*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*या कोण?*
या कोण?.. तिघी चोघीजणी
कयास लाविता-लाविता
वाटल्या एकाच गावच्या
जमल्या कशास वनिता ? ~~
रीत समान शृंगाराची
उटी लल्लाटी केशराची
गळा शोभा रत्नहाराची
नासिकेस लाली सिंदुराची ~~
लक्ष वेधिती नयनीचे मीन
रेंगाळली रातीची मादकता
केशरचनेत दाविली कुशलता
गोंधळली ना एकीचीही मग्नता ….
तळपती कशी नक्षत्रासम
लंब गोलाकार कर्णभूषणे
कसबी सोनारा-कासारांनी
भरली सुंदर हातभर कंकणे~~
उभ्या खांबाशी कमानीखाली
चहुकडे ध्यान अष्टावधानी
अंतरगीचे गुज सांगून होताच
भाषा मौनाची सुखी समाधानी ~~
पटली खात्री या एकाच गावच्या
माहेरच्या वा सासरच्या
नणंदा-भावजया किंवा जावा-जावा
असाव्यात एकाच घरच्या ~~~
विजया केळकर _______
नागपूर