*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई*
रात्रीस सामोरी एकदा
स्वप्नात आली आई
आणि कशी पुसते मला
कशी आहेस गं बाई
तिच्या मांडीवर घेवुनी
म्हणते मज अंगाई
स्वर्ग सुखाचे ते क्षण
कसं विसरू गं आई
सांगते कशी मी आईला
अग मजशी देव भेटला
मी केला प्रश्न तयासी
का, नेलेस माझ्या आईला
हसून मग देव बोलला
नव्हती ना ग आई मजला
म्हणोनी माझ्या घरी
नेले मी आपल्या आईला
मी म्हटल देवाला
सुगरण आहे माझी माता
होईल कोंड्याचा मांडा
तुझ्या घरी रोज आता
डोक्यावरती ठेवून हात
आई बोलते कशी
सौख्यात, आनंदे रहा बाळा
गोड सानुली अशी
होईल का? ते स्वप्न खरे
रोज मी वाट पाहे
यावी आई सामोरी
मज टाहो फोडायचा आहे
*शीला पाटील. चांदवड.*