You are currently viewing पानगळ

पानगळ

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाचे सदस्य लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*पानगळ*

 

दुपारची वेळ होती भयंकर ऊकाडा होता पंखा त्याच्या पूर्ण लयीत फिरत होती बाहेर भयंकर ऊन्हाचा तडाखा होता , मी मात्र सवयी नुसार बेडवर पहुडलो होतो ( खरं सांगायचं तर या पाठदुखी पासून मी , बेड व माझी दुखरी पाठ याचं एक अतुट नातं झालय खरं !) अचानक वादळ , वारा जोर जोराने वहायला लागला . वातावरण अंधारून आलं . आणि आसपासचे पत्रे व शेड त्यांचा खास पावसाळी आवाज ऐकवायला लागले . मी ही औत्सुक्याने बाहेर आलो , वारा चांगलाच गतिमान झाला होता . सगळं ठीक ठाक आहे नां ? याचा अंदाज व चाचपणी केली . एक सांगू का ? मला असं अंधारलेल वातावरण , सौम्य पण अधून मधून घोंगवणारा वारा , त्यातच हलकीच पावसाची सर वगैरे टिपीकल “लंडन “वातावरण फार आवडतं . मी लगेच समोरील ओट्यावर आलो . बसायला खुर्ची घेतली . आणि घोंघावणारा वारा , मधुनच टपकणारा पाऊस पहात बसलो . अंगणात असलेल्या छोट्या , मोठ्या झाडांची पान पडत होती , बरीचशी पिवळसर वाळलेलीच होती पण पावसाच्या थेंबांपेक्षा पालापाचोळा च जास्त ओट्यावर येत होता . आणि मधुनच पडणारे पावसाचे शिंतोडे अंगावर पडतांना का कुणास ठाऊक ? मला लग्न कार्यात ( पूर्वीच्या हो) गुलाब पाणी शिंपडल्या सारखे वारंवार वाटत होते . नाही म्हणायला समोर अनेक गुलाबांची रोपे होती व तीही मान डोलवून हूंकार देत होती .

साथ द्यायला की काय , जवळच्या कोणत्या तरी घरातून एखाद्या पट्टीचा किंवा पत्र्याचा खट् खट् खट् असा वाऱ्याच्या वेगानुसार कमी जास्त होणारा , पण तेवढाच संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानुसार आवाजाची लयबध्दता जपत जमेल तसा ताल देत होता व मी पण त्या आवाजात वाऱ्यासंगे व आजुबाजुच्या झाड , वेलींच्या संगे टप टप आवाजात गुंगत चाललो होतो .

अंगणांत पानांचा अक्षरशहा पाऊसच पडला होता . मी वारंवार त्या खाली पडलेल्या पानांकडे निरखून बघत होतो . काही लहान , तर काही मोठी पाने ,तिरपे तारपे होवून साधारण पिवळसर झालेली , तर काही राखाडी पाने , निपचीत पहुडली होती . काही क्षणापुर्वी ह्याच काड्या , पाने वरच्या हिरव्यागार झाडावर मस्त डोलत असायची .नाही का ं?

मनात सहज विचार आला , माणसाचं जीवनही असंच ऊन -पावसा सारखं आहे ?

आपल्या आयुष्यात असाच चढ ऊतारांचा लपंडाव सुरू असतो .कधी सुखाची हिरवळ असते तर कधी मे महिन्यातला रखरखीत ऊन्हाळा .तर कधी अचानक् अंगावर डोंगर कोसळून दुःखाचे ओघळ डोळ्यातून वहात असतात .वैशाख वणवा केव्हा आयुष्यात येइल नाही सांगता येणार .पण त्या वणव्याच्या दिवसात कधी आशाढातल्या सरी पडून मनाला गारवा देतील हे ही सांगण्या पलीकडलं .पण आज वैशाख , आषाढ महिन्यांसोबत शिशीर ऋतुतील पानगळ सुध्दा आपलं रूप दाखवून गेली ,

मला तर आजच्या दुपारचे कडक चटका बसणारे ऊन वारा , पाऊस आणि झाडांची आकस्मिक पानगळ पाहून असं वाटतं झाडा सारखं तटस्थ , तपसव्या सारखं जीवन जगावं . स्वतः ऊन , पाऊस अंगावर घेऊन आपल्या सावलीत सगळ्यांना सामावून घ्याव . आणि कधी आल्हाददायक हिरवी गार पालवी धारण करावी तर आजच्या सारखी अवकाळी पावसाने झालेली पानगळ सुध्दा कधीकाळी सहन करण्याचे धैर्य धारण करता याव .

भर ऊन्हात थरथरणारी रूक्ष जीर्ण पानं सरसरत खाली जमिनीवर येत असतात …

अन् ओकी बोकी झालेली झाडें…

पर्णहीन पोरकी होऊन जात असतात …..

पानगळ पाहतांना ..

क्षणभर मनाची घालमेल होत असते आणि प्रत्येक पानाच्या अस्तित्वाची एक अस्वस्थ जाणीव अंतरात कोरून जात असते …

पण खुडलेला हा बहर

ऋतु सरताच …

नवपालवीने अलवार मनातील सारी पानगळ मात्र आवरून जात असतो …

********************

अनिल देशपांडे, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा