You are currently viewing जीवनात शिस्तीचे महत्त्व

जीवनात शिस्तीचे महत्त्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*जीवनात शिस्तीचे महत्त्व*

 

मी जन्मल्यापासून बघते, मी डोळे उघडताच मला प्रकाश

दिसला व नंतर ओळख झाली की तो सूर्यनारायण आहे.

तेव्हा पासून बघते आहे आज पंच्याहत्तर वर्षे झाली पण

त्याचा क्रम कधी चुकला नाही की त्याची सृष्टीक्रमानुसार

जी वेळ ठरली आहे ती बदलली नाही की तो आजारी पडला

म्हणून तो रजेवर गेला असे कधी झाले नाही.कोणत्याही कारणाने कोणत्याही सबबीवर तो रजेवर गेला नाही. तो दररोज आला नाही तर? या कल्पनेने ही आम्हाला कापरे

भरते इतका तो महान आहे पण तो कधीही नियमाबाहेर वागत

नाही.आमची दारे बंद असतांना हात जोडून दाराबाहेर उभा

असतो व आम्ही दार उघडताच गडबड न करता शांतपणे आत

येऊन आमची घरे उजळून टाकतो. थोडे दार उघडा.. थोडा आत येतो, पूर्ण उघडा पूर्ण आत येतो व आम्हाला प्रसन्न करतो.

केवढा महान तरी किती नम्र!

 

तीच गोष्ट वाऱ्याची. जो आमचा प्राण आहे, सर्व जगताला प्राणवायु देतो, त्याच्यामुळेच श्वास चालतात, तो क्षणभर थांबताच आमचा जीव कासाविस होतो, आमचा श्वास गुदमरतो व आम्ही धापा टाकायला लागतो.त्याचे हळू चालणे

ही आम्हाला सहन होत नाही मग आम्ही पंखा लावून त्याला

आमच्या कडे खेचतो, वातानुकुलीत यंत्रे लावतो तेव्हा कुठे

आमचा जीव थाऱ्यावर येतो. इतकी नियमितता आहे तरी आम्ही हैराण होतो मग तो आलाच नाही वारा तर..?

आम्ही तशी कल्पनाही करू शकत नाही हो!

 

तशाच नद्याही यथाशक्ती पाणी आणतच राहतात,

कधीच चुकत नाहीत, आटल्या तरी पोटात पाणी धरून

ठेवतात, जरासे कोरताच नित्तळ झरे वर येतात व आमची

तहान भागवतात. पावसाळा येताच फुफाट धावू लागतात.

 

आणि हे ढग? बघताय् ना? ठरल्यावेळी न आल्यामुळे काय

होते ते? केवढी यातायात, वाट पाहणे, डोळ्यात पाणी.

त्यांची बोशिस्त अनियमितता किती त्रासदायक, भेदरवणारी

असते, तोंडचे पाणी पळवते केवळ ते शिस्त पाळत नाहीत,

वेळेवर ठरल्या प्रमाणे काम करत नाहीत म्हणूनच ना?

त्यांची बेशिस्त जीवनाला किती घातक ठरते आहे बघता आहात ना? असेच जर सृष्टीतल्या प्रत्येक घटकाने वागायचे

ठरवले तर काय होईल? फक्त सूर्य जरी, त्याने जरी आपला

नित्यक्रम,शिस्त, नियमितता सोडली तर काय होईल? मानव

जातीचा सर्वनाश होईल हो? दुसरे काय होईल ?

 

सृष्टीतील हे सारे घटक तारे वारे नद्या नाले सूर्य चंद्र नक्षत्रे

अब्जावधी वर्षांपासून जरा ही बेशिस्त वागत नाहीत.त्यांचे

येणे जाणे कधी ही चुकले नाही, नाही तर आपले अस्तित्वच

धोक्यात आले असते इतके जीवनात शिस्तिचे महत्व आहे. या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत जरा तपासून पाहू या का?

खरंच सांगते आपल्याकडे जे प्रॅाब्लेम आहेत ते केवळ बेशिस्ती

मुळेच! साधी वाहतुक समस्या घ्या. लाज वाटते हो आपल्या

वर्तनाची? कोणी थांबतच नाही? क्रॅास करू देत नाहीत. थांबला असाल तर.. तीन लाईनीत घुसून घुसून कोणालाच

बाहेर पडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करतात.

मोटर सायकल स्कूटरवाले मध्ये घुसून पाचर ठोकून जाम

करून टाकता. आपल्या पैकी कुणाजवळच संयम व सामंजस्य

नाही का?

