*ज्येष्ठ साहित्यिका मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्य रचना*
*नाही येत शब्दांत मांडता……*
मनीच्या कुंदकळ्या हसतात
खुदकन तेव्हा…. समजावं
कोणीतरी आहे पाऊलवाटेवर….
तिष्ठत…. वाट पहात… उगीच,
ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर
पाय नसतात जमिनीवर
शैशवातलं अल्लडपण डोळ्यात
बाल्याच्या नसतं मावत
आईच्या कुशीतलं वात्सल्य, बाललेण
आता तारुण्याच्या जोष, उमेदीने
असतं बहरलेलं… मुसमुसलेलं
त्याला स्व अस्तित्वाची असते
ऊरी लागलेली चाहूल….,
सूर ताल प्रीत वेणूतूनी
राहतो निनादत… आसमंतात
कानी साद… प्रतिसाद, तेव्हा
कोणीतरी उगाचच अंतरीच्या
खोल गाभाऱ्यात…. कोपऱ्यात
कूपीच्या डोकावतय अधूनमधून
राहत असतं जाणवत तरी
मनाची भावना नाही उमजत
स्वतःला नाहीच मनालही……..!
त्या प्रतिसादाला वेणूनादाच्या
वाटतं मनाला हुंकरावं… गोंजरावं
लाडिकपणे तिरक्या नजरेने
राहावं वाटतं उगीच न्याहाळत
एकांतात….. गुज करताना
अंतरीच्या नादाशी …. प्रतीमेशी वाटतं
करावं हळूच हितगुज…. जे जे काही
हृदयाच्या कूपीत साठवून ठेवलंय ते…
करावं मनसोक्त मुक्त मनमोकळ
व्हावं….. मनोभावनांच गाठोड
उघडून अलवार भावनांचे शिंपण
त्या प्रतिसादाला प्रीतीत चिंब चिंब
भिजवून टाकावं…….
हृदयाच्या कप्प्यात दडलेल भावविश्व…
स्वप्नांची नगरीत….. प्रीत झुळूकीने झंकारलेली….. दुनियेत त्या मारावा फेरफटका…. पुन्हा परत शिरून त्यात
अनुभवावी प्रेमाची बरसात….
पण… पण, नाही ना सांगता येत
ते नातं… अधरावरच हृदचा भावनास्रोत मात्र
राहतो….. निःशब्द होऊन… शब्दातीत
भाव नयनांतून राहतात पाझरत…..!!
*मानसी जामसंडेकर, गोवा*