*गझल मंच, गझल प्राविण्य, गझल मंथन समूहाच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा शोभा वागळे लिखित गझल संग्रहाचे रसग्रहण*
*”दीवान-ए-सिराज”*
गझलकार : सिराज शिकलगार
सातारा…
मराठी साहित्य क्षेत्रात, कवितेच्या प्रांतातला गझल हा प्रकार आज अतिशय लोकप्रिय झाला आहे.
गझल हा काव्य प्रकार जरी उर्दूतून आलेला असला तरी मराठीमध्ये गझल लोकप्रिय करण्याचे सारे श्रेय गझल सम्राट सुरेश भट साहेबांचेच आहे.
*”जरी वर्तमानाला कळे ना अमुची भाषा*
*विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.”*
भट साहेबांच्या प्रेरणेतून आज अनेक नवोदित गझलकार गझलेची पालखी खाद्यांवर घेऊन दिमाखाने पुढे जात आहेत. ह्यातच, सिराज करीम शिकलगार हे नामवंत साहित्यिकांपैकी एक साहित्यिक आहेत. साहित्य कृतीतील त्यांची आजपर्यंत ३१ पुस्तके प्रकाशित आहेत. १० कविता संग्रह, एक ललित, ०२ इतर (सहकार), १७ गझल संग्रह असे एकूण ३० व ३१ वा हा ‘दीवान -ए -सिराज’.
दिवान हा गझलेचाच एक प्रकार असून तो उर्दूतून मराठीमध्ये आला. उर्दू भाषेत काही शायरांनी उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गज़ल रचना केल्या. अशा एकशे चार दिवान उर्दू भाषेत आले आहेत. आपल्या मराठीतही ज्येष्ठ गज़लकार ए. के. शेख साहेबांनी ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतची मुळाक्षरं घेऊन दोनशेच्या वर गज़ला रचल्या व ‘अमृताची पालखी’ हा पहिला दिवान मराठी भाषेत प्रसिद्ध केला. त्याचप्रमाणे २) प्रशांत पोरे, ३) मीना शिंदे, आणि ४) जगन अवचार यांचे दीवान मराठी भाषेत प्रकाशित झाले आहेत.
वरील चार दीवान आणि पाचवा दीवान हा सिराज करीम शिकलगार सरांचा ‘दीवान -ए – सिराज’ आहे.
दीवान मधल्या गझला सर्वच्या सर्व मुरद्दफ असतात. गझलेला रदीफ हवाच व रदीफचे शेवटचे अक्षर हे मराठी वर्णमालेतील प्रत्येक अक्षराने संपणारे असावे असा संकेत आहे.
मराठी भाषेत ३६ वर्णाक्षरांनी संपणारे शब्द आहेत. अशा प्रत्येकी वर्णाक्षराच्या ६ गझला रदीफाचे शेवटचे अक्षर घेऊन केलेल्या सिराज सरांच्या ‘दीवान-ए-सिराज’ ह्यात आहेत. अगोदरच्या ४ दीवान पेक्षा ह्यात हे वेगळेपण अतिशय कौतुकास्पद आहे.
तसेच विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सिराज शिकलगारांच्या अगोदरच्या १७ गझल संग्रहातली एकही गझल दीवानमध्ये पुनरावृत्तीत केली गेली नाही.
दीवान -ए-सिराज मध्ये एकूण ३६×६ =२१६ गझला आहेत. अक्षरगण वृत्तातील १३६ व मात्रा वृतातील ८० गझला आहेत. त्याच प्रमाणे दीवान -ए-सिराज मध्ये सरांनी ८६ प्रकारची अक्षरगण वृत्ते व २० प्रकारची मात्रा वृत्ते अशी एकूण १०६ प्रकारची वृत्ते हाताळलेली आहेत. अक्षरगण वृत्तामध्ये लघु-गुरू सूट घेतली आहे. ऱ्हस्व- दीर्घच्या बाबतीत सूट घेतलेली नाही.
दीवान-ए-सिराज ह्या पुस्तकास सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलकार श्री. रमण रणदिवे, ह्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
आ. सुरेश भट साहेबांप्रमाणे रणदिवे सरांनी सुद्धा गझलकार हा उत्तम कवी असावा लागतो असे म्हटले त्याच प्रमाणे रणदिवे म्हणतात की, कवी हा आधी चांगला माणूस असायला हवा. चांगल्या माणसाच्या सर्वच्या सर्व गुणांनी गझलकार सिराज सर परीपूर्ण आहेत. त्याचमुळे त्यांच्या गझला रसिकांच्या काळजाला भिडणाऱ्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या आहेत.
विशेष अभिप्राय मध्ये गझलकार ज्ञानेश वाकुडकर सरांनी दीवान-ए-सिराज-सिराज म्हणजे :”सहज सुंदर अत्तराचे तळे”अशा शीर्षकाने अभिप्रायाची सुरुवात केली आहे.
“केवळ गझल या काव्य प्रकाराला वाहिलेला सिराज शिकलगारांचा १८ वा संग्रह आहे. एवढे सांगितलं तरी गझलेच्या प्रांतात त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यांनी दिलेले योगदानाची सहज कल्पना येते.”अशा शब्दांत वाकुडकर व्यक्त झालेले आहेत. सरांनी सिराज सरांचे त्यांना आवडणारे शेर घेऊन त्यांचे सुंदर विश्लेषण ही केले आहे. ते वाचून वाचकांना सिराज सरांच्या गझला, व सरांबद्दल अधिक माहिती प्रामुख्याने जाणवेलच.
डॉ. शेख इकबाल मिन्ने सर आपल्या अभिप्रायात म्हणतात,”गझलेवर वेड्यासारखे प्रेम करणारा एक गझलवेडा अवलिया म्हणजे सिराजभाई शिकलगार. अवघ्या अल्पावधीत १५०० च्यावर गझला लिहून एखाद्या शब्दप्रभूचेच काम केले आहे.
गझलकार प्रा.डॉ. रेणुकादास भ. भारस्वाडकर सर, म्हणतात, “दीवान -ए-सिराज मधील गझलांमधून सर्व व्यापकता आणि शाश्वत मूल्ये दिसून येतात आणि हेच दीवानचे बलस्थान आहे. अध्यात्म, साधेपणा, सत्याचा पाठपुरावा, श्रमाचा सन्मान, सार्वभौमिक सहिष्णुता आणि स्वीकृती या बाबी ठळकपणे दिसून येतात. मराठी भाषेत अगदी मोजकेच दीवान आहेत पण दीवान-ए-सिराज ह्यात नजरेत भरणारे वेगळेपण आहे हे मात्र नक्की.
शायर, नजीर फतेहपुरी आपल्या ‘पेश लब्ज’ अभिप्रायात म्हणतात की, आज गझलेचा प्रचार आणि पसारा खूप वाढलेला आहे. आज गझल मुशायरे व महफिले बऱ्याच ठिकाणी गायकीने सजवतात त्यामुळे लोकप्रियता खूप वाढलीय. मूळ गज़ल ही अरबीतून फारसीमध्ये ,नंतर फारसीमधून उर्दूमध्ये येऊन थांबली. पण थोड्या अवधीत मराठी गझलांचा सिलसिला सूरू झाला आणि हळू हळू उर्दू प्रमाणे मराठीत ही दीवान लिहायला लागले. उर्दू गज़लांचा दीवान ३५ हफोंचा (वर्ण अक्षर ) आहे तर मराठी दीवान हा ३६ वर्णाक्षरांचा असतो.
उर्दूतला पहिला साहिबे दीवान ‘शायर कुली कुतुबशाह’ चा मानला जातो. नंतर दीवान-ए- मीर, दीवान-ए-गालिब, दीवान -ए-दाग़ मंजरे असे अनेक दीवान उर्दू भाषेत लिहिले गेले. आज पर्यंत त्यांची संख्या ७६ दीवान मंजरे झाले. अजून त्यात ४ दीवान मंजरे आलेत त्यात ठाण्याचे गझलकार संदीप गुप्तेचा एक व दुसरा स्वतः नजीर फतेहपुरीचा ही एक आहे.
फतेहपुरी सरांनी मिर्जा गालिबच्या अलिफ रदीफ च्या गज़लांचे दोन शेर लिहिलेत तसेच मीर तकी आणि दाग देहलवी चे शेर अभिप्रायात लिहून उर्दू गज़लांचे वैशिष्ट्य सांगितले.
‘दीवान -ए सिराज’ ची पाठराखण, मार्गदर्शन आणि निरीक्षण ह्या जबाबदाऱ्या व शुभेच्छा मा. गझलकार डॉ.राम पंडितसर, मा.गझलकार उद्धव महाजन सर, मा.गझलकार बिराजदार आणि मा.गझलकार अरूण सावंत सर ह्यांनी अनुक्रमे स्विकारून दीवान -ए-सिराजला अतिशय सुशोभित केले आहे.
आता आपण ‘दीवान-ए-सिराज’ बद्दल जाणून घेऊया :-
दीवान लिहिणाऱ्यास ‘साहिब -ए-दीवान शायर म्हणतात. आपले साहिब-ए -दीवान शायर सिराज सरांनी दीवानची संकल्पना व ‘दीवान’ म्हणजे काय हे संक्षिप्त शब्दांत अगदी सोप्या भाषेत सर्व नवोदितांना समजेल असेच लिहिले आहे. ते वाचल्याने मनामध्ये दीवान लिहायची प्रबळ इच्छा होईलच असे मला वाटते.
