You are currently viewing एका मताला १००० रुपये देणारा श्रीमंत राजकीय पक्ष तरी कोणता..?

एका मताला १००० रुपये देणारा श्रीमंत राजकीय पक्ष तरी कोणता..?

*सिंधुदुर्गात नाक्या नाक्यावर पैसे वाटपाचीच चर्चा*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या सीमेला लागून असलेला दोडामार्ग हा छोटा तालुका. जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने विकासापासून काहीसा दूरच..! त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात अनेक समस्या असून त्याचे निराकरण मात्र कुठल्याही राजकीय पक्षाने केलेले नाही. गेली अनेक वर्षे दोडामार्ग ग्रामपंचायत असल्यापासून व आता अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीवर ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी आजही दोडामार्गचा विकास केलेला दिसत नाही. त्यामुळे दोडामार्गातील समस्या आजही जैसे थे आहेत.

दोडामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे जिथे दोन दोन वीज निर्मिती केंद्र आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वीज निर्मिती होऊनही अनेकदा दोडामार्ग तालुका अंधारातच असतो. परंतु दोडामार्ग तालुक्यातील वीज निर्मिती केंद्रातील वीज महाराष्ट्राच्या पर्यायाने दोडामार्गच्या वाट्याला न येता ती गोवा आणि कर्नाटक कडे वितरित केली जाते. राजकीय नेत्यांना त्याचे सोयरसुतक देखील नाही. त्यामुळे तालुक्यात विजेच्या देखील अनेक समस्या आहेत. व्यापारी वर्ग सुद्धा मेटाकुटीला आलेला आहे.

दोडामार्ग तालुक्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून राजकीय पक्षांचे धुरंदर नेते निवडणुका आल्यावर मतदारांच्या हातावर शेलकी टेकवतात आणि मतांची बेगमी करतात. असाच प्रकार काल शनिवारी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशीतील वरच्या वाडीत घडला. एका राजकीय पक्षाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते साटेली भेडशी येथील वाडीतील घराघरात फिरून आपल्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करत होते. परंतु ज्यांनी सत्तेत असूनही तालुक्यातील समस्यांकडे कधीही ढुंकूनही पाहिले नाही त्यांचे आवाहन केवळ शब्दांनी करून भागणार नाही याची खात्री असल्याने त्या राजकीय पक्षातील नेते मतदार यादीचे ए बी व सी असे तीन भाग करून ए व बी गटाला प्रत्येक मताला एक हजार रुपये देत होते तर सी गटातील मताला पैसे देत नव्हते. त्यामुळे प्रत्येक मताला १००० रुपये प्रमाणे पैसे मिळालेले ए व बी गटातील मतदार आनंदात होते आणि सी गटातील मतदार नाराज दिसत होते. परंतु याप्रमाणे पैसे वाटप करून मतदारांना विकत घेण्याचे लोकशाही विरोधी कृत्य करत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कानावर गेले. तात्काळ या घटनेची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचे समोर आले त्या घरावर अचानक छापा टाकल्याने घरात पैसे वाटपासाठी बसलेले राजकीय नेते आणि कार्यकर्ते घराच्या मागील बाजूने पसार झाले. यावेळी त्या मातब्बर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वतःचे चप्पल सुद्धा टाकून पळाल्याची मजेशीर माहिती समोर येत आहे. साटेली भेडशी येथे घडलेला पैसे वाटपाचा प्रकार देशातील कोणता श्रीमंत पक्ष करू शकतो..? याची साटेली भेडशीतील नाक्या नाक्यावर पानाला कात, चुना लावून तोंड लाल करतात तशी लाल करून चर्चा सुरू होती आणि निवडणूक अधिकाऱ्यांची धाड पडल्यानंतर ढुंगणाला पाय लावून पळालेल्या राजकीय नेत्यांची चर्चा सुद्धा रंगात आली होती.

लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या भारत देशात आजही लोकशाहीसाठी पैसे का वाटावे लागतात..? नोटबंदी नंतर देशोधडीला लागलेल्या जनतेला असा कोणता श्रीमंत पक्ष आहे जो प्रत्येक मताला १००० रुपये प्रमाणे वाटप करतोय..? कोणत्या राजकीय पक्षांकडे असा अमाप पैसा आहे..? असे प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या मनात डोकावू लागले आहेत. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले शासन. या लोकशाहीने देशातील प्रत्येक मतदाराला स्वतःचे मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आपले पवित्र मत देऊन एका चांगल्या उमेदवाराला देशाच्या संसदेत पाठविण्या ऐवजी आजही काही मतदार पाच वर्षातून एकदा मिळणाऱ्या एक दोन पाचशे रुपयांच्या हिरव्या नोटांसाठी आपले इमान विकत आहेत, हे केवळ देशातील लोकशाहीसाठी लाजिरवाणे नसून जे आपले इमान विकतात त्यांच्यासाठी सुद्धा लाजिरवाणे, निर्लज्जपणाचे कृत्य आहे. आजही क्षुल्लक पैशांना मतदार आपले इमान विकतात हे पाहिल्यावर अशा मतदारांपेक्षा जास्त पैशाला कुत्री, मांजरे, जनावरे विकली जात असल्याने इमान विकणारे मतदार म्हणजे कुत्री मांजरांपेक्षा स्वस्त आहेत की काय..?? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात फोफावत चाललेली महागाई, भरमसाठ वाढलेल्या औषधांच्या, धनधान्य, पेट्रोल डिझेल, घरगुती वापराच्या गॅसच्या किंमती, वाढत असलेली बेरोजगारी, आरोग्य, शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण आदी अनेक समस्यांनी नागरिक, मतदार त्रस्त असताना देखील हजार दोन हजारसाठी आपले इमान विकून पाच वर्षे का ओरडत बसतात..? “ते पाच वर्षे आपल्याला लुटतात तर आपण त्यांना एकदा का लुटू नये..?” ही मतदारांची मानसिकता मतदारांना पाच वर्षे संकटात, महागाईच्या महापुरात ओढून नेत असते. परंतु मतदारांना याची यत्किंचितही जाणीव का होत नाही..?

असा प्रश्न पैसे घेणारे मतदार पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतो आणि पैसे घेऊन आपले मत, आपला अधिकार विकणाऱ्या मतदारांबद्दल अनेकांच्या मनात घृणा निर्माण होते.

एकीकडे आपले मत आपले इमान विकणारे मतदार तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांची सत्ता काबीज करून स्वतः सत्तेत आलेले आणि विकासाचे महामेरू म्हणून मिरवणारे सत्ताधारी मत विकत घेतात ते कशासाठी..? जर त्यांनी आपल्या सत्ता कालावधीत विकासात्मक कामे केली, लोकांच्या सुखासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी शासन चालविले तर त्यांना मते का विकत घ्यावी लागतात..? ज्यांनी जनतेसाठी राज्य केले त्यांना जनतेच्या दारावर जाऊन मते विकत घेण्याची पाळी का येते..? याचा सारासार विचार करण्याची वेळ मतदारांवर आलेली आहे.

देशातील मतदारांनी आपले मत विकून, इमान गहाण ठेवून स्वतःच्या नजरेत उतरायचे की, आपल्या आत्म्याला स्मरून आपले मत देश हितासाठी, विकासासाठी द्यायचे.. याचा विचार करूनच आपले अमूल्य मत देणे आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला गाडून टाकणे हे केवळ मतदारांच्या हातात असते.. फक्त आपले ईमान राखून सत्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा