नांदेड:
येथील प्रसिद्ध गझलकार, कवी, साहित्यिक जयराम धोंगडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय गोभणी ता. रिसोड जि. वाशिम यांचा सन २०२३ साठीचा ‘साहित्य माणिक पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. एकामागोमाग एक अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे.
कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा संग्रह, आत्मकथन, बालसाहित्य, नाटक, ललित (लेखसंग्रह) आणि गझलसंग्रह अशा नऊ प्रकारच्या साहित्य प्रकारातील उत्तमोत्तम साहित्यास ‘साहित्य माणिक’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी आलेल्या ११५ साहित्यकृतीमधून गझलसंग्रह प्रकारातील साहित्यासाठी गझलकार जयराम धोंगडे यांच्या ‘मी छंदी मी स्वच्छंदी’ या गझलसंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा साहित्य जगत या मासिकाचे साहित्य संपादक श्री भगवान राईतकर यांनी पाठविलेल्या निवडपत्रानुसार हा पुरस्कार मेहकर, जि. बुलढाणा येथे येत्या १६ जून २०२४ रोजी होणाऱ्या साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनामध्ये समारंभपूर्वक जयराम धोंगडे यांना प्रदान करण्यात येणार असून साहित्यप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.