*शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमक*
ईडीने संजय राऊत यांना पत्नीसह २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याची नोटिस मिळाली आहे. याआधीही ईडीने राऊत यांना हजर होण्यास सांगणारी नोटिस दोनवेळा दिली आहे.
पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटिस बजावल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शाब्दिक चकमकींना उधाण आलेले आहे. याचप्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांनी सोमवारी ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असे बॅनर लावले आहे.
ईडी भाजपाच्या आदेशावर काम करत असल्याचा आरोप
हे बॅनर लावून शिवसेनेच्या नेत्यांनी सक्तवसुली संचलनालयाला भाजपाचे प्रदेश कार्यालय म्हणत ईडी हे भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला आहे. बॅनर लावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटिस बजावत २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याआधीही ईडीने राऊत यांना हजर होण्यास सांगणारी नोटिस दोनवेळा दिली आहे.
संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेत ईडी प्रकरणावरून हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशी संदर्भात शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही, पण गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत. त्यांना ईडीच्या कार्यालयात सहज प्रवेश मिळत आहे. भाजपचे तीन नेते तिथून कागदपत्र काढतात आणि ते माहिती लीक करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार बनवण्यात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर संजय राऊत नेहमीच आक्रमकपणे टीका करत असल्याचं पहायला मिळतं. त्यानंतर ईडीची नोटीस आल्याने विरोधक सत्तेचा गैरवापर करुन सुडाचे राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.