‘कोकणकन्ये’तून पडून सिंधुदुर्ग मधील प्रवाशाचा मृत्यू
सिंधुदुर्ग
उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रस्तेमार्गे कोकणात पोहोचणे अधिक खर्चिक व वेळखाऊ असल्याने, कोकणवासी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रचंड गर्दी असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. अमित पवार असे या प्रवाशाचे नाव आहे.
मूळचे सिंधुदुर्ग येथील अमित पवार हे कांदिवलीतील चारकोप परिसरात वास्तव्यास होते. कोकणातील गावी जाण्यासाठी गुरुवारी त्यांनी कोकणकन्या एक्स्प्रेसचा पर्याय निवडला. आरक्षण पूर्ण झाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रचंड गर्दी असल्याने, त्यांना डब्यात प्रवेश करता आला नाही. जनरल डब्याच्या दरवाजावरील पायदानावर लटकत प्रवास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र दादरच्या फलाट क्रमांक ११ वरून गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला, ते फलाटाच्या टोकावर पडले आणि गाडीच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
कोकणकन्या एक्स्प्रेसमधील जनरल डब्यातून गुरुवारी रात्री ११.१५ वा. प्रवास करताना तोल गेल्याने प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.