पर्यटकांच्या संख्येत वाढ, बांदा शहरात वाहतूक कोंडी..
उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने वाहतूक धिम्या गतीने…
बांदा
सुट्ट्या सुरु झाल्याने व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने बांदा शहराला दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
गेल्या चार दिवसात वाहनचालकांना अभूतपूर्व अश्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरात उड्डाणंपुलाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यातच शहरातून सावंतवाडी, दोडामार्ग, गोवा तसेच आंबोलीकडे जाणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्र येत असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांबरोबरच स्थानिक वाहन चालकांना देखील बसत आहे.
सध्या सुट्ट्या सुरु झाल्याने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मोठ्या प्रमाणात उन्हाळी सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रस्ता मार्गाने गोव्यात जायला प्राधान्य देत आहेत. यामुळे याठिकाणी वाहतुकीची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने तसेच पाऊस सुरु होण्यासाठी अवधी असल्याने बांदा वासियांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.