*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*२१) माझे गाव कापडणे….*
पूर्वी जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी
कापडण्याच्या स्टॅंडवर उतरले की पदर सावरत
फरशीवरून पायी पायी धरी जात असे.नंतर गाडी आल्यावर थेट दारात गाडी लागत असे. पण मी चालत येत असे तेव्हा मला आजुबाजुला बऱ्याच बालपणीच्या खुणा दिसत. मला बघताच जिलबीवाला भाऊ (गुळाची) म्हणायचा, ओ बाई, भाऊनी आंडेर से
ना बैन, मंग जिलबी लई जायना हुनी हुनी.. आत्तेज काढेल से देख! मग मी आईसाठी थोडी
जिलबी ताजी ताजी शेव बांधून घ्यायची. चटका लागेल अशी ती जिलबी खाण्यात मला
तर स्वर्गिय सुख मिळायचेच पण आईच्या निमित्ताने माझी ही मजा होई.
मग मी ती पिशवी हळूवारपणे सांभाळत तिथल्या उंचावरच्या पाण्याच्या मोठ्या”हाय”
वरून बघत बघत जातांना मला बालपणीच्या
किती तरी गोष्टी आठवल्या.बहुतेक महिला पाटीत धुणे भरून नदीवर किंवा हाय वरही कपडे धुवायला येत असत. घरोघरीच्या सुना
कपडे धुवायला येत असत. भात नदी तशी बारा
महिने वाहणारी नव्हतीच. त्यामुळे हायवर यावेच लागे.मी तशी २/४ वेळाच गेली असेल
हायवर. कारण तिथे गर्दी फार असे. अगदी नुकत्याच लग्न झालेल्या नववधूं पासून बऱ्याच
जणी कपडे घेऊन येत.काही जणी नदीवरही
जात असत. मी पण काकूबरोबर कपडे धुवायला जात असे. धुणे कमी नि डुंबणेच जास्त! वाळूवर कपडे वाळवायला मदत करत
असे.
खरे म्हणजे ही ठिकाणे म्हणजे बायकांची हमखास मनोरंजनाची ठिकाणे किंवा विरंगुळ्याची हक्काची जागा म्हटली तरी चालेल.कारण घरात सासूचे दडपण, नवरा कामावर गेलेला.दोन शब्द मनमोकळे बोलणार
तरी कुणाशी? सासू नणंदांशी काय बोलणार?
त्या तर कायम टेचात! मग बायका धुणे धुताधुता खुसुर खुसुर आवाजात एकमेकींशी
बोलत व मन मोकळे करत. क्वचित नवरोबाच्या गप्पा असतील तर गालावर हसू
ही दरवळे, लाजून चूर होत गप्पा रेंगाळत असत.एखादी डोळ्याला पदर लावी व इतर तिची समजूत काढत असत. लहान होते तरी ते
प्रसंग, त्या महिला, त्यांचे चेहरे व आविर्भावही
मला आजही डोळ्यांसमोर दिसतात.हळू हळू कपडे पिळायचे, पाटी भरायची, एखादी घागर स्वच्छ घासून लालभडक करून (तांब्याच्या
घागरी असत ना?)पाण्याने भरून घ्यायची व खालमानेने घरचा रस्ता धरत असत. सुनेने मान वरून बघणे..? अबब! महापाप बरं! “माय वं,
काय मटमट दखसं हो त्या आमका आमकानी व्हवू”! लगेच घरापर्यंत वार्ता आलीच म्हणून समजा! मोठा कठीण काळ होता तो. परंपराच तशा होत्या. १९६८ साली मी सुद्धा ओटा झाडायला बाहेर आली नाही.कारण समोरासमोर घरं असतात खेड्यात.ओट्यावर
रिकामटेकडी माणसं बसलेली असतात चकाट्या पिटायला, पत्ते खेळायला. हो! पुरूषांना सर्व मुभा होती व आहे.बायकांना बसू द्या बरं? केवढं वादळ येईल? न जाणो गाव ना वाहून जाए त्यात! असो…
अशा बारीकसारीक गोष्टी आठवतात बघा.मग मी पिशवी सावरत
घरात प्रवेश करताच आईचा चेहरा खुलायचा,
“ मंग, इ लागनी माय तू? मायवं, बर व्हयनं माय,
मी आई जवळ बसायची. तिच्या डोळ्यात हसू
मावत नसे.तिचे ते गोड हसू अश्रू बनून गालावर
ओघळायचे! किती आठवणींचा खजिना असतो हो माणसाजवळ ?
मी लहान असतांना दारावर मोठ्ठया उंच काठीला रंगीबेरंगी घट्ट गुळाचा पाक गुंडाळून समोरच
घड्याळ, हरीण, सायकल अशा पाकाच्या गुंडाळीतून पाक ओढून घेत तो विकणारा क्षणार्धात नवनविन वस्तू बनवून हातात देत असे. फार
अद्भूत वाटायचे ते ! थोडावेळ ते घड्याळ हातावर मिरवायचे, आजूबाजुला दाखवायचे नि मग मटकवायचे! कित्ती सौख्य होतं हो या
छोट्या छोट्या गोष्टीत. तिच गोष्ट बुढ्ढीका बाल वाल्याची. त्याची घंटी किणकिणली की
धावलोच आम्ही! अहाहा! काय पण अफलातून चव आहे हो त्याची. हाताचा स्पर्श
होताच त्याचे पाणी होते. जीभेवर तर असा काही विरघळतो की केव्हा संपतो तेच कळत
नसे. वाटायचे २/४ तरी खावे पण कधी हिंमत
झाली नाही. तोच कुल्फीवाल्याची गाडी यायची. गाडा लोटत घंटा वाजवत हो हळू हळू
चालायचा. त्याची घंटा हीच त्याची ओळख !
बोलायचे कामच पडत नसे. पोरांचा गराडा पडला की मग पेन्सिली सारख्या लांब पत्र्याच्या नळीतून पाण्यात ती नळी बुडवत एक
एक कुल्फी काढायचा तोवर इकडे आमची लाळ गळायची. हलकेच त्याने काडी हातात देताच .. वाह वा गारेगार गोडगोड मुलायम असा जिभेला होणारा स्पर्श लाजवाब…
“खाये तो जाने”! काडी अगदी शेवटपर्यंत चाटत मजा मजा? कधी कधी बदकन् तुकडा
खाली पडताच असा जीव जायचा की विचारू
नका.आता ही तोंड हुळहुळले पहा आठवणीने!
आमच्या घरी मला कलर ब्लाईंडनेस आहे असे
गमतीने म्हणतात. त्यांना काय माहित की त्या
मागे काय रहस्य दडले आहे ते! लहानपणी सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान माळी वाड्यातील माळीण तिच्याच शेतातील हिरवीकंच अशी घमघमणारी कोथिंबीर व तशीच हिर्वीगार लांब देठाची मिरची पाटीत घेऊन…” न्निय्या मिरच्या ल्यावंऽऽऽऽ” असा
खणखणीत आवाज द्यायची. आता वर्षानुवर्षे
हा न्निय्या मिरच्या ल्यावं हा आवाज आताही तितकाच डोक्यात फिट्ट असतांना मंडळी मी
हिरवी मिरचीला किंवा कोणताही हिरवा रंग
दिसला तरी मी निळाच म्हणणार ना? मला पक्कं माहित आहे हा हिरवा रंग आहे तरी मी आधी निळा मग सावरून त्याला हिरवा म्हणते.
बघा, किती छान आहे माझा नसलेला कलर
ब्लाईंडनेस! ह्यांना काय कळणार त्याचे रहस्य?
ते गुपित फक्त मला माहित नि माझ्या खानदेशवाशी बांधवांना! इतरांना कळणे ते शक्यच नाही.आणि कलर ब्लाईंडनेस काय फक्त एकाच रंगाचा असतो काय? माझा प्रश्न
फक्त एकाच रंगाचा आहे.
कापडणे गांव खूप मोठे आहे. विक्रीला चांगली
बाजारपेठ आहे.त्यामुळे सोनगिर सरवड देवभाने येथिल विक्रेते आपला माल भरून कापडण्याला व्यवसाय करतात व संध्याकाळी
माल खपला की परत जातात. सोनगिरचे भांडी
विक्रेते डाळ्या फुटाणेवाले भोई सारेच कापडण्यात येतात. त्यामुळे” दाया फुटाना ल्या वंऽऽऽऽ” अशी आरोळी येताच मी अक्काच्या मागे लागत असे.मला ते पिवळे कडक कडक काबुली फुटाणे फार आवडतात.
अजुनही आवडतात. खाऱ्या हळदमीठ लावलेल्या डाळ्याही मस्त लागतात. आज काल मिळत नाहीत. दोंडायचे भागात मी जाते तेव्हा आवर्जुन डाळ्या फुटाणे टरबुज खरबुज घेते. आमच्या कमखेड्याला साखरपेटी काय भारी मिळायची! सर्वच गेले आता. नद्या आटल्या, डांगरवाड्या गेल्या, इंजेक्शनचे लाल
टरबूज खायची हिंमत होत नाही आता. कुठे चाललो आहोत आपण?
ह्या दिवसात गौराईंची मज्जा. ती लाकडी गौर,
त्या डांगर टरबूजच्या बियांच्या माळा. खोबऱ्याची माळ, त्या टिपऱ्या, ते पाणी भरायला जाणे, माहेरवाशिणींनी गाव गजबजणे, ते झोके, त्या नऊवारी साड्या, ती नदीवरची भांडणे, सारेच अद्भूत होते हो! डोळ्या समोरचं दिसते ना हो? आईने मला कधी नदीवर जाऊ दिले नाही. गौर मात्र मी बसवायचे.माळा करायची.टिपऱ्या खेळायची,
आईची नऊवारी नेसायची, केवढा मोठा तो बोंगा दिवसभर मिरवायची. झोके ही बांधलेले
असत..
“खडक फुटना कैरी तुटनी
झुयझुय पानी व्हाय वं
झुयझुय पानी व्हाय तठे
रत्तन धोबी धोय वं…
“आथानी कैरी तथानी कैरी
कैरी झोका खाय वं
कैरी झोका खाय तठे
रत्तन धोबी धोय वं …
रत्तन धोबी धोय तठे
कसाना बजार वं
रत्तन धोबी धोय तठे
तोडासनां बजार वं…
तोडा बी ग्यात नि धोबीबी ग्यात, बजार आते
बाझार व्हयनांत, मॅाल व्हयनात, बठ्ठी मज्या
चालनी गई भाऊसहो …काय करो सांगा?
तुमले मनम्हानं सांगो नि मन हलकं करी लेवो नि दुसरं काय?
धन्यवाद मंडळी…
जयहिंद.. जय महाराष्ट्र…
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक.
(९७६३६०५६४२)