*दलित कुटुंबातील बाबासाहेबांनी लिहलेली घटना बदलण्यासाठीच मोदी- शहांचा ४०० पारचा नारा -उद्धवजी ठाकरे*
*उद्धवजी ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेला तुफान गर्दी*
*कोकणातील जनता राणेंचा तिसऱ्यांदा पराभव करून त्यांना कायमचे हद्दपार करेल- खा. विनायक राऊत*
*भाजपने राणेंची अवस्था “वाजली तर पुंगी नाही तर गाजर” अशी केली – आ. वैभव नाईक*
शुभ बोल नाऱ्या कोणाला धमक्या देत आहे,मला अडविण्याची व धमकीची भाषा वापरून, तसा प्रयत्न त्याने केला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिला. बाळासाहेबांनी याच नाऱ्याला शिवसेनेतून गेट आउट केले होते. श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, अंकुश राणे यांच्या हत्या कशा झाल्या? हे शहांना माहित नाही का? नाऱ्याला भाजपमध्ये घेऊन शुद्धीकरण केले का ? भाजपला राणे पित्रा-पुत्राची घराणेशाही मान्य आहे काय? असे सवाल उधवाजींनी करत मोदी-शहांनी माझ्या वडिलांचे नाव घेऊन निवडणूक लढण्यापेक्षा तुमच्या वडिलांचे नाव घेऊन निवडणुका जिंकून दाखवाव्यात.अमित शहा आम्हाला नकली म्हणता मी म्हणतो भाजप हाच बेअकली पक्ष आहे.घटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे दलित कुटुंबातील बाबासाहेबांनी लिहलेली घटना यांना मान्य नाही त्यासाठीच ४०० पारचा नारा मोदी शहा देत आहेत. त्यांचा हा डाव देशवासीयांनी हाणून पाडावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले. अमित शहांनी आपल्या सभांमध्ये बाळासाहेब नव्हे तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करावा, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात समोरील मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाली.या सभेला मोठ्या संख्येने इंडिया महविकास आघाडीचे कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता. नागरिकांच्या गर्दीने ग्राउंड पूर्ण गच्च भरून गेले होते.
याप्रसंगी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत श्री. शिवसेनेचे नेते तथा आमदार अनिल परब, आमदार वैभव नाईक शिवसेनेचे नेते अरविंद भोसले, उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर,शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, माजीमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदीप बोरकर, उपनेत्या जान्हवी सावंत, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोकण विभागीय संघटक अर्चना घारे परब, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत-पालव, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, डाॅ. प्रथमेश सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, गीतेश राऊत, रुची राऊत, स्नेहा नाईक यांसह मविआचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धवजी ठाकरे पुढे म्हणाले, मी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरून मते मागत आहे. मोदी-शहा यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. मोदी-शहा यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर मोदी-शहा यांनी लुटलेले सर्व वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला जनता राजकीयदृष्ट्या तडीपार करेल. महाराष्ट्रातील जनता मशालीची धग काय असते ती भाजपला दाखवून देईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. मोदी, शहा, राणे व भाजपवर ठाकरे शैलीत त्यांनी हल्लाबोल केला.
खासदार विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील 16 प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने गुजरातला पळवले. कोकणाचा विनाश करणार रिफायनरी प्रकल्प लादण्याचे काम महायुती व भाजपकडून सुरु आहे. हा प्रकल्प विनायक राऊत होऊ देणार नाही. सिडकोच्या माध्यमातून कोकणातील जमिनी परप्रांतियांच्या ताब्यात देण्याचा महायुती व भाजपचा कट आहे. मी तसे होऊ देणार नाही. नारायण राणे यांचा दोन वेळा पराभव शिवसेनेने केला. आता तिसऱ्यांदा राणेंचा कोकणातील जनता पराभव करून कोकणातून त्यांना कायमचे हद्दपार करेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
विनायक राऊत म्हणाले,राणेंनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 राजकीय हत्या केल्या. राणे पिता-पुत्रांची गुंडागिरी वाढली असून ही गुंडगिरी गाठून टाकण्याची संधी निवडणुकीच्यानिमित्ताने कोकणवासीयांना मिळाली आहे, या संधीचे सोने करून दोन्ही जिल्ह्यातून राणेंना तडीपार करा, असे आवाहन राऊतांनी केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गासाठी शासकीय मेडिकल महाविद्यालय मंजूर केले. हे महाविद्यालय उभारण्यासाठी 966 कोटींची निधी दिला. जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कार्डियाक कॅथलॅब राणेंनी आपल्या मेडिकल काॅलेजमधील लॅब चालावी याकरिता रद्द करून सोलापूरला पाठवली. राणे हे जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यशी खेळत आहेत, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.
आमदार वैभव नाईक म्हणाले, नारायण राणे हे दोन वेळा राज्यात मंत्री असताना त्यांचा जनतेने पराभव केला. आता नारायण राणे केंद्रीयमंत्री असून त्यांना तिसऱ्यांदा पराभूत करुया. भाजपकडून सिडकोचे नवे दुखणे कोकणावर लादले जात आहे. 8 हजार कोटींचे अर्थबळ असलेल्या भाजपच्या विरोधात आम्ही लढतोय. शिवसेना कोणाची ही येथे जमलेली गर्दी पाहून बोलावे, असा टोला नाईकांनी विरोधकांना लगावला. उद्धव ठाकरे हे माझे प्रेरणास्थान आहे. भाजपने राणेंची अवस्था वाजली तर पुंगी नाही तर गाजर अशी केली आहे, अशी घणाघाती टीका आ. वैभव नाईक यांनी केली.
दीपक केसरकर हा दलबदलू माणूस आहे, अशी टीका प्रवीण भोसले यांनी केली. भाजप हे संविधान विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी जनतेने भाजपला पराभूत करावे, असे आवाहन कमलताई परुळेकर यांनी केले. देशात इंडिआ आघाडीचे सरकार आल्यास महागाई, गरीबी, बेरोजगारमुक्ती देणार आहे. देशात मोदींचे पुन्हा सरकार आल्यास हुकूमशाही येणार आहे. याचा विचार जनतेने केला पाहिजे, गुहागारमध्ये नीलेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन आमदार भास्कर जाधव यांच्यावर अश्लील शब्दांत टीका केली. नीलेश राणेंनी आपल्या भाषणात वापरलेली भाषा जनता विसरलेली नाही. नारायण राणेंनी आपल्या मुलांवर हेच संस्कार केले का अशा प्रकारे अरविंद भोसले, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, विवेक ताम्हणकर, अमित सामंत, साक्षी वंजारे आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले.