You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ४ मे रोजी कणकवलीत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ४ मे रोजी कणकवलीत

कुडाळ :

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेला त्यांच्या धडाकेबाज तोफा धडाडणार आहेत. या सभेच्या आदल्या दिवशी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यास या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मनसे चे धीरज परब यांची संयुक्त पत्रकार परिषद कुडाळ येथील लाईटलाईम हॉटेलमध्ये घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रमोद जठार, भाजपा केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, प्रदीप माने आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की गेले पंधरा दिवस महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सर्व स्तरातून बिनशर्थ पाठिंबा मिळत असून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एक दिलाने काम करत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती विभागात बैठका घेऊन त्या बैठकींना सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान महायुतीचे घटक पक्ष असणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे ४ मे रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नारायण राणे यांच्या प्रचारार्थं जाहीर सभेला येत आहे. दरम्यान या सभेच्या आदल्या दिवशी ३ मे रोजी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा कणकवली येथे होत असून या सभेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधी आक्षेपार्य टीकाटिपणी केली तर भारतीय जनता पार्टी ४ मे च्या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रभाकर सावंत यांनी दिला.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार उत्साहात सुरू आहे. गाव पातळीवर प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने एक दिलाने काम करत आहे. त्यामुळे केंद्रामध्ये नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय हा निश्चित आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा