You are currently viewing ⛳किल्ले यशवंतगड⛳

⛳किल्ले यशवंतगड⛳

*⛳किल्ले यशवंतगड⛳*

सन २०१८ साली यशवंतगड बघितला तेव्हा पुरातत्व विभागामार्फत त्याचे संवर्धन नुकतेच सुरु झालेले होते. त्यावेळी गडावर नक्की कोणत्या वास्तू आहेत हेही मला माहिती नव्हते. गेल्यावर्षी व या वर्षी संवर्धन मोहिमेत सहभागी झालेलो होतो परंतु संपूर्ण गड बघण्याचे समाधान काही लाभले नाही. आरोंदा येथे शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी माझा मित्र विशाल परब जात होतो त्यावेळी जाताना यशवंत गड पाहूनच जायचे असे आम्ही ठरवले.
गडाच्या आत प्रवेश करताना उजव्या हातास भक्कम बुरुज आहे. या दरवाज्याचे व बुरुजाचे संवर्धन करण्यात आलेले आहे. आत गेल्यानंतर बालेकिल्ल्यापर्यंत आपल्याला मजबूत अशी तटबंदी लागते. डाव्या बाजूस २५-३० मीटर अंतरावर ३० ते ४० फूट खोल व १० फूट लांबी रुंदी असलेलेली कोरडी विहीर लागते. पावसात शक्यतो यामध्ये पाणी असावे. पुन्हा मागे येऊन पश्चिमेकडे चालत गेल्यास बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत गेल्यावर आपल्याला दोन्ही बाजूस खंदक दिसतो तो खंदक संपूर्ण बालेकिल्ल्याच्या भोवताली खणलेला आहे. हे बघता बघता पुढे आल्यास आपल्याला अजून एक तिसरा भक्कम दरवाजा लागतो. आत गेल्यावर आपल्याला तिसरा दरवाजा लागतो. या दरवाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या डाव्या बाजूस एक दिंडी दरवाजा असून तो थेट तिसऱ्या दरवाजाच्या आत उघडतो. म्हणजे मुख्य दरवाजा बंद असताना आपल्याला या मार्गे गडाच्या आत प्रवेश करता येऊ शकते. या तिसऱ्या दरवाजाच्या आत आल्यावर दोन्ही बाजूस देवड्या आणि समोर तीन कमान असलेली ओवारी दिसते. शक्यतो पहारेकऱ्यासाठी या देवड्या व ओवऱ्या असाव्यात. या ओवऱ्या व देवड्या पाहून झाल्यानंतर उजवीकडे वळल्यास आपल्याला बालेकिल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो. याही दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवड्या आहेत. हे चारही दरवाजा किल्ल्याच्या सौंदर्याबरोबर संरक्षणच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्याबाजूस आपल्याला मंदिर लागते. या मंदिरात आपल्याला कोणताच देव मात्र दिसत नाही. मंदिराजवळच आपल्याला एक भव्य इमारत लागते. हा बालेकिल्ल्यातील राजवाडा आहे. हा राजवाडा एक भूलाभूलैयाच आहे. अनेक दालने, अनेक दगडी स्तंभ, उंच भिंती अशी वैशिष्ट्यपूर्ण ही इमारत आहे. हा राजवाडा पाहताना आपण नेमके कुठून जातो, कुठे बाहेर पडतो हेच समजत नाही. येथील लाकडी तुळ्या १८६२ पूर्वीच नाहीश्या झाल्या असे म्हणतात. राजवाडा पाहून झाल्यावर तटबंदीजवळ बुरुज व एक मोठी पायऱ्या असलेली विहीर लागते. विहिरीकडून तट उजव्याबाजूस ठेवून चालत गेल्यास तटामध्ये आपल्याला चोर दरवाजासारखा दरवाजा आढळतो. काही अंतरावर याच प्रकारचे कोसळलेले बांधकाम आपणास आढळते. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. शक्यतो खंदकातून गडाबाहेर जाणारा हा मार्ग असू शकतो. गडाच्या ताटामध्ये दोन मोठ्या खोल्या बांधलेल्या आपणास दिसतात. या खास सैनिकांसाठी बांधल्या जात असत, यांना अलंग असे म्हणतात. गडाची तटबंदी सुमारे दीड मैल आहे. पुन्हा एकदा आपण चौथ्या दरवाज्याच्या वर येऊन आपली गडभ्रमंती संपते.

रेडी गावचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात ‘रेवतीद्वीप, म्हणून येतो. चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे ६१०-११मध्ये मुख्य केंद्र होते. समुद्रातील व्यापारी गलबतांवर टेहळणी करता यावी, या उद्देशाने विजापूरचा आदिलशाहाने हा रेडी किल्ला उभारला. १६६२मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकता. किनारपट्टीवर आपले महत्वाचे ठाणे असावे, यासाठी त्यांनी किनारीदुर्ग या प्रकारात मोडणारा यशवंतगड दुरुस्त करून मजबूत केला. वाडीकर सावंतांवर पोर्तुगिजांचे वर्चस्व असावे म्हणून गोव्याचा गव्हर्नर कोंद दि अशुमर याने १७४४ ते १७४६ या काळात वाडी संस्थानच्या मुलखावर स्वारी केली. या स्वारीत त्याने डिचोली, साखळी व पेडणे हे तीन महाल आणि हळर्ण, तेरेखोल, निवती व यशवंतगड हे चार किल्ले जिंकले. १७५७मध्ये त्याने नवीन गव्हर्नर माक्र्किस दि अलर्न याला अशी लेखी सूचना कळवली की, जर वाडीकर तह करून डिचोली, साखळीपासून आरवंद्याच्या नदीपर्यंत तेरेखोलच्या किल्ल्यासह सर्व मुलूख पोर्तुगिजांना देत असतील, तर त्या बदल्यात त्यांना रेडीचा यशवंतगड व निवती हे दोन किल्ले द्यावेत; कारण वाडीकर पुढच्या काळात आपले शत्रू जरी झाले, तरी हे दोन्ही किल्ले आपल्या आरमाराच्या बळावर सहज जिंकता येतील.’
२८ जानेवारी १७६५ रोजी इंग्रजांनी सिंधुदुर्ग जिंकला व करवीरकर छत्रपतींना आव्हान दिले. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्रजांनी वाडीकरांच्या ताब्यातील यशवंतगड जिंकला. या प्रसंगी इंग्रजांनी यशवंतगडाला वेढा घातला असता वाडी संस्थानचा कारभारी जिवाजी विश्राम याने वाडीकर सरदेसाईंना लिहिलेल्या पत्रात ‘सेवेसी जिवाजी विश्राम विनंती उपर आज शुक्रवार दुपार जाणोन यानंतर इंग्रजांनी चौवकडून सिलांदाज करून रात्रीपासून किल्ला जेर केला. किल्लेकरांमधी अवसान राहिले नाही. बाहिरलेकडून येलगार करावा, तर इलाज नाही. तशामध्ये उपाय होईल ते करितो. दारू अगदी नाही. पाठवली तीही सरली. त्यामुळे घात जाहला. फिरंगी यास कागद सांभाळकीचे लिहून त्यात यशवंतगडची कुमक करावी असे लिहावे व दारुगोळेविसी लिहून सत्वर कागद रवाना करून द्यावे,’ असा उल्लेख आढळतो. इंग्रजांनी या वेळी सावंतांशी तह केला. त्यामुळे यशवंतगड वाडीकरांना देऊन त्या मोबदल्यात मसुऱ्याच्या साळशीची खाडी व कर्लीची खाडी यांच्यामधील घाटमाथ्यापासून ते बंदर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश व दोन लक्ष रुपयांची जहागिरी मिळविली. काहीतरी कुरापत काढून भांडण करायचे व आपल्या सशस्त्र आरमाराच्या जोरावर पश्चिम किनाऱ्यावरील नवनवी ठिकाणे जिंकायची, अशी योजना इंग्रजांची होती. यशवंतगडाच्या मानहानिकारक पराभवामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नातसून करवीरकर जिजाबाईंनी कारभारी जिवाजी विश्रामला पत्रे लिहून तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे दिसते.
वाडीकर सावंतांना मोगल बादशाहाने ‘राजेबहादर’ हा किताब व मोर्चेलचा मान दिल्याचे करवीरकर छत्रपतींना व पेशव्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी १७८७माले वाडीकरांवर स्वारी केली. या स्वारीत त्यांनी वाडीकरांच्या बहतेक प्रदेशावर ताबा मिळविला. फेब्रुवारी १७८८मध्ये त्यांनी यशवंतगडाची नाकेबंदी केली; मात्र वाडीकरांनी पोर्तुगिजांची आरमारी मदत घेऊन करवीरकर पेशव्यांच्या संयुक्त फौजेला यशवंतगड जिंकू दिला नाही.
१८०३ मध्ये खेम सावंत यांच्यानंतर वाडी संस्थानामध्ये मतभेद वाढले. श्रीराम सावंतव सोम सावंतांच्या मतभेदात सोम सावंतांनी आपल्या कुटुंबासह वाडीच्या कोटात अग्नीत उडी टाकून आपले जीवन संपवले. यामध्ये वाचलेल्या सोम सावंतांच्या पुत्राने म्हणजेच फोड सावंतांनी यशवंतगडाचा आधार घेऊन बापाच्या मृत्यूचा सूड घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी करवीरकरांकडे मदत मागणारे पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले की, ‘जे या समयी असले जीवदान देऊन घेऊन जावे.’ या पत्राच्या विनंतीवरून करवीरकरांनी डिसेंबर १८०४ मध्ये राजश्री रत्नाकरपंत राजाज्ञा यांना फोंड सावंत यांच्या मदतीला पाठविले. या वेळी फोंड सावंतांनी यशवंतगड करवीरकरांना दिला. १८०६ मध्ये वाडीकर खेम सावंतांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाईंनी वाडी संस्थानचा राज्यकारभार सांभाळताना आपला भाऊ रामचंद्रराव खानविलकर यांना सैन्यासह यशवंतगडावर पाठविले. खानविलकरांनी करवीरकरांकडून यशवंतगड जिंकला व किल्लेदार म्हणून संभाजी गोविंद सावंत यांची नेमणूक केली.
जानेवारी १८१३मध्ये भरतगडच्या मुद्द्यावरून करवीरकर छत्रपती व वाडी संस्थान यांच्यात पुन्हा युद्ध झाले. या युद्धात मसुऱ्याचा भरतगड सावंत यांनी जिंकला. तेव्हा इंग्रजांनी करवीरकरांना मदत करून पुन्हा तो किल्ला सावंतांकडून जिंकला. या मोहिमेसाठी इंग्रजांना बराच खर्च आला. म्हणून या खर्चाची भरपाई ते सावंतांकडे मागू लागले. कर्नल डाऊसीने यशवंतगड ताब्यात घेऊन वेंगुर्ल्यावरही आपला हक्क सांगायला सुरुवात केली. या वेळी इंग्रज-सावंत यांच्यात तह झाला आणि त्याअन्वये केवळ नावापुरता किल्ला वाडीकर सावंतांना मिळाला.
१८१७ मध्ये सावंत व पोर्तुगीज यांच्यात वाद उद्भवला. पोर्तुगिजांनी सावंत यांच्या ताब्यातील तेरेखोल जिंकून यशवंतगडाला २५ तोफांसह वेढा घातला. तेव्हा दुर्गाबाईंनी स्वतः वेंगुर्ले-होडावडेपर्यंत येऊन सैन्याला रसद पुरवून बळ दिल्याचे दिसते. पोर्तुगिजांचा हा वेढा २७ दिवस होता. यात त्यांचे अतोनात नुकसान झाले. अखेरीला त्यांना वेढा उठवून किल्ला न जिंकता जावे लागले. यावरून आपल्याला दुर्गाबाईंची राजनीती, शूरता व युद्धकुशलता समजते.