 

इतके दिवस चार महिने मी परदेशात होते, ट्रॅफिक जाम होतो

पण दोन गाड्यांतील अंतर सुद्धा बदलत नाही. चार महिन्यात

एकदाही हॅार्न ऐकला नाही हो? ट्रॅफिक चालू असतांना बाजूच्या घरातून लाईनीत कुणाला यायचे असेल तर मागचा

थांबतो व त्याला आत घेतो. गिव्ह वे ही त्यांची पॅालिसी आहे.

कुणी रस्ता क्रॅास करत असेल तर पटापट गाड्या थांबतात.

आधी तुम्ही…सिनेमाच्या रांगेत सुद्धा मध्ये दोन माणसे उभी

राहू शकतील एवढे अंतर सोडून उभे राहतात.

आपले वर्तन अगदी याच्या उलट! आधी मी, मला जाऊ द्या, बस्स! बाकी मला माहित नाही.प्रत्येकच ठिकाणी हा “मी”

हजारो समस्या निर्माण करून सारी परिस्थिती बिघडवून टाकतो. वाहने सुसाट.. मला घाई आहे. काल गंगापूर रोडला

एक महिला क्रॅास करत असतांना कारवाला थांबला पण बाजुने येणाऱ्या मोटरसायकलवाल्याने तिला उडवले. ब्रेन फुटला, हजार फ्रॅक्चर्स झाले, नऊ दहा तासात बाईंनी जग

सोडले. तुमच्या मुळे एखादा जगातून उठतो याची ही तुम्हाला

पर्वा नाही?

 

मोठ मोठे उद्योगपती हे उद्योगपती झाले ते केवळ त्यांची शिस्त

नियमितता व उद्यमशिलता या गुणां मुळेच! टाटा अजून १८ तास काम करतात, जगभर त्यांचे साम्राज्य व अफाट संपती असूनही! म्हणूनच या उद्यमशिल माणसांकडे लक्ष्मी पाणी भरते. फुकट नाही?बाबासाहेब आंबेडकरांनी अफाट मेहनत

करून पोटभर जेवण मिळत नसतांना जगातली एकही डिग्री

घ्यायचे बाकी ठेवले नाही. त्यांच्या डिग्र्या वाचतांना आपल्याला धाप लागते, आणि हे केवळ जीवनात ठरल्यावेळी

ठरलेली गोष्ट करायची शिस्त अंगी असेल तरच शक्य आहे.

 

आमची लग्ने म्हणजे तर आजकाल आनंदी आनंद नि उत्सव

झाले आहेत. १२/३० च्या लग्नाला जावे तर.. नवरदेव व त्याचे

हौसे गवसे २ वाजे पर्यंत मांडवा बाहेर नाचत असतात व आपला अमुल्य वेळ काढून आलेली मंडळी मुहुर्त टळला म्हणून

तळमळत असतात. इकडे टाळी लागते, तिकडे मंडळी जेवत

असतात. का मुहुर्त काढता हो? कुठे चाललो आहोत आपण?

दिवसेंदिवस रानटी संस्कृतीकडे जात आहोत का?

 

ज्या घरात सकाळ पासून सर्व गोष्टी ठरल्यानुसार शिस्तित

होतात त्यांचे भवितव्य नक्कीच उज्वल असते. कारण तिथे

अभ्यासासह कुठल्याही गोष्टीची टाळाटाळ होत नाही. आणि मग कष्टाला फळ येतेच येते यात जरा ही शंका नाही. आंबेडकर विवेकानंद सावरकर टिळक रानडे ही त्याचीच उदा.

आहेत. जपान जर्मनी इंग्लंड अमेरिका ही राष्ट्रे पुढे गेली याचे

कारण त्यांच्यात काम करण्याची प्रवृत्ती व बेसिक शिस्त आहे.

 

आणि आम्ही? ॲाफिसमध्ये तरी पूर्ण तास काम करतो का?

आम्ही भारतियांनी कामाचे पूर्ण तास काम केले तर जगाच्या

पुढे निघून जाऊ आपण?पण ऐकणार कोण ना? शेवटी सांगणारा मूर्ख ठरतो. काम करणारा वेड्यात निघतो, अशी

आपली मेंटॅलिटी आहे.आम्ही सगळीकडे फक्त शॅार्टकट शोधतो.कमी कष्टात सहजासहजी फुकटात काय मिळते का

याचा शोध घेतो कारण कष्ट करण्याची आमची तयारीच

नसते असे कितीतरी टक्के लोक आहेत. जे कष्टतात तेच पुढे

जातात. बाकीचे व्यवस्थेच्या नावाने बोंबा मारतात, आपले

खापर इतरांवर फोडतात. कायम तक्रारी करत राहतात .

 

आपण प्रत्येकक्षणी असे समजतो की मीच बरोबर आहे, दुसरा

चूक आहे.आपली चूक आपण कधी मान्य करतच नाही. किंबहुना मी कसा चुकलो नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याचा

अट्टाहास करतो.ज्या दिवशी आपले चुकते हे आपण मान्य करू तेव्हाच परिस्थिती बदलेल अन्यथा नाही.आळस हा शत्रू

आहे, वेळेत काम केले पाहिजे हे जेव्हा आम्ही शिकू त्या दिवशी परिस्थिती नक्की बदलेलच बदलेल..अन्याथा असेच

मेंढरांसारखे पायात पाय अडकवून आम्ही चालत राहू.

 

एखादी मिटिंग,महत्वाची तिला सुद्धा आम्ही वेळेवर पोहोचत नाहीच वरून किती अडचणी आल्या याचा पाढा वाचतो. अहो,

अडचणी येणार हे गृहित धरूनच प्लॅनिंग करायचे असते ना?

चूक करतोच आपण वरून समर्थन करतो नि इंडियन टाईम

म्हणून स्वत:ची खिल्ली उडवतो. लग्नात तर अलिकडे लोक

फक्त जेवायलाच जातात. उशिरा जायचे, हॅलो हाय करायचे,

तोंड दाखवायचे, जेवायचे मस्त मनसोक्त, वाह वा! काय मज्जा ना? मुहुर्ताची पर्वा ना वधुवराच्या पित्यांना आहे ना

लग्नाला येणाऱ्यांना! सावकाश जाऊ, जेऊन येऊ नि झोपू.

झाले काम! सर्वत्र अनागोंदी कारभार आहे. अशाने कशी

प्रगती होणार हो? मुळात आपल्याकडे लोकसंखेचा प्रश्न

खूप गंभीर आहे, त्यातून बेशिस्त व कामा विषयी अनास्था!

पगार मात्र एकदिवस उशिरा झाला तरी बोंबाबोंब!फक्त पगार

घेणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशाने कसे आमचे कल्याण होणार हो? फार कमी लोक आहेत जे निष्ठेने काम

करतात व त्यांचे भले होते म्हणजे होते! जीवनात कुठे तरी निष्ठा हवी एक सुत्र हवे, नाही तर त्या जगण्याला काय अर्थ

आहे हो? “ बेलदाराचा हेला नि पाणी वाहून मेला” ….

 

बोलणाऱ्याचा राग येतो, आपण चुकतो त्याचा नाही. मोठी

विचित्र मेंटॅलिटी आहे. शिस्तप्रिय माणसाच्या नावाने बोटे

मोडतांना आपल्याला शरम कशी वाटत नाही हो? मला तर

मोठा प्रश्न पडतो. हे मुर्ख लोक शिस्तीच्या माणसांची टिंगल

करतात इतके निर्लज्ज असतात. अशा लोकांमुळेच देशाची

प्रगती होत नाही हे ही या मुर्खांना कळत नाही. मी स्वत: नियोजित व दिलेल्या वेळेतच कुठे ही जाते. लग्न खूप उशिरा

लागणार असेल तर अंदाज घेऊन सरळ घरी निघून येते.आपल्या येण्याची ज्यांना पर्वा नाही त्यांच्यासाठी का

थांबायचे? आपण काय घरी जेवण मिळत नाही म्हणून जातो

काय? काही लोक जेवायलाच जातात हे सांगितले मी तुम्हाला! जिथे शिस्त नाही तिथे गैरव्यवस्था आहे, आणि जिथे गैरव्यवस्था आहे अशा

लोकांचे कधी ही भले होऊ शकत नाही. माझ्या मताशी कुणी

सहमत झाले नाही तरी मला त्याचे दु:ख नाही.कारण त्यांची

लायकी तीच असते हे ही आपण जाणतो.असो, एका बेशिस्ती

मुळे सारेच गणित बिघडते हे जेव्हा आपल्याला कळेल तो सुदिन

समजू या नि आपण सुशिक्षित म्हणवत असू तर सर्वांच्या भल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी नियम व शिस्त पाळू या.

निसर्ग एवढा महान आहे, तिथे सारेच काम शिस्तीने चालते मग

आपल्याकडे का नको?..

 

धन्यवाद मंडळी..

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा