*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*गुलमोहोर*
लाल पिवळी फुल लेवून
उभा राही तप्त झळा झेलत.. पांथस्थांना सावली देई
डोळ्यांना शांतवत.
अहो कोण काय विचारता? आपला गुलमोहोर हो! आलाय तो परदेशांतून पण आता आपलाच झालाय न!
गुलमोहोर…लाल पीत फुलांची पखरण करत..ऐन उन्हाळ्यात शांत तपस्व्या सारखा उभा असतो. येणा-या जाणा-यांसाठी लाल फुलांचा गालीचा अंथरत असतो.. पण कधीतरी यालाही एखाद्या मेनकेची प्रतिक्षा असेल का हो! त्याला..कधीतरी.. कुणीतरी.. सकाळी सकाळी..पैंजणांना रूणझुणवत… या लाल मखमालीवरून नाजुक पदन्यास करीत येईल.. असं वाटतं असेल का!अय्या किती सुंदर फुलं ही! असं तोंडाचा चंबू करत लाडिकतेने ती म्हणेल नी मुळातच लाल असलेला हा आणखीनच लाली लाल होईल.रखरखीत उन्हाळ्यातला हा प्रणय क्षण अनुभवायला मिळेल का हो याला! ्
निसर्गाची किमयाही किती न्यारी आहे न!गुलमोहोर
उन्हाळ्यात फुलतो..बहरतो.. उमललेली ही फुलं धरेवर लाल पीत रंगाचं शिंपण करीत असतात. .. उन्हाळ्यातला हा पहाटेचा छानसा गारवा ..किती सुखद वाटतोय न! .ही रक्तवर्णी फुलं कशी भिरभिरत खाली, रवी राजाच्या स्वागतासाठी येतायेत. मखमाली सडा घालतायेत.आकाशांत लाल केशरी रंगांची पखरण करीत दिनमणीची स्वारी सुवर्णशलाकाचा कुंभ उधळीत येतेय.. क्षितीजावरही सुंदर लाली..पसरलीय.. नी हा गुलमोहोर.. रवी राजाच्या स्वागतासाठी किती अदबीनं उभा आहे. नी तो झुळझुळणारा समीर,गुलमोहोरच्या पर्णशाखांना हलवून स्वागतासाठी हात जोडायला सांगतोय. लाल फुलांनी डवरलेला हा गुलमोहोर! नी मधुप्राशनासाठी गुंजारव करीत उडणारे हे मधुप! गुलमोहोरामुळे किती नयनरम्य सकाळ भासतेय न ही!
गुलमोहाराचे लालचुटुक फूल नी मधोमध दोन तीन तुरे असणारी फुले म्हणजे स्वर्ग फुलेच! लाल पिवळी अशा दोन रंगांच्या फुलांनी उन्हाळ्यात… चैत्रात … हे झाड डंवरलेले असते.. नेत्रसुख देते... साधारण १५ते २० फूट उंचीचे हे झाड ३०–४० वर्षे टिकते नी सिझन संपला तरी ईवलाली नाजुक पाने जास्त काळ हिरवाई टिकवून ठेवतात. गुलमोहोराचे शास्त्रीय नांव आहे डिलॉनिक्स रेजीया.. मादागास्कर मध्ये हा पोर्तुगीजांना सापडला नी आता जगभरात स्थिरावलेला आहे. बहर संपला की याला शेंगा येतात. त्या औषधी आहेत असे मानले जाते. झुपक्यांनी येणा-या फुलांमुळे झाड आकर्षक दिसते. हलणारी डुलणारी फुले मन आकर्षून घेतात. रखरखीत उन्हाळ्यातले जणू रंगीत ओऍसिसच!
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.