दुर्गाबाईनी निवती व यशवंतगडावर नेमलेले किल्लेदार पुढील काळात माजले. त्यांनी त्यांच्या मर्यादा सोडून रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली; तसेच समुद्रावरही उपद्रव द्यायला प्रारंभ केला. ते ब्रिटिशांची व्यापारी जहाजे पकडू लागले. ब्रिटिशांना निमित्तच हवे होते. जानेवारी १८१९मध्ये दुर्गाबाईच्या मृत्यूचा ब्रिटिशांनी लाभ उठविला. सर विल्यम केर याने तलवारीचा धाक दाखवून तीन वर्षांसाठी यशवंतगड व निवतीचा ताबा इंग्रजांसाठी मिळविला. वाडी संस्थानची आर्थिक घडी विस्कटलेली असल्यामुळे इंग्रजांनी यशवंतगड कायमचाच आमच्या ताब्यात असावा, या मागणीसाठी सावंतांवर दबाव आणला. वाडीकरांचा सरदार चंद्रोबा सुभेदारला फितवून यशवंतगड बळकावला. सैन्यबळाच्या जोरावर वाडी संस्थानच्या मुलखात ब्रिटिशांना कुठेही येण्या-जाण्याची मुभा असावी, अशी अट मंजूर करून घेऊन वाडी संस्थानचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. कॅप्टन अचिन्सन सावंतवाडीच्या कोटात येऊन राहिला. अशा रीतीने एकेकाळी प्रबळ असलेले वाडी संस्थान अखेरीस अंतर्गत कलहामुळे दुबळे झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती गेले. (इतिहास संदर्भ – मालवणी मुलुखातील इतिहासाचे पहारेकरी : श्री संदीप तापकीर)

*गणेश नाईक*
📱९८६०२५२८२५

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा