भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या योगशिक्षक व मूल्यमापक परीक्षेत कणकवली येथील सौ.श्वेता हर्षद गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळेस घेतल्या गेलेल्या परीक्षेत सिंधुदुर्ग मधुन पास होणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
या परीक्षेसाठी योगदर्शन, हठयोगप्रदीपिका, घेरंडसाहिता, हठरत्नवली, भगवतगीता असा थेअरीचा तसेच प्रॅक्टिकलसाठी षटकर्म क्रिया, सूर्यनमस्कार, आसने, मुद्रा, बंध असा कठीण अभ्यासक्रम असतो. सौ.श्वेता यांनी कणकवली तालुक्यात पतंजली अंतर्गत श्री.साधले व डॉ.रावराणे यांच्याकडे 2009 साली 25 दिवसाचे शिबीर करून योग शिक्षणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आज स्वतःचे योगवर्ग सुरू केले आहेत. गेली 4 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या योगाचा प्रसार करत आहेत.
या परीक्षेसाठी पतंजली युवाराज्य प्रभारी श्रीराम लाखे व त्यांची पूर्ण टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पश्चिम महाराष्ट्र पतंजली महिला राज्य प्रभारी सुधाताई अलीमोरे, रमाताई जोग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योगसमिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी योगाचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.