You are currently viewing लंच ब्रेक…!

लंच ब्रेक…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*लंच ब्रेक…!*

—————————

रात्रीचे दहा वाजलेत . शहरातील शासकीय रूग्णालयात दहा/बारा मुले अत्यवस्थ आहेत . शाळेची मुख्याध्यापिका असल्याने ही मुले माझीही जवाबदारी असल्याने मी ही रूग्णालयात थांबून होते . मुलांचे आई वडील तर चिंताक्रांत तर होतेच पण माझीही चिंता काही कमी नव्हती . उलट मला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते .होय दुपारच्या मध्यान्ह भोजनानंतर मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता .मी मुलांना ताबडतोब रूग्णालयात दाखल तर केलेच , पालकांनाही सूचित केले होते .” मॅडम , असं घडलंच कसं , काय खाल्लं मुलांनी आज ” ” काय म्हणजे , खिचडी आणि उसळ होती आजच्या मेनूत .” ” मुलांना खायला देण्यापूर्वी तुम्ही किंवा तुमच्या शिक्षकांनी टेस्ट नाही केलं काय ? ” ” केलं ना , आमच्या शिक्षिका अरूंधती मॅडमने खाऊन पाहिलं थोडं .नंतरच मुलांना वाढलं . त्यांना त्रास नंतर झाला , तोपर्यंत मुलांची जेवणं आटोपली होती .त्याही खाजगी रूग्णालयात आहेत .” ” ते काही नाही , आमच्या मुलांच्या जीवावर बेतलंय .याची चौकशी झालीच पाहिजे . दोषींवर कार्रवाही झालीच पाहिजे .” पालकांचा सूर निघाला होता. तर काही पालकांनी पोलिस स्टेशनातही तक्रार दिली होती . या सगळ्याला सामोरं जायचं होतं मला .

दिवसभर भूक तहान विसरुन मी रूग्णालयात थांबून होते .

 

विशाखा , रात्रीचे दहा वाजलेत .मी येतोय रूग्णालयात तुला न्यायला. घरी मुले व आई बाबा चिंतेत आहेत.सगळं ठीक होईल . रूग्णालयात डाॅक्टर्स , नर्सेस  आणि मुलांचे आई वडील आहेतच. तू तुझे कर्तव्य केलेच आहेस . तुझ्या रूग्णालयात थांबण्याने परिस्थिती बदलणार आहे काय ? आपण डाॅक्टर्स च्या संपर्कात राहणार आहोतच. मी येतोय .”

 

इतक्यात डाॅक्टर आलेत राऊंडला  . ” काय म्हणताय आमचे छोटे उस्ताद ” डाॅक्टरांच्या या आपुलकीच्या वाक्यानेच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे सावट जाऊन थोडा उत्साह संचारला . ” व्हेरी गुड , काय बरं वाटतंय ना आता .घरी जायचंय काय ? ” ” होय डाॅक्टर अंकल ” प्रथमेश चौधरी बोलला. प्रथमेश इयत्ता पाचवीत शिकणारा दहा वर्षीय विद्यार्थी होता . नंतर निलेश , प्रकाश , प्रज्वल बरीच मुले आता बरं वाटत आहे सांगत होती . बारा पैकी दहा मुलांना डाॅक्टरांनी घरी नेण्यास परवानगी दिली . घरीच मुलांची काळजी घ्या . गरम व पचायला हलकं अन्न द्या दोन तीन दिवस . Now you are o k my little friends .take care .

मुलांना डिस्चार्ज मिळाला . मलाही थोडं बरं वाटलं . आता निकिता आणि वेदांत राहिले होते . त्यांना अजूनही अशक्तपणा वाटत होता त्यामुळे सलाईन चालू होते . डाॅक्टरांनी रूग्ण फाईलमध्ये औषधे लिहून देऊन नर्सला तशा सूचना दिल्या .

 

अशोक मला नेण्यासाठी रूग्णालयात आले . निकिता व वेदांतलाही भेटले . ” काळजी घ्या ” त्यांच्या पालकांशी बोलले , चल विशाखा , बराच उशीर झालाय . किती मलूल दिसतोय तुझा चेहरा . पाणी सुद्धा प्यायलेली दिसत नाहीस बर्‍याच वेळेपासून ” म्हणत अशोकने पाण्याची बाॅटल उघडून आधी मला पाणी प्यायला लावले . तशी मला थोडं बरं वाटलं . चहा आणू काय तुझ्यासाठी ” ” नको , अकरा वाजयला आलेत , आता कोठे मिळेल चहा , चला घरी जाऊ ” आम्ही निघालो .पण विचारचक्र माझी पाठ सोडत नव्हतं .

