पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का ? आरोपीचा वकील पवार कुटुंबियांचा जवळचा
*आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट
*उद्धव ठाकरेंचा शेमड्या पोरासारखा रडीचा डाव ; पराभव स्वीकारा
कणकवली :
पुणे हिट अँड रन प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे गप्प का ? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही ? अगरवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय ? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची माहिती मिळेते आहे.म्हणजे अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का ? त्यामुळे एरव्ही सर्व प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्त व्हावे असेही नितेश राणे यांनी सुनावले. तर आशिष शेलार यांची तक्रार योग्य आहे. 4 जून ला एनडीए चा मोठा विजय होणार हे स्पष्ट आहे. शेमड्या मुलासारखे उद्धव ठाकरे वागत आहेत. तुमचा पराभव स्वीकारा असे खडेबोल आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना सुनावले.
आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा चांगला समाचार घेतला त्यात प्रमाणे उद्धव ठाकरे यांचेवर सुद्धा टीका केली.ते म्हणाले,निवडणूक आयोगामुळे मतदान कमी झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड करत आहेत. हेही हास्यास्पद आहे. मुंब्र्यात बोगस मतदान होते याकडे आव्हाड यांनी पहावे. रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक किती प्रमाणात मतदान करतात आणि हे बोगस मतदान कोण करून घेतो त्यावर आव्हाड यांनी बोलावे.राजकीय जाणकार जे भाजपाच्या 250 किंवा 300 ह्या संभाव्य आकडेवारीवर भाष्य करताहेत त्यांना 4 जुनलाच मतपेटीतून उत्तर मिळेल. अशीच आकडेवारी 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा सांगितली जात होती मात्र जनता ही नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे आणि कायम राहील हे मतपेटीतून दिसून येईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या 6 जून रोजी च्या दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की काहीही झाले तरी मराठा आरक्षण महायुती सरकार देणारच आहे. कोणत्याही आरक्षणात धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाणार आहे.लोकशाहीत आंदोलनाचा हक्क प्रत्येकाला आहे.त्यांनी ते करावे.भाजपाच्या बड्या नेत्याने विनायक राऊत यांना निवडणुकीत 50 कोटी दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की विनायक राऊत यांचा पराभव समोर असल्यानेच भास्कर जाधव असे आरोप करत आहेत. विनायक राऊत यांच्या प्रचाराला संजय राऊत का आले नाहीत ? उबाठा मध्ये एकमेकांचे पाय ओढले जातात, भाजपात नाही. काँग्रेस नेते,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते किंवा स्वतः शरद पवार प्रचाराला का आले नाहीत. त्यामुळे विजय हा भाजपचाच होणार राणे साहेब विजयी होणार गुलाल आम्हीच उधळणार अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सुनावले.