*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*भय इथले संपत नाही*
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांना अपघात झाला असताना ते रुग्णालयात दाखल झाले होते आणि तेथूनच त्यांनी *भय इथले संपत नाही* ही कविता लिहिली होती.
*भय इथले संपत नाही*
*मज तुझी आठवण येते*
*मी संध्याकाळी गातो*
*तू मला शिकविली गीते*
किती साधे सत्य आहे हे. आपल्या अवतीभवती चे भय कधी संपत नाही आणि अशावेळी आपल्याला अतिशय प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुलाला आईच्या कुशीत सुरक्षित वाटते, पुढे मोठे झाल्यावर जोडीदारासोबत मनातली भीती चेपते आणि म्हातारपणी मुलांबरोबर आपण सुरक्षित आहोत असे वाटू लागते. थोडक्यात आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माणसाच्या अवती भोवती भीतीचा वावर असतोच.
जीवन हे अतिशय सुंदर आहे, परंतु त्या सुंदर जीवनाच्या टप्प्याटप्प्यावर भय कुठे ना कुठे दडून बसले आहे. नऊ महिने मातेच्या गर्भात वाढलेला जीव जेव्हा बाहेरच्या जगात प्रवेश करतो तेव्हा तेथील प्रकाश पाहून, आवाज ऐकून तो इवलासा जीव घाबरतो, भेदरतो आणि म्हणूनच जीवनाच्या प्रवेशद्वारातच तो रडत येतो. मातेच्या कुशीत शिरल्यावर मात्र त्याला सुरक्षित वाटते, तेव्हाच तो रडायचा थांबतो.
मुले मोठी होतात, सवंगड्यांसोबत खेळत असतात. आनंदात असतात. पण खेळता खेळता पडण्याची भीती! कुठे पाय मोडेल, खोक पडून रक्त येईल अशा प्रकारचे भय सोबत आहेच.
विद्यार्थीदशेत जीवन किती आनंदाचे! पण हुशार विद्यार्थ्याला त्याचा वर्गात येणारा पहिला नंबर टिकविण्याची सतत चिंता तर साधारण बुद्धीच्या विद्यार्थ्याला तो परीक्षेत नापास तर होणार नाही ना याची मनात भीती. सध्याचे जग हे अत्यंत चुरशीचे आहे. अगदी सतत ए ग्रेड मिळविली असली तरी उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापिठात प्रवेश मिळेल की नाही ही भीती मनात घर करून बसलेली असतेच.
या भूतलावरचे भय कधी संपतच नाही. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे. सोळाव्या/ सतराव्या शतकात चांगले रस्ते नव्हते, वाहने नव्हती.प्रवास करायचा झाला तर घोड्यावरून, बैलगाडीने नाहीतर चालतच. काशी यात्रेला गेलेला माणूस घरी परतून येण्याची शक्यता फार कमी. त्यामुळे जो कोणी घरी परत येत असे त्याच्या घरी गंगापूजनाचा धार्मिक विधी संपन्न होत असे. आज परिस्थिती तशी राहिली नाही. जलसेवा, भूसेवा, वायुसेवा अशा विविध सेवा आज उपलब्ध आहेत. व्यापारी नौकांमुळे जगभरातील व्यापार वाढला आहे. रेल्वे, दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी अशी सर्व प्रकारची वाहने दिमतीला असल्यामुळे वाहतूक वाढली आहे. माणसे त्वरित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि वायुसेवा तर काय? विमानाचा प्रवास फारच जलद! आज माणूस भारतात असेल तर उद्या इंग्लंड /अमेरिकेत तो सहज पोहोचतो. पण! *भय इथले संपत नाही*! रेल्वेचे, रोडवरचे कितीतरी अपघात रोज कानावर येतात. विमानांच्या अपघातात तर एकाच वेळी शेकडो जीवांची प्राणहानी झालेली असते. वर्तमानपत्र उघडले तर एक दोन अपघाताच्या बातम्या सापडतातच.
व्यापार करा, नाहीतर नोकरी करा. व्यापारात नफा /नुकसान आहेच. नोकरीच्या ठिकाणी कधी बढती मिळते तर कधी कंपनी बंद पडली तर सारेच संपले.
घरात चोरी होण्याची भीती. आपण सुरक्षा ठेव म्हणून पैसे बँकेत ठेवतो, दागिने लॉकरमध्ये ठेवतो, पण किती वेळा बँका बुडल्याच्या बातम्या आपल्याला समजतात. कितीतरी लोक शेअर बाजारात पैसे गुंतवून संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. पैसे मिळतातही, शेअर्सचे भाव एकाएकी घसरले की कपाळावर हात मारण्याची पाळी येते.
नैसर्गिक आपत्तींबद्दल काय बोलावे? शेतकरी बियाणे पेरतात, रोपे उगवतात, शेते डोलू लागतात, कणसात दाणा भरतो आणि अचानक अवकाळी पावसाने सर्व उद्ध्वस्त होते. कधी अतिवर्षा तर कधी दुष्काळ, वादळी वारे, त्सुनामी, भूकंप अशा निसर्ग कोपामुळे कित्येक गावे, शहरे यांची वाताहत होऊन असंख्य जीवितहानी झाल्याची उदाहरणे सर्वांना माहीतच आहेत.
गुलाबाची फुले तोडताना हाताला काटे टोचण्याचे भय असणारच नाही का? पण म्हणून गुलाब तोडायचेच नाहीत का? जीवन जगायचे. संकटे येणारच, अडचणी उद्भवणारच. त्यांना शिताफीने सामोरे जाऊन जीवनातील आनंद लुटायचा. भीतीचा बागुलबुवा नाही करायचा. आजचा दिवस आपला आहे, उद्याचे काय माहित?
*भय इथले संपत नाही*
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन