You are currently viewing शालेय बालपण

शालेय बालपण

*का

व्य निनाद साहित्य मंच पुणे समूह सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*शालेय बालपण* 

 

काल एक मे होता. तुम्ही म्हणाल हो होती नां ? त्यात काय ?

तर विशेष असं की मला एकदम माझे शालेय जीवन आठवले ,कारण साधारणतः ३० एप्रिल नंतर पुढे वार्षिक परीक्षेचा रिझल्ट असायचा . साधारणतः पंचविस तारखे पासूनच धाकधूक सुरू व्हायची ! आदल्या दिवशी मात्र ती शिगेला पोहोचायची . सकाळी लौकर (जमेल तसं) उठून ,शाळेत जातांना रस्त्यात भेटणारे जवळ पास सर्व मंदिरात देवांशी आणा -भाका करून ,धकधकत्या मनाने वर्गात जात असूं . सर केंव्हा आपला नंबर पुकारतात याची वाट पहात असूं . खरं तर माझा रोल नंबर नेहमिच ५-७ च्या आत असायचा ! ( जन्म दात्यांची कृपा !) पण परिक्षेत माझा नंबर कोठे फेकला जाईल काहिच सांगता येत नसे !

प्रगति पुस्तक व त्यातले मार्क्स पाहून (!) थोडा दिलासा मिळायचा . व मग एकमेकांचे उधळलेले गुण (?) पाहून घरी जायचा मार्ग पकडायचो व कां कोणास ठाउक रस्त्याने , पडलेला एखादा डब्बा किंवा एखादा दगड ,पायाने लाथाडत घराकडे जात असूं . परिक्षेत नंबर खाली कां घसरला ? या प्रश्नाची मानसिक तयारी कदाचित् या मुळे होत असावी ! असो .

शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच आपण मोठे झाल्याची खंत येते व बालपणच किती छान होतं असं वाटायला लागतं . खरंतर आत्ताच्या इतक्या सुखसोई आपल्या सर्वांच्याच बालपणांत नव्ह्त्या तरी पण एक वेगळाच आनंद नक्की होता हे निश्चित .

!

खरंतर मला तरी शाळेने खूप भरभरून दिलं . त्यामुळे माझी शाळा – “ला . ना. सार्वजनिक “, ही माझ्या आयुष्यातिल एक महत्वाचा भाग आहे . त्या काळी आमची शाळा जळगांवातिल एक नामांकित शाळा होती व आम्हाला त्याचा आजही अभिमान आहे .

खरंतर ,शाळा हा “एपिसोड “ आपल्याला शाळा सोडल्यानंतरच कळायला लागतो ( निदान मलातरी )

कारण त्या नंतर आपली आयुष्याची खरी शाळा सुरू होते !

“शाळा “ या दोन अक्षरांनी आपलं “आयुष्य “ हे पुस्तक घडत असतं . त्यातिल पहिलं पान म्हणजे जन्म व शेवटचे पान म्हणजे मृत्यु , ही दोन्ही पानं लिहिणं आपल्या हातात नाही , पण मधली सर्व पाने आपल्यालाच लिहायची असतात व आपलं आयुष्य रूपी पुस्तक जगासमोर सादर करायचं असतं !

आपल्या पुस्तकांतले सुरवातिची पानं आपण शाळेत वाचत , लिहित शिकत असतो . आणि मग तेच पुस्तक आणि त्यातिल एक एक पान आपल्याला आयुष्यभरासाठी “आठवणी “पुरवत असतं !

शाळेतील अनेक आठवणी ,आनंद ,केलेला दंगा ,शिक्षकांनी केलेल्या शिक्षा सर्व काही या पुस्तकांच्या पानांत दडून बसलेल्या असतात . शाळा म्हणजे एक ध्यास असतो ,तेंव्हा मिळवलेला आनंद , मित्र – मैत्रिणी या आपणांस आयुष्यभरासाठी मिळत असतात .

तशा शाळेतल्या आठवणी खूप आहेत पण लक्षात रहाणारा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा आदला दिवस २५जानेवारी ! एकतर शाळा अर्धा दिवस ! त्यातून पताका बनवा , लावा ,चिकटवा . ग्राउंडवर पाणी मारा . चुन्याच्या रेषा ओढा .घरी जाउन शाळेचा ड्रेस इस्त्री करा , बुट पॅालीश करा वगैरे एकदम Busy day .

दुसऱ्या दिवशी कोणी तोंडावर पाणी मारून उठवायच्या आधीच ऊठून ,आपले आपण पाणी तापवून ,आंघोळ करून , रात्री केलेले कडक इस्त्रिचे कपडे घालून ऐटीत ध्वजवंदनाला जाण्यात एक वेगळाच फिल असायचां .

रोजच्या परिपाठा पेक्षा आजचं राष्ट्रगीत जरा जास्तच छाती फुगवून म्हणत असूं . भाषण संपून केंव्हा एकदा लिमलेटची गोळी मिळाली की मात्र हायसं वाटायचं .

शाळेत असतांना आपण मोठे केंव्हा होउ ,कॅालेज मधे जाउऊन कॅालेज लाईफ केंव्हा अेन्जॅाय करू वगैरे वाटत असतं पण खरं सांगू का शाळेतलच आयुष्य आनंदी होतं ,येवढं मात्र खरं . मला तर शाळेचा तो निरोप समारंभाचा दिवस आजही आठवतोय ! व डोळ्यात आलेले अश्रू गुपचुप पुसल्याचे चांगलेच स्मरणांत आहे .

कधी कधी वाटतं ते बालपणाचे दिवस परत यावे , शाळेत जाऊन आपल्या बाकावर बसावे व मधल्या सुट्टीत धांगट – धिंगा करावा ! व ते बालपण परत अनुभवावं !

शाळेत असतांना मला नेहमी वाटायचं शिक्षकां जवळ दोनच रंग असावेत ,एक पांढरा खडू व काळा फळा !

पण आता लक्षांत येतंय की या दोन रंगानिच अनेकांच्या जीवनात अनेक रंग त्यांनिच भरलेत !

तेवढ्यात नातवाची स्कूल बस आली व मी त्याला रिझल्ट साठी “बेस्ट ॲाफ लक “ शुभेच्छा देउन , बाय् केलं .

 

अनिल देशपांडे. पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा