You are currently viewing एक मैत्री

एक मैत्री

*मेघनुश्री, लेखिका पत्रकार मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*एक मैत्री*

 

एप्रिल महिना सुरू झाला आणि कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका आल्या. अजून पंधरा, तीन आठवडे होते प्रवासाला, पण माहिती – परिचयपत्र पाठवणे, आयोजकांशी संपर्कात रहाणे याची सुरूवांत झाली. एप्रिल-मे मधला प्रवास म्हणजे बसचे आरक्षण आलेच, तेही एक दिवस ठरवून पूर्ण केले. जाताना थेट मुंबई तर परतीच्या प्रवासांत पुणे व कोल्हापूर असे कामकाज करत रत्नागिरीस यायचे होते. एकदा बाहेर पडल्यावर आठ-नऊ दिवसांनी घरी परतायचे होते, नेहमीप्रमाणे सर्व कामकाजाची पूर्तता करत दिनक्रम सुरू होता. २८ एप्रिल २०२४ या दिवशी ‘मराठा मंदिर प्रागतिक संघ’ यांनी मुंबई सेंट्रल येथे काव्यसंमेलन आयोजित केले होते. अनेक वर्षे बंगलोर सारख्या मोठ्या शहरांत राहिलेली मी, खरे तर एकटीने प्रथमच मुंबईत जाणार याचाच आनंद वाटत होता. यांआधी एकदा कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तर दुसऱ्यांदा पुरस्कार घेण्यासाठी मुंबई दर्शन झाले होते. नातेवाईक व ओळखीच्यांना आयोजकांकडून आलेली पत्रिका पाठवली व कार्यक्रमांस येण्यांस सांगितले. एका वेगळ्या विश्वासाठी मन आतुरले होते. स्वप्ननगरी खुणावत होती.

रत्नागिरी-नालासोपारा ही गाडी २७ एप्रिलला सकाळी ९ वाजता पकडायची होती. आयोजकांकडे कविता आणि परिचयपत्र ईमेलद्वारे पाठविल्यानंतर पहिल्या तासांभरातच त्यांचा फोन संपर्क झाला त्यामुळे प्रोत्साहन देणारा हा क्षण मोलाचा ठरला. मुंबईत पाऊल ठेवायचे म्हणजे प्रथम रहाण्याची व्यवस्था करायला हवी, कारण ओळखीचे लोक बरेच असले तरी नुकत्याच परीक्षा संपून विद्यार्थी व पालकवर्ग वर्षभराच्या चक्रातून सुटल्यावर सुट्ट्यांचे नियोजन करणार हे आधी लक्षांत आले. पहिल्याच ठिकाणी फोन केल्यावर नशिबाने व्यवस्था झाली. काही वर्षांपूर्वी बंगलोर येथे पाच-सहा वर्षे कार्यरत असणाऱ्या आणि आता मुंबईत पूर्णपणे स्थायिक असलेल्या अविनाश-मीराने सर्व जबाबदारी स्वीकारली. यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. स्वागतातील आनंद उत्साह ओसंडून वहात होता. त्यानंतर त्यांचे वास्तव्य ठिकाण आणि माझे मुंबईतील उतरायचे ठिकाण या अंतरांची माहिती असणे आवश्यक वाटले, सध्या भ्रमणध्वनीमुळे हे सहज शक्य आहे. उत्सुकतेपोटी गृहकर्तव्ये भराभर पार पडत होती. प्रवासाचा दिवस उगवला, मुख्य स्थानकावर बसची वेळ सकाळी नऊ वाजताची होती, घराजवळच्या स्टॉपवर यायला साडेनऊ तरी वाजतील असा एक अंदाज असतानाही मी व माझे पती लवकरच जाऊन बससाठी थांबलो. विचार हा असतो नेहमीच की वेळेत असलेले बरे, फक्त चढण्याउतरण्यासाठी एक-दोन मिनिटे थांबणाऱ्या बसेस कधी लवकर तर कधी उशीरा यांबद्दल काही सांगू शकत नाही. साधारण ९:२० च्या दरम्यान बस आली आणि माझा मुंबापुरीकडे प्रवास सुरू झाला.

संगमेश्वर,चिपळूण पर्यंत आजवर कामासाठी प्रवास झाला होता पण आता त्यापुढचे सगळेच नवखे होते. परशुराम घाट व इतर नागमोडी वळणे, कोकणांत कुठेही प्रवास केला तरी सोबतीच्या निसर्गसौंदर्याने मन उभारी घेत असते. काही ठिकाणी जबरदस्त ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असा प्रवास पुढे जात होता. पाण्याची सतत वाटणारी गरज तासा-दोन तासांच्या थांब्यामुळे ताजी होत राहिली, गारवा देत राहिली. संध्याकाळ झाली सहा वाजले पेण, पनवेल येऊन गेले साधारण आठ वाजले मुक्कामी पोहोचायला, घरच्या वाटेवर असताना सर्वांनाच अनेक वर्षानंतरच्या भेटीचा आनंद झालाय याची जाणीव झाली. सुस्थितीतील राहणीमानांत झालेल्या सोयीने माझेही मन सुखावले. प्रत्येक क्षण इथली दैनंदिनी समजून घेण्याच्या प्रयत्नांत होता, अर्थात ते काही एक-दोन दिवसांत शक्य नाही. पण आजवर ऐकिवात आलेल्या माहितीनुसार निरिक्षण सुरू होते. दोन रात्री उशिरापर्यंतची गर्दी पहाता आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता, कार्यक्रमांस एकटीने लोकलचा प्रवास करायचा असे ठरवले, तसा विचार मुंबईकरांना सांगताच आश्चर्य आणि आनंद एकत्र पहायला मिळाले. कार्यक्रमांला जायच्या आधी अजून एक बंगलोर समूहांतील कुटुंब जे आता ऑस्ट्रेलिया मध्ये वास्तव्य करताहेत त्यांच्याशीही संपर्क केला.

दुपारचे दोन वाजताच काव्यसंमेलनासाठी बाहेर पडले, “भांडूप ते भायखळा लोकलने प्रवास करा आणि मग टॅक्सीने मराठा मंदिरला जा” असे योग्य मार्गदर्शन स्थानिकांनी आधीच केल्यामुळे कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचता आले. कार्यक्रमाची सुरवांत आयोजकांनी ‘महाराष्ट्र दिन’ या माझ्या काव्यसादरीकरणाने केली. चार-पाच तास कार्यक्रमांत असताना अनेक नवीन ओळखी झाल्या. ‘बहावा’ काव्यसंग्रहाच्या कवियत्री संध्या केळकर तसेच ‘काव्यललिता’ कवियत्री ललिता गाढवे यांची पुस्तके भेट मिळाली. माझा कथासंग्रह घरी आल्यावर पाठवून देण्याचे ठरले, गप्पांच्या ओघांत परतीच्या प्रवासांत दोघी असणार याची खात्री पटली. येताना मुंबई सेंट्रल ते दादर व नंतर दादर ते भांडूप हा पुनश्च केलेला लोकलचा प्रवास मैत्रीच्या खूप साऱ्या गप्पांमध्ये कसा झाला कळलाच नाही. दादरला या मैत्रीस मोगऱ्याचा सुगंधही लाभला. माझे परिचित भेटेपर्यंत या नवसख्यांनी उत्तम साथ दिली आणि इथेच मुंबईची माणुसकी अनुभवता आली, एका मैत्रीच्या अनाहूत उगमाने अपरिचित ठिकाणेही अविस्मरणीय ठरली.

 

मेघनुश्री, लेखिका पत्रकार

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा