You are currently viewing प्रिय सखा झोपाळ्यास

प्रिय सखा झोपाळ्यास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम लेख*

 

प्रिय सखा झोपाळ्यास, 

चक्क तुला मी पत्र लिहितेय आज! कल्पने पलीकडची गोष्ट!लोकांच्या नजरेत झोपाळा म्हणजे तू एक निर्जीव वस्तू. आणि पत्र तर ज्याला लिहिता वाचता येते, मन,बुद्धी भावना, विचार असतं त्याला लिहलं जातं. आणि हो! आजकाल तर कोणालाच फारशी पत्र बित्र लिहून पोस्टातून पाठवली जातं नाहीत. डिजिटल आणि संगणक युग आलंय न? हातात पेन शाई टाक असलं काही घेऊन स्वअक्षरात दुसऱ्याला पत्र लिहायला कोणाला वेळ आहे आणि आवडतंय! त्या पेक्षा एक फोन केला की

झटपट कामं होतं किंवा चक्क तासभर देखील गप्पा गोष्टी रंगतात. मनातलं सांगता बोलता येते आणि त्याला प्रतिसाद देखील लगेच मिळतो. पण अरे झोपाळ्या मला असा प्रतिसाद अपेक्षितच नाहीये तुझ्याकडून! मला फक्त माझ्या मनाततली तुझ्या बद्दलची असलेली कृतज्ञता तुला सांगविशी वाटतेय.

 

तुझी खूप आठवण येते रे . तसा तू मनात कायम असतोसच. किती वर्षाचा सहवास आपला! तब्बल पंचांहत्तर वर्षाची साथ आपली. जन्माला आलेलं अपत्य नामकरण वीधी करतेवेळेस हमखास पाळण्यात घालतात. किंवा वर खेळणा बांधलेल्या

झोपाळ्यात बाळाला झुलवत बारस पार पडत. अर्थात माझं बारस देखील त्यांचं पद्धतीने पाळण्यात घालून झोके देत केलं गेलं हे ही थोडी मोठी झाल्यावर आईकडून समजलं. अर्थात त्या वेळेस फोटो प्रत काढणं, क्षणचित्र जपून ठेवणं असली सुविधा नव्हतीच म्हणा. पण माझी तुझ्याशी गट्टी मात्र त्या बालवयातच जमली असणार.घरात आजी आत्या असं कोणी नव्हत तेंव्हा आई तीची गृहकृत्त्य उरकताना मला कायम पाळण्यात घालून ठेवत असणारं आणि जाता येता

पाळण्याची दोरी ओढून माझं रडं आवरत असणार. आणि मी देखील तुझ्या त्या त्या मंद आडुळण्याने शांत झोपी जात असणारं!

 

नंतर तुझी सोबत दर में महिन्याच्या सुट्टीत कान्हूरला माझ्या आजोबांकडे, आईच्या बाबांकडे गेलं की मिळायची भरपूर! जोडीला असायची मावस भावंड, मावश्या आणि आजोबा. म्हणजे नाथुकाका! तुझे आणि वाड्यांचे रुबाबदार मालक. कधी कोणी सोबत नसलं तरी माझी सुट्टी मात्र अहोरात्र तुझ्यावर स्वार होऊन मजेत

जायची. काय तुझं ते देखणं रूप! पितळी चकाकत्या नक्षीदार कड्या. लांब रुंद आठ जणं एकावेळे आरामात बसतील असा सागवानी पाट. एकटी बसलेली असले की मस्त हवा तितका तुला वर चढवायची. गाणी म्हणायची. तुझं बस्तान होतं त्या भल्यामोठया खोलीत पिकत घेतलेल्या आंब्याच्या आढ्या घातलेल्या असायच्या. त्याचा मधूर गन्ध सभोवार दरवळत असायचा.त्यात तुझ्या लयबद्ध हालचाली! अशी मजा वाटायची म्हणून सांगू. कोणी सोबत असो नसो मी सदा तुला पकडणार.

 

आणि हो! मला एकही सक्ख भावंडच नव्हत.ती घरात अन्य भावडांची कोणी सोबत नसल्याची खंत मी तुझ्यापाशी सांगायची. शाळेतल्या गमती जमती तुझ्या कड्याना कुरवाळत सांगायची. माझी आई देखील जवळ नसायची.घरच्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ती नोकरी निमित्ताने वारंवार बाहेर नोकरीच्या ठिकाणी रहायची. घरी मी आणि बाबा. इतकंस कुटुंब. सोबत,माया, प्रेम द्यायला, गप्पा खेळ करायला सोबतीला कोणीच नसायचं.