सरांनी संग्रहात वापरलेली एकूण १०६ वृत्ते अक्षरगण आणि २० मात्रा वृत्तांची नामावली दिलीय. दुसऱ्या पानावर अनुक्रमणिकेत गझल शीर्षक रदीफ अक्षर, वृत्ताचे नाव, वृत्त प्रकार व पृष्ठ क्रमांक दिलेत. मराठी देवनागरी वर्णमालेतील ऊ आणि ई हे दोन स्वर आणि ३४ व्यंजनानी संपणारे मराठी शब्द घेतलेत गझलेचे रदीफ म्हणून. प्रत्येक वर्ण अक्षराच्या सहा -सहा गझला ऊ, ई, क ते ज्ञ पर्यंत अक्षरांच्या एकूण २१६ गझला संग्रहीत असलेला ‘दीवान-ए-सिराज’ बनलेला आहे.
पहिलीच गझल ही मात्रावृत्तातली ‘भावली माझी आई’ आहे.
पहिला गुरू आपली आई असते. आईच्या थोरवी गुणगान करणारे सारेच शेर मनाला भावनांनी, आदरांनी भरलेले आहेत. मतलाच बघा:-
*उदरात जिच्या जन्म घेतला माय माउली माझी आई*
*मरण यातना-प्रसव कळांना सहज साहली माझी आई*
प्रसवा दरम्यान मातेला मरण यातना भोगाव्या लागतात ह्याची जाण गझलकारने ठेवली. हे अतिशय भावनेने ओथंबलेले विचार गझलकार बाळगतो.
पान (३२) मुरजयी वृत्तात सर म्हणतात:-
*पर्वत -खाई संकटांची*
*नक्की करते पार आई*
आईची उर्जा, जिद्द, चिकाटी, धैर्य आणि संकटावर मात करणारी शक्ती सर्वांचे डोळे दिपवूनच टाकणारी असते. ज्या हिराच्या नावाने शिवाजी महाराजांचा हिरकणी बुरूज ओळखला जातो त्या ‘हिरा’ ची आठवण करून देणारा हा शेर आहे.
पान (३७ ) अनलज्वाला मात्रा वृत्तातल्या ‘ठरतो येथे भाऊ’ मध्ये
*का भावाचा वैरी ठरतो येथे भाऊ*
*का भावावर दावा भरतो येथे भाऊ*
आजच्या वास्तवाचे वर्णन करणारा हा शेर आहे. जिवाला जीव लावणारे भाऊ इस्टेटीच्या हिस्याच्या वेळी हमरी तुमरीवर येऊन एकमेकांचे वैरी होतात आणि कोर्ट कचेरीत दावा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. हे सांगणारा हा शेर आहे.
तसेच भावा करता सिंहासनाचा त्याग करणारा भाऊ असा ही एक शेर ह्याच गझलेत आहे.
पान (३७ )
*भावासाठी सिंहासनास लाथ मारली*
*वनवास कसा मग पत्करतो येथे भाऊ*
पान(३८ ) आनंदकंद:-वादळात न्हाऊ
*दाबून भावनांना ठेवू नये कधीही*
*वाढेल दाब हृदयी ये आसवात न्हाऊ*
अंतःकरणातले दुःख आतल्या आत ठेवू नये तसे केल्याने त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होऊ शकतो असा संदेश देणारा हा शेर आहे.
पान( ४० ) चंद्रकांत:- भ्रमण म्हणू नका
*पक्षा-पक्षामध्ये लपली कांक्षा सत्तेची*
*ओरबाडुनी घेतले तरी पदग्रहण म्हणू का*
आजच्या वास्तवावर प्रखर प्रकाश टाकणारा हा शेर.
दीवान-ए-सिराज मध्ये २१६ गझलामध्ये एकापेक्षा एक असे असंख्य शेर वेगवेगळ्या खयालांच्या आशय संपन्न गझला समाविष्ट आहेत. मला संभ्रम पडतो हा शेर घेऊ की तो घेऊ कारण सिराज सरांनी गझलामध्ये अनेक विषय प्रखरतेने हाताळले आहेत. जसे विरह-मीलन, सुख-दुःख, नात्यातील दूरावा, प्रेमातील रूसवे- फुगवे, सामाजिक वास्तव, अन्याय-प्रतिकार, माणुसकी, देशप्रेम, रोजा, शिवबाची थोरवी, प्रेमळ-स्वार्थी वृत्ती अशा विषयांवर सरांनी समरसून लिहिले आहे.
