पुणे :
देह जावो किंवा राहो असा निश्चय करावा ।
तुकारामासारखाच ग्रंथ जीवनाचा व्हावा ॥
जीवन जगत असताना मनुष्याने सत्य आणि निर्भीड जीवन जगले पाहिजे. महिलांचा अपमान होणारे साहित्य फेकून दिले पाहिजे. असे परखड विचार ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी व्यक्त केले. ते जाणीव फाउंडेशन आयोजित दोन दिवसांच्या पुणे बुद्धा फेस्टिवल २०२४ मध्ये साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या १८५ व्या बुद्ध कवीसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे बोलत होते.
यावेळी विनोदातून प्रबोधन करणाऱ्या सामाजिक आशयाच्या कवितांनी बालगंधर्व रंगमंदिरातील उपस्थित मान्यवर आणि काव्य रसिकांनी सर्वच कवींच्या काव्य सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. सर्व मान्यवर कवींचा सन्मान सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
बुद्ध कवी संमेलनामध्ये निमंत्रित म. भा. चव्हाण यांनी सामाजिक जाणीवेच्या गझल आणि रुबाई, विनोद अष्टुळ यांनी सोळा ऑगस्ट ओरडला. स्वातंत्र्यावर भाष्य करणारी वास्तवादी, किशोर टिळेकर यांची मरणावर प्रकाश टाकणारी, सूर्यकांत नामूगडे यांनी अंधश्रद्धेवर घाला घालणारी, बाबासाहेब जाधव यांनी छत्रपती शिवाजी आणि बाबासाहेबांची प्रेरणा देणारी, राहुल भोसले यांनी बुद्ध विचारांची कविता आणि गोपाळ कांबळे यांची बाबासाहेबांच्या जीवनावरील, अशा दर्जेदार कवितांनी रसिकांचे मने जिंकली.
कवी संमेलनाचे प्रास्ताविक गोपाळ कांबळे यांनी तर प्रबोधनात्मक बहारदार सूत्रसंचालन साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी केले.