 

सरस्वती विद्या मंदिर माझी शाळा साक्षात सरस्वतीची उपासना करणारीच होती . चांगला हुशार , होतकरू , मेहनती शिक्षक व कर्मचारी वृंद हे माझ्या शाळेचं वैशिष्ट्य . शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव , संगीत , पोहणे , मैदानी खेळ , श्रमदानातून वृक्षारोपण व इतर विकासात्मक कार्यक्रम राबविणे , यामुळे शाळेचा नावलौकीक सर्वदूर पसरला होता .माझ्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड असायची , विशेष म्हणजे पटसंख्येअभावी बंद पडणार्‍या मराठी शाळा पाहाता आमची शाळा मात्र आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यासह नावलौकिक मिळवत होती .शाळेची पटसंख्या 425 होती ही खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती .माझ्या शाळेत गरीब परिस्थितील मुलेही भरपूर होती . मध्यान्ह भोजन ही तर त्यांची गरज होती .शाळेच्या निमित्ताने त्यांचं एकवेळचं भोजन होत असल्याने कुपोषणातून ही मुले बाहेर आली होती .

 

रोज दुपारी एक वाजता लंच ब्रेक व्हायचा .मुलांची शाळेच्या वर्‍हाड्यातचं अंगत पंगत व्हायची. तत्पपूर्वी शाळेतील एक शिक्षिका आधी ते अन्न ग्रहण करायची व मगच ते मुलांना वाढलं जायचं .कालपर्यंत सगळंच व्यवस्थित चाललं असतांना आज मात्र ही घटना घडली होती . मुलांना अन्न विषबाधा झाली होती .

 

“विशाखा उतर खाली . घर आलंय आपलं ” मी तंद्रीतून बाहेर आले .  ” नको इतका विचार करूस . सांभाळ स्वतःला . आजारी पडायच. काय तुला “” पणअशोक शाळेची प्रमुख म्हणून मलाच जवाबदार धरणार ना . चौकशीचा ससेमिरा माझ्याच मागे लागणार ना ” ” लागू दे ना चौकशीचा ससेमिरा . तू कशी काय दोषी असशील ?. अन्नधान्य खरेदी , अन्नधान्य पुरवठा करणारे , नंतर अन्न शिजविणारे केटरर्स , भली मोठी साखळी आहे ही .तुझा तर याच्याशी काहीही संबंध नाही . मग कशाला चिंता करतेस ” ” अशोक अजूनही दोन मुलं रूग्णालयात आहेत .मुले शाळेत पाच सहा तास असतात म्हणजे आम्हीही त्यांच्या आईच्या भूमिकेत असतो रे . माझं मन नाही लागत ” . ” बरोबर आहे तुझं . ती दोन्ही मुलंही उद्या डिस्चार्ज होतील . काही काळजी करू नकोस . झोप शांतपणे , दिवसभर खूप दमली आहेस ”

 

नेहमीप्रमाणे शाळेची प्रार्थना आटोपुन विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले.शाळेचं पुढील आठवड्यात  इन्स्पेक्शन होणार होतं . मी शाळेचा वर्षभरातील सगळा अहवाल नजरेखालून घालत होते कि शिपाई अर्जुन आला व पोलीस इन्स्पेक्टर भोसले चौकशीसाठी आल्याचे सांगितले . काही पालकांनी तक्रार नोंदवली होती .” पाठव त्यांना आत ”

मॅडम काल काही मुलांना मध्यान्ह भोजनानंतर विषबाधा झाली . त्यासंदर्भात चौकशीसाठी आलोय .

” या , बसा इन्स्पेक्टर ”

तर मॅडम ,शाळेला अन्न कोणत्या कोणत्या केटरर कडून येतं .?

प्रिया केटरर्स सर्व्हिसकडून ”

 

रोज मुलांना अन्न देण्यापूर्वी शिक्षिकांनी आधी ग्रहण केलं जातं काय ? ” होय , कालही अरुंधती मॅडम यांनी ग्रहण केलं होतं . त्यांनाही त्रास झाला . त्याही खाजगी रूग्णालयात आहेत . ” ” ठीक आहे मॅडम , पुढील चौकशी करतो आम्ही . तुम्हांलाही कळवू ” ओ के इन्स्पेक्टर ”

 

ही काही माझ्याच शाळेपुरती मर्यादित घटना नव्हती . अनेक ठिकाणी नित्कृष्ठ अन्न , केटरर्सचा हलगर्जीपणा ,अन्न शिजवतांना स्वच्छता न राखणे यानुळे असे प्रकार घडतात.कालच्या घटनेतही हाच प्रकार आढळून आला . दोषींवर कार्रवाहीपण होईल .पण मुलांचं काय ? माझ्या ओळखीतील एका गरजवंत काकुंना मी शालेय मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करणार काय म्हणून विचारलं ,” होय करीन कि मी , पण मला एवढे झेपेल काय ? ” काकू दोन तीन मदतनीस ठेवा ना .त्यांनाही रोजगार मिळेल आणि माझ्या मुलांना सात्विक घरगुती भोजन मिळेल . मी तुमचं नाव कळवते वरती .

 

आता लंच ब्रेक मध्ये मी ही मुलांसोबत असते .

 

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ”

 

मी खर्‍या अर्थाने जगत आहे .

——————————————

लेखिका—शैलजा करोडे ©®

नेरूळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा