You are currently viewing पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव; महावितरण सुशेगाद

पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव; महावितरण सुशेगाद

*महेश कुबल यांनी वेधले लक्ष*

 

सावंतवाडी :

जिल्हा प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिला असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे पाडलोस, दांडेली भागात विजेचा खेळ खंडोबा झाला. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना शनिवारी पूर्ण रात्र विजेविना काढावी लागली. काही व्यापाऱ्यांचे नुकसानही झाले. पावसाळा तोंडावर आला असून महावितरण विभागाची अशी कार्यवाही ग्राहकांना पावसाळ्यात चिंताजनक ठरणार असल्याचे पाडलोस शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख महेश कुबल यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. मात्र महावितरण विभाग मान्सूनपूर्व कामगिरी पासून अद्याप दूरच असल्याचे शनिवारी दिसून आले. शनिवारी संध्याकाळी मडुरा पंचक्रोशीत वादळी पाऊस सुरू झाला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता. गेल्यावर्षी पाडलोस रवळनाथ मंदिरात सावंतवाडी उपअभियंता चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुरुस्तीची अनेक आश्वासने अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे महेश कुबल यांनी सांगितले.

शनिवारी झालेल्या पावसात उन्हाळी कामे झाली नसल्याने महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पहिल्या पावसातच दिसून आला. येत्या पाच दिवसांत सर्व कामे मार्गी लावा अन्यथा पुढचे पाऊल टाकावे लागणार असा इशारा पाडलोस शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख महेश कुबल यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा