You are currently viewing जल जीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा –  एकनाथ नाडकर्णी

जल जीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा –  एकनाथ नाडकर्णी

जल जीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा –
एकनाथ नाडकर्णी

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे अर्धवट कामे सोडल्याचा आरोप…

दोडामार्ग

जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा व समन्वयच्या अभावामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. कामाच्या मुदती संपूनही काही कामे २५ टक्के पुर्ण झालेली नाहीत, त्यामुळे या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने अर्धवट कामे सोडली आहेत त्याचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घालावा असे ही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत श्री. नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळायला हवे या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने जल जीवन मिशन योजना आणली. या योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोट्यावधी निधी खर्च होत आहे. नवीन नळपाणी योजना, अस्तित्वातील नळयोजनांचे नूतनीकरण अशी कामे ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या मार्फत सुरु आहेत. काम जलदगतीने व गुणवत्ता राखून होण्यासाठी अन्य एजन्सी पण नेमल्या आहेत. असे असूनही गेल्या दोन वर्षांपासून अनेक गावातील कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे केंद्राच्या योजनेच्या लाभपासून अनेक कुटूंब वंचित आहेत. अनेक कामे ठेकेदारांनी अर्धवट स्थितीत सोडली असून गेल्या वर्षभरापासून ठेकेदार कामाकडे फिरकले देखील नाहीत अशी स्थिती दोडामार्ग तालुक्यात आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे देखील कामावर परिणाम होत आहे.

शिवाय शासनाच्या अन्य विभागाकडून समन्वयाची भूमिका नसल्याने कामे रखडत आहेत. जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांचा आढावा घेऊन तातडीने कामे मार्गी लावणे आवश्यक होते. मात्र या महत्वाकंक्षी योजनेबाबतही वरिष्ठंनी गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या लोकोपयोगी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या कामांची सखोल चौकशी होण्याची गरज असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आढावा घ्यावा अशी मागणी करणार आहे असे ते म्हणाले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा