कासार्डे येथे अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला
कणकवली
कासार्डे कोहिनूर देशी दारू दुकानाच्या नजीक मुंबई गोवा महामार्गालगत बुधवारी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास ३५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह मिळून आला. या घटनेची माहिती कासार्डे पोलीस पाटील महेंद्र सदाशिव देवरुखकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे.
कासार्डे कोहिनूर देशी बार शेजारी श्री गांगेश्वर चायनीज सेंटर जवळ एक अनोळखी व्यक्ती पडला असून त्याची काहीही हालचाल होत नसल्याची माहिती कासार्डे पोलीस पाटील यांना गुरुनाथ कल्याणकर यांनी फोनवरून दिली. त्यानंतर पोलीस पाटील तेथे जात याबाबतची खबर कणकवली पोलिसांना दिली. कणकवली पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार चंद्रकांत झोरे आदींनी तेथे धाव घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत असल्याचे सांगितले. त्या अनोळखी मृतदेहाच्या अंगावर चॉकलेटी व पिवळसर रंगाचे चौकटी फुल शर्ट, निळ्या रंगाचे पॅन्ट, रंग सावळा उंची ५ फूट असे त्याचे वर्णन आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणालाही माहिती मिळाल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.