मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आज १ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करित आहेत
. त्या औचित्याने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा येत्या शनिवारी म्हणजे दिनांक ८ जून रोजी परळच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. गोविंदराव मोहिते यांनी गेल्या जवळपास ४० वर्षात कामगार, सहकार, शिक्षण, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, ग्रामीण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करित, बहुआयामी व्यक्तिमत्त्व उभे केले. त्याबद्दल त्यांचा शाल- श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणारआहे. सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर भुषविणार आहेत.
सोहळ्याला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. हा सोहळा न भूतो न भविष्यती, ठरावा यासाठी खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि सर्व संघटक सेक्रेटरी, कार्यकर्ते, मित्र परिवार हितचिंतक कामाला लागले आहेत.
एकूण जीवन भराच्या कार्यात कामगार चळवळ हेच होमपिच ठरलेल्या गोविंदराव मोहिते यांनी १९६७ मध्ये भायखळ्याच्या खटाव मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून करिअर करित व्यक्तीमत्व घडविले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले आणि खर्या अर्थाने कामगार चळवळीत पाऊल टाकले. कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या गांधी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि कामगार चळवळ हेच इतिकर्तव्य त्यांनी मानले. पूढे संघटन सेक्रेटरी पदापासून सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि आता सरचिटणीस हे सर्वोच्च स्थान संपादन केले. गोविंदराव मोहिते यांनी विविध खेळात विशेष आवड जोपासताना अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले.
आज ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे सरचिटणीसपदही भुषवित आहेत. माजी राज्यमंत्री खंबीर कामगार नेते, अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांनी त्यांना नेतृत्वाची संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. केंद्रीय इंटकच्या कार्यकारिणीत सेक्रेटरी म्हणून काम करताना ते इंडियन नॅशनल टेक्सटाइल वर्कर्स फेडरेशनचे उपाध्यपद भूषवित आहेत. महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी त्यांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे. जागतिक स्तरावर सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लायन्स क्लबच्या अनेक लोकहितकारक कामात ते पुढाकार घेत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान, तोच विचार गोविंदराव मोहिते यांनी आपल्या स्वतःमध्ये रुजविलेला दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आज विविध क्षेत्रात आपले अलौकिकत्व सिध्द केलेले दिसत आहे.