निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन
- नागरिकांनी दक्ष राहावे
- कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो
- फोनवरून संपर्क केला जात नाही
- ऑनलाईन रक्कम भरू नये
सिंधुदुर्गनगरी
कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन / सुधारित निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो.
याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणांस दूरध्वनी / भ्रमणध्वनीवरून उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्याकडून करण्यात येत आहे.