आईची सोबत कधी नव्हतीच! ती तक्रार, ते दुःख मी तुझ्या अंगावर माझ्या कधीच न पाहिलेल्या दिवंगत आजीची नऊवारी साडी पसरून बुडवू पहात असे. रात्री झोपायला सारी मावसभावंड खाली जमत. आजोबांच्या कडून रसाळ भाषेत गोष्टी ऐकत तिथेच झोपी जातं. आणि मग मी हळूच उठून तुझ्या झुलत्या लयीत वरून झरणाऱ्या चांदण प्रकाशात येऊन झोपायची. मी आजही जेव्हा जेव्हा पूर्ण चंद्राकडे पाहते तेंव्हा त्या वर मला एक हिरवगार झाडं दिसतं. त्यांच्यावर झुला बांधलाय आणि त्या झुल्यावर एक लहान गी मुलगी खुशीत झोके घेताना दिसतं.ती मुलगी म्हणजे मीच असते खरं तर.

 

आमच्या नुतन मराठी विद्यालयात मुलांसाठी घासरगुंडया, झोपाळे भरपूर, फिरती चक्र असं काय काय असायच. पण मधली सुट्टी झाली की मी खाऊचा डबा अर्धवट टाकून धावत एखादा झोपाळा पटकवायची आणि पार आभाळाला पोचेल इत्यादी ताकदीने जोर लावून दणादण झोके घ्यायची. अहाहा…! काय मस्त वाटायचं. जणू तू म्हणजे घोडा आणि मी त्यावर स्वार झालेली महाराणीच! त्या वेगाचा हेवा आणि भय माझ्या मैत्रिणींना वाटायच. पूर्वी जर झोका वेगात उंच चढवायची स्पर्धा घेतली गेली असती तर दर वेळेस माझाच पहिला क्रमांक आला असता.

 

शाळा सरली!अन आले महाविद्यालयीन शिक्षणाचे दिवस….

वय वर्ष सोळा सरलेलं. नवी स्वप्न, नवी हळुवार भावना आता माझ्या मनाच्या झुल्यावर स्वार होऊन झुलायची. कधी एखाद स्वप्न मला सातासमुद्रापार घेऊन जायचं. तर एखाद वास्तव हा स्वप्न झुला दाणकन जमिनीवर आणायची. पण त्यात देखील मला तुझीच लय सापडायची.पदवी परीक्षेचा निकाल लागला.पदवी प्राप्त झाली.तो दिवस आम्ही तीन जिवलग मैत्रिणींनी झोपळ्यावर बसून चार वर्षांच्या आमच्या सहवासाच्या, गमतीच्या आठवणीची उजळणी करत साजरा केला.

 

आमचं मैत्रिणीचं घट्ट त्रिकुट होतं. पैकी कल्पनाला पुढे शिकायचं नसल्याने बाईसाहेब लौकर बोहल्यावर चढल्या. आणि बाळाची चाहूल लागताच तीचं तिला झोपळ्यावर बसवून साजर केलेलं डोहाळेजेवण आम्ही खूप एन्जॉय केलं. अजून त्ते मोरपंखी दिवस आणि तो सजवलेला झोपाळा आठवतो.

 

मी एम ए झाले. मेरिटला आले. पहिली नोकरी, पहिला पगार आणि हो… जीवनात झालेला तो प्रिय सख्याचा प्रवेश सारं काही पहिलं वहीलं मी एखाद्या बागेतल्या, विद्यापीठातील झुल्यातल्या गतीबरोबर साजर केलं.कधी एकटीने तर कधी आम्ही दोघांनी. आमची स्वप्न आम्ही मिळून तुझ्या सोबतीने रंगवली. सत्यात उतरवली. म्हणून आता या वायात देखील मला तू कुठे दिसलास की राहवत नाही. माझी स्वतः आई बाबा झालेली मुलं आणि नातवंड तुझ्याकडे धाव घेतात तशीच मी पण तुला सोडत नाही. आता या वयात देखील असाच झोका उंच न्यायचा असतो मला. यांना मात्र हल्ली झोका घाबरवतो. वेग सहन होतं नाही

अरे झोपळ्या तू माझं कुटुंब झालास, भावंड झालास, कधी आई होऊन मला आंदूळलस तर कधी मी माझ्या हाताचा, मांडीचा झोका करून माझ्या मुलांना नात वंडाना, निजावलं, रिझवलं.

तुझी खूप कृतज्ञ आहे मी.

तुझी बालमैत्रीण आणि आताची ज्येष्ठ सखी आजी

 

 

@अंजना कर्णिक, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा