साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजाची नस ओळखून साहित्य निर्माण झालं की बदल हा निश्चित घडणारच. तुमची लेखणी विद्रोह करू शकते. क्रांतीची मशाल पेटवू शकते, तशीच ती समाजाला नवी दिशा देऊ शकते, नवसमाज निर्मितीस हातभार लावू शकते, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांनी केले.
पुलगाव जिल्हा वर्धा येथे अव्यक्त अबोली बहुउद्देशिय संस्थेच्रा पांचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठीचे जतन, संवर्धन व त्याची डिजिटल तंत्राशी सांगड घालून ती अधिकाधिक समृद्ध कशी होईल आणि नव साहित्य व समाज निर्मितीस कसा हातभार लागेल यावर भर दिला.
संमेलनाचे उद्घाटक मा. मनोहर शहारे यवतमाळ, स्वागताध्यक्ष पत्रकार चंद्रकांत शहाकार, प्रमुख अतिथी मिलींद खोब्रागडे यांच्या उपस्थितीत या दोन दिवशीय संमेलनात उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन, एकपात्री प्रयोग, गझल मुशायरा, कविसंमेलन व रक्तदान शिबिर संपन्न झाले.
अव्यक्त अबोली बहुउद्देशिय संस्थेचे सचिव मा. योगेश ताटे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षा मा. जयश्री चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनासाठी नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नाशिक, मुंबई येथील साहित्यिक पुलगाव नगरीत आले होते. संमेलनात विविध ठरावही संमत करण्यात आले.
संस्मरणिय झालेले हे साहित्य संमेलन नव ऊर्जा, नव प्रेरणा देणारे ठरले.