ब्ल्यू व्हेल मासा जगातील सर्वात मोठा सागरी प्राणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेल्या शिकारीमुळे या महाकाय जलचरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या सागरी जीवासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील माहितीनुसार हिंदी महासागरात या व्हेलचा एक अज्ञात समूह राहतो. संशोधकांनी आवाजाचे रेकॉर्डिंक करून त्याचे विश्लेषण करून ही माहिती मिळविली आहे. ब्ल्यू व्हेलसंबंधीचा न्यूयॉर्क टाईम्सचा हा रिपोर्ट एन्डेंजर्ड रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. ब्ल्यू व्हेल हा अज्ञात समूह एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढतो. हा आवाज निश्चितपणे अन्य ब्ल्यू व्हेलच्या तुलनेत वेगळा आहे.
तसे पाहिल्यास ब्लू व्हेलच्या प्रत्येक समूहाचा एक वेगळा आवाज असतो. ते ज्यावेळी हा आवाज काढतात, तेव्हा ते गाणे म्हणत असल्याचा भास होतो. या आवाजावरून हिंदी महासागरात एक अज्ञात प्रकारच्या ब्ल्यू व्हेलच्या समूहाचे वास्तव्य असल्याचे संशोधकांचे मत आहे. मरिन जैवशास्त्रज्ञ आशा डी वोसे यांनी सांगितले की, ब्ल्यू व्हेलच्या नव्या समूहाच्या शोधामुळे असे संकेत मिळतात की अजूनही महासागरांचा पूर्णपणे अभ्यास करण्यात आलेला नाही. महासागरांची अशी अनेक क्षेत्रे आहेत की तेथे आजही मानव पोहोचलेला नाही.