You are currently viewing जोड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू  

जोड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू  

जोड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू

जल जीवन प्राधिकरण प्रशासनाला जावेद खतिब यांचा इशारा…

बांदा

येथील आळवाडा तेरेखोल नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याचे काम पाच दिवसात सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू, असा इशारा बांदा माजी उपसरपंच जावेद खतिब यांनी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाला दिला आहे. अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम जैसे थे असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी पूल उभारण्यात आला आहे. आळवाड्यातून पाईपलाईन जाण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाबरोबर बराच संघर्ष केला. आमदार नितेश राणे यांनी आळवाडा भागातून पाईपलाईन नेऊन तेरेखोल नदीवर पूल उभारण्याचे आदेश दिले होते. यामुळे मडूरे दशक्रोशितील स्थानिकांचा धोकादायक होडी प्रवास बंद झाला आहे.

पुलाच्या दुतर्फा मातीचा भराव टाकून जोड रस्ता तयार केला आहे. मात्र, रस्ता डांबरीकरण करण्यात न आल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहने हाकताना चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. भराव टाकलेल्या मातीला पिचींग न करताच दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने डांबरीकरण उरकून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता.

स्थानिकांच्या मागणीवरून जावेद खतिब यांनी रस्त्याची पाहणी केली व प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून डांबरीकरण कामात दिरंगाई होत असल्याबाबत जाब विचारला. येत्या पाच दिवसात डांबरीकरणाचे काम सुरू न केल्यास पाईपलाईन तोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी शेर्ले ग्रामपंचायत सदस्य शामराव सावंत, विक्रांत नेवगी, मडूरे माजी उपसरपंच उल्हास परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा