You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील सर्व वीज वाहिन्या “अंडरग्राउंड” करा – एकनाथ नाडकर्णी

दोडामार्ग तालुक्यातील सर्व वीज वाहिन्या “अंडरग्राउंड” करा – एकनाथ नाडकर्णी

दोडामार्ग तालुक्यातील सर्व वीज वाहिन्या “अंडरग्राउंड” करा – एकनाथ नाडकर्णी

दोडामार्ग

इन्सुली सबस्टेशन वरून दोडामार्ग तालुक्याला वीज पुरविणाऱ्या सर्व वीज वाहिन्या अंडरग्राउंड करा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे. शिवाय हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी न लागल्यास तालुक्यातून एकही विजेचे बिल भरले जाणार नाही. प्रसंगी महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे नमुद केले आहे की, दोडामार्ग तालुक्यात गेल्या ४८ तासांहून अधिक काळ विजेचा पत्ता नव्हता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केल्यानंतर तालुक्यातील गावागावांत वीज आली. दोडामार्ग तालुक्याला येणारी वीज ही इन्सुली येथून सासोली या सबस्टेशनला येते. मात्र ही येणारी लाईन जवळपास ५० वर्षे जुनी असून जंगल व डोंगर भागातून येते त्यामुळे ही सर्व लाईन रस्त्याच्या बाजूने चांगल्या प्रतीच्या केबलद्वारे अथवा अंडरग्राउंड पद्धतीने द्यावी व तालुक्याला भेडसावणाऱ्या बत्ती गुलच्या समस्येपासून सुटकारा द्यावा. असे यात म्हटले आहे.
नाडकर्णी यांनी पुढे म्हटले आहे की, दोडामार्ग शहरासहीत संपूर्ण तालुक्यातील गावांगावाना सततच्या खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येने ग्रसले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता अपुऱ्या साधन सामुग्रीची असुविधा, सासोली तसेच साटेली-भेडशी या सबस्टेशनपर्यंत इन्सुली येथून घनदाट जंगलातून आलेल्या वीज वाहिन्यांचे जाळे आदींमुळे दोडामार्गवासियांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही. अलीकडेच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील बाजारपेठेतील व्यापारी हॉटेल व्यावसायिक, शीतपेय गृहे, सुपर मार्केट, आदींनी महावितरणा विरोधात संताप व्यक्त केला. इन्सुली येथून ३३ केव्ही ने सासोली व कोनाळकट्टा येथील सबस्टेशनला विद्युत पुरवठा होतो. हे अंतर ५५ ते ६० किलोमीटर असल्याने या दोन्ही उपकेंद्रावर विद्युत पुरवठा होईपर्यंत ३३ केव्हीचा हा पुरवठा कमी दाबाचा होऊन १५ ते २० केव्ही एवढा होत आहे. या कमी दाबामुळे विद्युत पुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत. अशा विद्युत पुरवठयामुळे घरगुती उपकरणे जळण्याची भीती आहे. तसेच बरीचशी विद्युत लाईन ही जंगल भागातून येत असल्याने अनेकदा काही कारणाने बिघाड झाला असता तात्काळ दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित राहतो. मागील काही दिवसांत असे प्रकार घडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐन उन्हाळ्यात दोडामार्ग तालुक्यात २१ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काल परवा ४८ तास बत्ती गुल झाली होती. त्यामुळे दोडामार्ग मधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी श्री. नाडकर्णी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा