SDRF बोट दुर्घटना… तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू; दोन जणांचा शोध सुरू
धुळे
इंदापुरातील भीमा नदीच्या पात्रात बोट बुडाली. यातील सहा जणांना शोधण्यासाठी एनडीआरएफची (NDRF) टीम या ठिकाणी आली होती. या टीमने सारे मृतदेह शोधले.
परंतु त्याच वेळी एक आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफच्या (SDRF) पथकातील एक बोट बुडाल्याने दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या धुळे येथील एसडीआरएफ पथकाची बोट आज सकाळी उलटली. या पथकातील चार जण आणि स्थानिक असे पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
धुळ्यातील तिघांचा मृत्यू
या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील पाच जण आणि स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे सहा जण बुडाले. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले यांचा शोध अद्याप सुरु आहे.
भोवऱ्यामुळे दुर्घटना झाल्याचा अंदाज
दरम्यान, सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावामधून पडणाऱ्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भोवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांसह अकोले तालुक्यातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.