चक्कर येवून पडल्याने तळवडेत एकाचा मृत्यू…
सावंतवाडी
चक्कर येऊन पडल्याने तळवडे-खेरवाडी येथील बाबुराव सखाराम गावडे (वय ६५) यांचे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत त्यांचा मुलगा सागर गावडे याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव गावडे हे काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ओरोस येथे उपचारासाठी हलवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना ओरोस येथे नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर त्यांचा मुलगा सागर गावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.