ह्या दीवानमध्ये अजून विशेषता जाणवली ती म्हणजे सिराज सरांनी महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांची ‘ध्यास स्वराज्य शिवाजी ते जिजाऊ तुळजाईचा दास शिवाजी’ अशा आठ शेरांच्या गझलेत महाराजांची थोरवी मांडली आहे. तसेच “केशा म्हणू का लगागा” पान ५१, या भुजंगप्रयात गझलेमध्ये केशा-५-सोमराज-१०-प्रमिला-१५-भुजंगप्रयात-२०-सिंहपुच्छ- २५- क्रिडाचंद्र-३०-विद्युद्दाला-३५-महानाग-४०-सिंहविक्रीड दंडक-४५. ह्यात “लगागा” लगावलीच्या वाढत्या क्रमाने वृत्ताच्या वैशिष्ट्याची गझल लिहिली आहे.
पान ६८ वर “फक्त भटांची” या पादाकुलक रचनेत गझल सम्राट सुरेश भट साहेबांच्या, गझलांचे विशेषता व आज ही भट साहेबांच्या गझला लोकप्रियतेच्याच शिखरावर आहेत हे शेरातून स्पष्ट करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पादाकुलकच्या छोट्या वृत्तामध्ये “भूक-तहान रोजा” पान ८० रमजान ईद सुंदर वर्णिली आहे.
अशा एकापेक्षा एक सुंदर गझला दीवानमध्ये आहेत.
मला सगळ्याच गझला नि शेर खूपच भावलेत तरी त्यातल्या त्यात ज्यांचा उल्लेख केल्या शिवाय मी राहूच शकत नाही असे काही मोजके शेर मी खाली देत आहे.
१) *हजार चॅनल ब्रेकिंग न्यूज हजार वेळा*
*किती ऐकली तरी न कळते खबर बेरकी* (४२)
२) *कसे कळेना सुरेख होते गझल कशाने*
*जमीन उत्तम खयाल भारी भरा म्हणू का* (४४)
३) *वाढत्या गरजा कशा रोज भागवाव्या*
*घाम गाळू का कुणाला उधार मागू*( ५५ )
४) *आनंद जीवनाचा गोतावळ्यात आहे*
*नात्यात प्रेम-ममता माळून एकदा बघ.* (५८ )
५) *समजून दीन – अबला अन्याय खूप केला*
*झाली अता विषारी ही लेक भारताची* (६४ )
६) *इतकेही सोपे नसते गझल करणे*
*शब्दाशब्दांची नुसती उकल करणे* (१११ )
७) *चवदार जल तळ्याचे अन् दूध वाघिणीचे*
*स्फुलिंग चेतविणारा तो भीमराव बाबा.*( १६१ )
८) *अता जीवनाची दुरुस्ती करावी जराशी*
*मनाची अता लाज थोडी धरावी जराशी* (२०२ )
९) *आजकाल राहिले न आरपार वागणे*
*फायदा बघून शब्द मोडतात माणसे* (२१७ )
१०) *सूर्य चंद्राच्या उजेडा आसमंती जोड नाही*
*पेलणे आव्हान त्याचे काजव्याची काय प्राज्ञा* (२४० )
असे अनेक शेर मनाला भिडणारे दीवानमध्ये आहेत. वाचक जेव्हा दीवान वाचतील तेव्हा त्यांना ती प्रचिती येईलच.
सरांची आज पर्यंत प्रकाशित झालेली ३१ पुस्तकांची यादी पान २४३ वर दिली आहे.
अशा श्रेष्ठ साहित्यिक मा. सिराज शिकलगार सरांना जवळ जवळ ३६ पुरस्कार मिळालेत त्यांची यादी पान २४४-४५ वर दिली आहे आणि शेवटच्या पानावर (२४६ ) महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला सुची बाबतचे दि.१० नोव्हेंबर २०२२ चे पत्रक व तक्ता ही दिला आहे.
‘दीवान-ए-सिराज’ मधील गझला वाचनीय आहेत. मुखपृष्ठावर सिराज सरांचाच फोटो आहे आणि शेवटच्या पानावर श्रेष्ठ गझलकार आ. डॉ. राम पंडित सरांनी सिराज सरांना बहुप्रसव आशुकवी असून विक्रमी संख्येने गझल लेखन केले हे नमूद केले आहे. शिकलगारांच्या गझलांचा अश्व असाच मार्गक्रमण करीत राहो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
‘दीवान-ए-सिराज’ हा अतिशय उत्तम दर्जेदार गझल संग्रह आहे.
*समीक्षा*
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
*पुस्तक खरेदीसाठी:-*
दीवान-ए-सिराज ₹ ७००
प्रकाशक:-अक्षरशिल्प प्रकाशन वि.ना. राऊत
मुखपृष्ठ :-अरूण सुतार–कोल्हापूर
पुष्ठ संख्या :-२४६
पत्ता:-सिराज करीम शिकलगार
मु.पो. आंधळी.ता.पलूस जि. सांगली पिन कोड ४१६३१०
Google pay no. 9890597855
email:skshikalgargmail.com
————————————————————-