*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऊनसावलीचा खेळ…*
ऊन सावलीचा खेळ जीवन आहे सार
कधी चटके चटके कधी भासे थंडगार..
वीजा कडाडती कधी येई तो मुसळधार
वाहूनच जाते सारे सुखदु:ख घरदार…
कधी टरारती कोंभ धरित्रीच्या अलवार
हिरवळ हिरवळ “ख” दिसे निळेशार
वाऱ्यावर डुलतात जीवनाची सारी पाने
आणि जिकडे तिकडे घुमते मधुर गाणे…
कधी आक्रंदते मन भेग पडे हृदयात
नाती गमावती जेव्हा भासतसे काळरात
होते सृजन घरात जीव नवे जन्मा येती
मनामनातून पिके चिखलात भातशेती…
जाई यशाची पताका कधी उंच आभाळात
कधी खंजिर पाठीत अवचित घातपात
काय वाढून ठेवले कधी आकळत नाही
कधी काळी कधी निळी असे जीवनाची शाई..
ऊनसावलीचा खेळ असा चाले अविरत
पत्ते नसती हातात कठपुतळीची गत
जे जे आले हो हातात गोड मानून चालावे
जगनियंता पाठीशी त्याचे आभार मानावे…
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)