You are currently viewing कुडाळ येथे 10 मे रोजी कोकण समर फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन

कुडाळ येथे 10 मे रोजी कोकण समर फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन

कुडाळ :

 

छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मे 2024 या कालावधीत नगरपंचायत पटांगण, बाजारपेठ कुडाळ येथे संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच युवा कलाकारांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम, गौरी धडाम, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाठ यांनी दिली.

प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. जिल्ह्यातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, मसाले, दागिने, कपडे, कोकणी मेवा, मातीची भांडी, लाकडी वस्तू, चटई, घरगुती पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा यांचे स्टॉल्स येथे असतील. युवा कलाकारांना संधी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवा मध्ये होणार आहे.

यावर्षी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आपला सर्वांचा लाडका कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे याचे कोकणचा शाश्वत विचार या विषयावर त्याचे विचार ऐकायची संधी शनिवारी 11 मे ला मिळणार आहे. तसेच आपल्या सिंधुदुर्ग मधील जेष्ठ मालवणी कवी श्री दादा मडकईकर यांच्या खुमासदार कविताचे वाचन आणि मालवणी गजाली सुद्धा शुक्रवारी 10 मे ला ऐकायला मिळतील.

तसेच पहिल्या दिवशी शिरोड्यातील अनिता कराओके यांचा सिंगिंग शो आयोजीत केला आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या नेरूर गावातील हर्षद मेस्त्री याचा नवीन जुन्या गाण्यांचा बहारदार असा हर्षनाद नावाचा सांगितीक कार्यक्रम आयोजित केला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी साई संकल्प आणि साई कलामंच निर्मित नृत्यरंग चा शो आयोजीत केला आहे. तसेच बाबा मेस्त्री नेरूर यांचा पपेट शो देखील बघायला मिळेल. लहान मुलांसाठी सुद्धा गेमिंग झोन ची व्यवस्था केलेली आहे.

यावर्षी च्या फेस्टिवल चे खास आकर्षण असणार आहे – सेल्फि पॉईंट… आणि आपल्याच सिंधुदुर्ग मधील इंस्टाग्राम फेम क्रीएटर कोकणी पोरग्या फेम निधी वारंग, मिस्टर स्टोर्म फेम सिद्धेश चव्हाण, ओंकार पालव यांची देखील उपस्थिती असेल.

त्यामुळे या महोत्सवात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी मनोरंजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा