*आजगाव साहित्य कट्ट्यावर आत्मकथनांवर चर्चा*
‘बहुतांश आत्मकथने ही प्रेरक असतात. आम्ही अनेक आत्मकथने वाचली, ती आम्हाला भावली. अनेकानी आम्हाला आनंद दिला, विचार करायला प्रवृत्त केले,ती आमच्यासाठी प्रेरक ठरली’,असे मत आजगाव साहित्य कट्ट्यावर व्यक्त करण्यात आले.निमित्त होते आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या त्रेचाळीसाव्या कार्यक्रमाचे. या वेळचा विषय होता भावलेले आत्मकथन.
आजगाव येथील आदित्यनाथ मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले. त्यात विविध आत्मकथनांचा त्यानी उल्लेख केला. नंतर कट्ट्याच्या सदस्यांनी एक-एक करून आपल्या आवडत्या आत्मकथनाविषयी विचार व्यक्त केले.
स्नेहा नारींगणेकर यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘करुळचा मुलगा’ या आत्मकथना विषयी विचार व्यक्त केले. या पुस्तकाच्या आधारे त्यांनी मधुभाईंचा प्रेरणादायी प्रवास कथन केला. शेखर पणशीकर हे सुनिता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मकथनाविषयी बोलले. सुनिताबाईंचा जीवन विषयक दृष्टिकोन, त्यांचे भाईंना लाभलेले सहाय्य, अज्ञात शक्तीचे अनुभव आदी अनेक कंगोरे त्यानी उलगडून दाखवले. त्या अनुषंगाने विनय फाटक यानी मंगला गोडबोलेंच्या ‘सुनिताबाई’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील अनुभव सांगितले. सरोज रेडकर या ‘मी कसा झालो’ या आचार्य अत्रेंच्या आत्मकथनाविषयी बोलल्या,तर वाय्.एन्. गिरी यांनी प.वि. वर्तक यांच्या ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’ या आत्मकथनाविषयी सांगितले. शेवटी विनय सौदागर हे शरद बाविस्कर यांच्या ‘भूरा’ या आत्मकथनाविषयी बोलले. दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला धुळे जिल्ह्य़ातील एक खेडवळ मुलगा पुढे दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात प्राध्यापक होतो, हा भूराचा रंजक प्रवास त्यानी उलगडून दाखवला.
या कार्यक्रमात सत्याचे प्रयोग, बॅरिस्टरचं कार्ट, ताठ कणा,माझा साक्षात्कारी हृदयरोग, कॅन्सर माझा सांगाती,माझ्या जीवनाची सरगम, इडली ऑर्किड आणि मी अशा अनेक आत्मकथनांची चर्चा करण्यात आली. चर्चेत सचिन दळवी, विनायक उमर्ये,एकनाथ शेटकर, अनिता सौदागर आणि सरोज रेडकर यांनी सहभाग घेतला.
=====================
*भावलेले आत्मकथन*
१.शेखर पणशीकर
आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे
२.स्नेहा नारींगणेकर
करुळचा मुलगा- मधु मंगेश कर्णिक
३.विनय सौदागर
भुरा- शरद बाविस्कर
४.सरोज रेडकर
मी कसा झालो- आचार्य अत्रे
५.वाय्.एन्. गिरी
ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा