*ज्येष्ठ पत्रकार संपादक लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित व्यक्तिविशेष लेखमाला*
*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- विलास फडके*
वडगाव मावळ मधील कान्हा फाटा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या व्हिजन सिटी, जांभूळ इथे 9 ऑगस्ट 2014 रोजी पेण (रायगड) ला रामराम करून ते आले.
मात्र, इथे वस्तीच फारशी नसल्याने सामाजिक कार्याचा प्रश्नच आला नाही. सध्या लेखन हाच त्यांचा उद्योग आहे. गेली दोन वर्ष ह्या परिसरात वर्तमानपत्रही येत नाही. मोबाईलवर वाचणे आवडत नाही. पुण्यात जातात तेव्हा पुस्तक खरेदी होते.
आडवळणी, आडमार्गी रहात असल्याने त्यांचा जनसंपर्क तुटला आहे.
एव्हढा मोठा साहित्यिक आपल्या भागात आहे याची येथील साहित्यिक संस्थांना व्यक्तींना काहीच कल्पना नाही. वाहतुकीच्या गैरसोयी मुळे, वयोमानानुसार त्यांचे ही फार लांब जाणे होत नाही.
मराठी साहित्य मंडळ, पेण ह्या संस्थेचे ते माजी कार्यवाह व अध्यक्ष होते. त्यांनी पेण येथे जिल्हा साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन १९९६ मध्ये केले होते. आमची ओळख तिथेच झाली. त्यांचा स्वभाव संकोची, मितभाषी आहे हे तेव्हाच जाणवले.
1 जुलै 1964 ते 20 ऑक्टोबर 1970 ते भूविकास बँकेत होते. तिथे क्लार्कपासून ब्रँच मॅनेजर पदांवर काम केलं. रायगड (तेव्हा कुलाबा) जिल्ह्य़ातील जवळ जवळ सर्व डोंगरदऱ्या, शेताचे बांध त्यांनी कामानिमित्त पालथे घातले. चंद्रमौळी झोपड्यात गोणपाटावर बसून समोर येईल ते स्वीकारले. सर्वसामान्यांशी जवळीक साधली.
दि.22 ऑक्टोबर 1970 ते 30 सप्टेंबर 2006 एल.आय्.सीत. पहिले सहा महिने मुंबईत व नंतरची सर्व नोकरी पेण मध्ये झाली.
गरज आणि आवड म्हणून कामगार चळवळीत ते ओढले गेले. वेस्टर्न झोन (महाराष्ट्र-गुजरात-गोवा) संघटनेचे मुखपत्र आंदोलन पेणमधून त्यांनी सुरु केले. लेखन, संपादन-वितरण सारं काही पेणमधूनच होत असे.
पेणच्या म.गांधी ग्रंथालय-वाचनालयाच्या कार्यकारिणीवरही ते होते. काही काळ कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम केले. ग्रंथालयाचा सुवर्णमहोत्सव व पेण प्रायव्हेट हायस्कूल शतसांवत्सरिक महोत्सव ह्यांच्या स्मरणिकांचे संपादन केले.
नोकरीत असतांना व नंतरही पेणमधील सामाजिक क्षेत्रातही थोडीफार लुडबुड केली.
प्रकाशित साहित्यामध्ये स्वतंत्र कथा 54, अनुवादित कथा 82, स्वतंत्र लेख 79, अनुवादित लेख 4, एकांकिका 3, मासिके/दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या अनुवादित/ रुपांतरित कादंबऱ्या 21, कविता 95 पुस्तके 40 अशी विपुल ग्रंथसंपदा आहे.
त्यांनी आकाशवाणीवर कथाकथन व काव्यवाचन देखील केले. तसेच राज्य पातळीवर विविध स्पर्धात पारितोषिके मिळवली. अनेक कार्यक्रमात परिक्षक/अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
वडगाव मावळ जवळील जांभूळ गाव एखाद्या वाडीसारखे लहान आहे. त्यांनी मच्छिमार कोळी, निवृत्त सैनिक, वैद्यकीय व्यावसायिक इ.चे अनुभव समजून घेण्याचे खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. खरं तर सर्व व्यावसायिक, गृहिणीसुद्धा, विविध क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचारी ह्यांच्याकडे अनुभवांचे गाठोडे असते ते शब्दबद्ध झाले पाहिजे. विदेशात क्षुल्लक गोष्टीचाही गाजावाजा केला जातो आणि आपल्याकडे डोंगराएवढे कर्तृत्व अंधारात राहते. असे त्यांना वाटते.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468