंगावधानता,समंजसपणा,बुद्धी कौशल्य,हळूवारपणा अशा उच्च कोटीच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसून येते.या चिमुरडीचे यावेळी वय असेल अवघे 9 ते 10 वर्षे..या वयात जगाला एवढा मोठा संदेश देणारी ही पहिले स्त्री कवयित्री ठरली.

मुक्ताबाई अत्यंत स्पष्टवक्ती होती.तिच्या चाणाक्ष नजरेतून ती समोरच्याला उत्तम पारखायची.आणि पटले नाही तर समोरची व्यक्ती कितीही मोठी असो त्यांना जिथल्या तिथे त्यांची जागा दाखवायची..तिच्या अशा स्वभावाला स्वतः निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव सुद्धा थोपवायचा प्रयत्न करत असत..पण ही स्पष्टवक्ती होती..एकदा ही सर्व भावंडे पंढरपूरला गेली असता संत नामदेव महाराजांची गाठ पडते. नामदेव महाराज अखंड श्रीविठ्ठलाच्या सान्निध्यात असत.त्यामुळे ते स्वतःला थोर समजत. वारकरी लोक नेहमी भेटले की एकमेकांच्या पाया पडत असतात.. इथे निवृत्तीनाथांनी त्यांना नमस्कार केला त्यांनी ही केला,पण जेंव्हा ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला, त्यावेळी मी मोठा आहे हा लहान आहे, हा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांनी प्रति नमस्कार नाही केला. पण हे चाणाक्ष अशा या चिमुरडीने बरोबर हेरले.. तिला ही गोष्ट रुचली नाही…. विठ्ठलाच्या सान्निध्यात अहोरात्र असताना ह्यांचा अभिमान गळला नाही, हे ती कळून चुकले.म्हणून तिने त्यांना नमस्कार केला नाही. उलट ती नामदेवांना म्हणते,

 

“अखंड ज्याला देवाचा शेजार।

का रे अहंकार नाही गेला।

मान अपमान वाढविसी हेवा।

दिवस असता दिवा हाती घेशी।

परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळा।

आंधळ्याचे डोहळे का बाट जाले?

कल्पतरूतळवटी इच्छिले ते गोष्टी।

अद्यापि नरोटी राहिली कां?…..”

 

अशी नामदेवांची ती कानउघाडणी करते.पुढे एवढ्यावरच न थांबता ती त्यांना भक्तीचं खरं मर्म कळलेच नाही म्हणून योग्य गुरू करून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला ही देताना दिसते.

 

“गुरुवीण तुज नव्हेची गा मोक्ष।

होशील मुमुक्षु साधक तू।…”

 

मुक्ताबाई ने केलेल्या या कानउघाडणी ने नामदेवांना आपली चूक समजून आली.आणि त्यांचा अहंकार निवला..त्यांनी मुक्ताईची क्षमा मागितली.पुढे त्यांनी विसोबारायांना आपले गुरू केले.

 

पैठण इथे शुद्धीपत्रासाठी गेले असता या चारही भावांची खिल्ली उडवली गेली.त्यांना ब्रह्मसभेसमोर पशुमुखातून वेद म्हणायला लावले गेले…ज्ञानदेवांनी हे ही आव्हान पेलले,आणि रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले…ही किर्ती योगीराज चांगदेवा पर्यंत पोहचली..त्यांना भेटीची ओढ लागल्याने त्यांनी त्यांना पत्र लिहिले..पण तीर्थरूप की चिरंजीव लिहावे या संभ्रमात पडल्याने चांगदेवांनी कोरेच पत्र ज्ञानदेवांना धाडले.ते पाहून मुक्ताई म्हणते,”अरेरे! एवढी चौदाशे वर्षे जगुन ही हा चांगदेव योगी कोरडाच राहिला.” मग ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने पासष्ट ओव्यांचे उत्तर धाडले…पण ते पत्र वाचून चांगदेवांना काहीच। अर्थबोध नाही झाला.म्हणूनि ते त्यांच्या भेटीस वाघावर बसून निघाले….तेंव्हा स्वतःच्या सिद्धीसामर्थ्याचे प्रदर्शन करत येणाऱ्या चांगदेवांना बघून मुक्ताई म्हणते,

” वीरक्त म्हणावी आणि इच्छेचा पाईकु।

तयाचा विवेक जाळी परता।

योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु।

तयाचा विवेक जाळी परता ।”

चांगदेवाचा अहंकार नष्ट। व्हावा म्हणून ही भावंडे भिंतीवर बसून त्यांना सामोरी गेली. आणि हा चमत्कार बघून चांगदेव पूर्ण शरण आले.

“वरदहस्त आता मस्तकी ठेवावा”..म्हणून विंनती करू लागले…आणि मग या भावंडांनी ही जबाबदारी मुक्ताईवर सोपावली..

“यासी करा प्रतीत आत्मज्ञानी”…म्हणून निवृत्तीनाथ आज्ञा करते झाले.

आज्ञेचे पालन करून मग या छोट्या चिमुरडीने आपल्या पायाशी लागलेल्या चौदाशे वर्षाच्या चांगदेवांच्या माथ्यावर हाथ ठेवला..आणि मुक्ताईने त्यांना निजबोध प्राप्त करून दिला.आणि हा योगीराज क्षणांचाही विलंब न लागता जीवन्मुक्त झाला.मग मुक्ताबाईंनी त्यांना चांगदेवपासष्ठीचा अर्थ त्यांना उलगडून सांगितला. मुक्ताबाई आता सर्वार्थाने सद्गुरूपदी आरूढ झाली.आपल्या सद्गुरु विषयी कृतद्न्यता व्यक्त करत असताना,

 

“मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा।

नित्य मुक्तलीळा दावी अंगी।।”….या भावनेने योगी चांगदेवांनी पूजा पार पाडली.

 

मुक्ताईचे अभंग असे जाता जाता प्रसंगानुरूप बाहेर पडायचे.अभंगांची संख्या कमी असली तरी प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगाच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दातून मुक्ताईचा आध्यात्मिक अधिकार,योग सामर्थ्य दिसून येते.तिचे प्रौढपण,अनुभव, परखडपणा,उत्तुंग कल्पनेची दिव्यता आणि विचारांची प्रगल्भता यांचे दर्शन होते.

मुक्ताबाईंनी हरिपाठाचे ही अभंग लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताईचे जणू अनुभवकणच आहेत असे वाटते.

मुक्ताबाईंनी ज्ञानबोध ग्रंथाचे ही लेखन केले आहे,त्यात प्रामुख्याने त्यांचे आणि वडीलबंधु निवृत्तीनाथ यांचे संवाद असल्याचे दिसते. हे संशोधनांती दिसून आलंय.

गोरक्षनाथांच्या कृपेमुळे तिची आध्यात्मिक वाटचाल नंतर वेगाने झाल्याचे दिसते.शेवटी शेवटी तर ती सतत आत्ममग्न होत गेली. एके दिवशी मार्गक्रमण करत असताना विजेच्या विलक्षण कडकडाटात घंटेचा नाद सर्वांना ऐकू येऊ लागला आणि क्षणार्धात विजेचा लोळ येऊन मुक्ताबाईंना मुक्त करून घेऊन गेली….मुक्ताई मोक्षपदा ला गेली हे संत निवृत्तीनाथ यांच्या ध्यानी आले..आणि इतरांना त्यांनी समजावले,

“कडाडली वीज निरंजनी जेंव्हा।

मुक्ताबाई तेंव्हा गुप्त झाली।

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई।

झाली मुक्ताबाई स्वरूपाकार।।”

 

———————————————© पल्लवी उमेश

(कॉपी राईट आहे)

“चिन्मय”,शाहूनगर,

जयसिंगपूर

मोबा.9823735570

प्रतिक्रिया व्यक्त करा