You are currently viewing स्मृति भाग ६७

स्मृति भाग ६७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६७*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

काल आपण गौतम स्मृतिमधील प्रथम अध्यायाची सुरवात पाहिली . आशा आहे की आपणास आवडली असावी . पुढे उपनयन संस्कराची गणना गर्भावस्थेपासून करावी , असे सांगून ब्राह्मणांसाठी सोळा वर्ष , क्षत्रियांसाठी बावीस व वैश्यांसाठी चोवीस वर्ष सांगून ठेवली आहे . तो पर्यंत सावित्री वा गायत्री त्यांचेसाठी पतित होत नाही , असे म्हटले आहे . मग हे क्षत्रिय व वैश्यांना दिलेली काही काळापुरती सूट समजावी का ? कुशंकासुरांना वा अनभ्यासुंसाठी हा भेद असावा , पण मला ही इतर वर्णियांना दिलेली सूट वाटते .

पुढे शुद्धिकरणाचे वर्णनात धातु , माती , लाकूड व तन्तु यांनी बनलेल्या वस्तुंसाठी क्रमशः घासणे , जाळणे , तासणे व धुणे याने शुद्धि करावी . आणि जी वस्तु अत्यंत मलीन झाली असेल तिचा त्याग करावा . इतक्या बारीकसारिक सूचना स्मृतित दिलेल्या आढळतात . झोप झाल्यावर , जेवण झाल्यावर व शिंक आल्यावर पुन्हा आचमन करावे , म्हणजे गुळण्या कराव्या हा मतितार्थ घ्यावा .

मलमूत्र त्याग , वीर्यस्खलन वा संबंधपश्चात् , भोजनादिच्या संयोगात पाणी व मातीने शुद्धिकरणाचे विधान आहे . ( कोरोना काळातच काय पण पुढे येणार्‍या सर्वच जनपदोपध्वंसीय व्याधींसाठी या व अशा शुध्दीकरणाच्या विधांनाचा उपयोग व्हावा वा साकल्याने विचार व्हावा. ) ( आणि हो माझी संस्कृती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ब्राह्मण होण्याचा अधिकार देते बरं !!! पण कुणाला शारीर , मानसिक व वाचिक शौचच पाळायचे नसेल तर काय करणार ऋषि संत तरी !!!!! ) प्रातःकाळी , वेदाध्ययनाचे आदि व अंतास गुरु चरणांचे वन्दनाचे सांगणे आहे ऋषिंचे !! पण आता विज्ञान युग आहे , असे म्हणतात ना ? बरेच विद्यार्थी मदिरामृताचे दानाने सेवा करतांना दिसतात !! ( आमच्या लहानपणापासूनच संस्कृत भाषा उडवण्याचा घात रचला गेला ! कुणाला सुसंस्कृतच व्हायचे नसेल तर ऋषि तरी काय करतील ? ) ही प्रगति आहे का अधोगति ? धर्म आहे का अधर्म ? कळते पण वळत नाही , अशी दुर्योधन नीतिने संस्कृति रसातळास चालली आहे .

सावित्री , उपदेश , वेदाध्ययन वा अन्यत्र ( सर्व अध्यात्मिक , आधिदैविक वा आधिभौतिकही ) प्रत्येक कार्या आगोदर प्रणवोच्चार करुन मग आरंभ करावा , असे विधान आहे .

सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ?

 

इत्यलम् ।

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२१

प्रतिक्रिया व्यक्त करा